- डॉ. सुधीर रा. देवरे
अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दरवर्षी निवडणूक होते. साहित्य
संमेलन, संमेलनापूर्वी होणारी निवडणूक आणि निवडून येणारे अध्यक्ष यांच्या बातम्या
सामान्य लोकच नव्हे तर रसिक-वाचक आणि आजचे साहित्यिकही पहात- वाचत असले तरी हा
सगळा प्रकार त्यांना अगम्य असतो. आजचे अनेक साहित्यिक या सगळ्या प्रक्रियेपासून
लांब आहेत. मराठी साहित्य संमेलन हे अखिल भारतीय पातळीवरचे म्हटले जात असले तरी
त्याचे मतदार फक्त एक हजाराच्या आसपास आहेत.
पुणे,
औरंगाबाद, नागपूर, मुंबई आणि बृहन्महाराष्ट्राच्या साहित्य संस्थांना ही मते
वाटून दिलेली आहेत. या व्यतिरिक्त जिथे साहित्य संमेलन भरवले जाते त्या मंडळाला-
संस्थेला विशिष्ट मतदार कोटा ठरवून दिलेला असतो. अनेक वेळा हा स्थानिक मतदार कोटाच
अध्यक्ष निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरत असतो.
प्रांतीय
समतोल राखण्यासाठी हे मतदार वाटपाचे सामंजस्य आहे असे महामंडळाकडून सांगितले जाते.
उदाहरणार्थ, पुण्यातला साहित्यिक अध्यक्षपदासाठी उमेदवार असेल आणि पुण्यातील
साहित्यिक जर मोठ्या प्रमाणात मतदार असतील तर पुण्याचाच साहित्यिक संमेलन अध्यक्ष
म्हणून निवडून येईल, अशा भीतीमुळे ही मतदारसंख्या त्या त्या विभागात समान वाटून
दिली आहे, अशी महामंडळाच्या घटनेत तरतूद आहे म्हणे.
पण
साहित्यिक हा असा संकुचित विचार करणारा नसतो. तो प्रांतीय, जातीय विचार करून मतदान
करेल हे गृहीतक चुकीचे वाटते. यात अपवाद असतील हे खरे असले तरी कलावंतांकडे- साहित्यिकांकडे
असे संशयाने पाहणे चुकीचे ठरते. आजचे अनेक चांगले साहित्यिक या महामंडळाशी बांधील
नाहीत म्हणून त्यांना मतदानाचा अधिकार नाही. आणि असे अनेक साहित्यिक या प्रक्रियेपासून
लांब असल्यामुळे संमेलन अध्यक्षपदी चांगले साहित्यिक निवडून येतातच असे नाही.
या
निवडणूक सदोषतेमुळे आतापर्यंत निवडणुकीला उभे राहूनही इंदिरा संत, बा. भ. बोरकर सारख्या
साहित्यिकांना हा मान शेवटपर्यंत मिळाला नाही तर जी. ए. कुलकर्णी, द. ग. गोडसे,
दिलीप चित्रे आदी या प्रक्रियेपासून आयुष्यभर लांब राहिलेत. गणेश देवी, भालचंद्र
नेमाडे, श्याम मनोहर, विलास सारंग, किरण नगरकर, विश्वनाथ खैरे असे साहित्यिक यापुढेही
या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असे वाटत नाही. आणि उतरले तर ते निवडून येतील याची
शाश्वती देता येत नाही. निवडणूक घेणे हे जीवंत लोकशाहीचे उदाहरण असले तरी अधूनमधून
श्रेष्ठ आणि जेष्ठ साहित्यिकांना हा मान बिनविरोध पध्दतीने प्राप्त करून दिला तर
साहित्य संमेलनांकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होऊ शकेल.
कोणी
सुचवतं की पुस्तकांच्या संख्येवरून अथवा पुस्तकांच्या खपावरून अध्यक्षांची निवड
व्हावी. पण असे केले तर रहस्यकथा, भयकथा, लोकप्रियकथा म्हणजेच अशी साहित्य
निर्मिती करणारे लेखकच फक्त साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान होत राहतील,
ही भीती आहेच. म्हणून साहित्यिकांचा
दर्जा, मतदारांचा दर्जा यांच्याबरोबरच मतदारांची संख्या वाढवून ही कोटा पध्दत
निकालात काढणे गरजेचे झाले आहे.
- डॉ. सुधीर रा. देवरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा