-
डॉ. सुधीर रा. देवरे
भारताला
स्वातंत्र्य देताना इंग्रजांनी भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण केले.
त्यांचे म्हणणे होते की भारत हे एक राष्ट्र नाही तर त्यात दोन राष्ट्रे आहेत.
हिंदू आणि मुसलमान हे ते दोन राष्ट्रे. हा व्दिराष्ट्रवाद इंग्रजांनी जिनांना विश्वासात
घेऊन राबवला. जिना नावाची ही व्यक्ती तशी पूर्णपणे आधुनिक जीवनशैलीतले जीवन जगणारी
होती. जिना कधी नमाज पढत नव्हते आणि मुस्लीम धर्माला निषिध्द असलेले मद्यसेवनही करायचे. मात्र मुस्लीम धर्माच्या नावाने जिनांनी
आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षेपोटी स्वतंत्र देशाची मागणी लावून धरली आणि लाखो
लोकांच्या कत्तलीला कारण झाले. शेवटी 15
ऑगस्ट 1947 ला भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकड्यांमध्ये आपल्याला स्वातंत्र्य
स्वीकारावे लागले.
परंतु
भारताचा इतिहास पाहता प्रदिर्घ काळापासून इथे हिंदू- मुसलमान गुण्यागोविंदाने
नांदत होते. मुसलमान राजा असला तरी हिंदू लोक सुखी होते आणि हिंदु राजांच्या
अमलाखालील मुस्लीम जनताही आनंदात होती. काही सत्ता थोड्याफार अपवाद असू शकतील.
मात्र हिंदू –मुस्लीम येथे एकत्र नांदूच शकत
नाहीत असे वातावरण भारतात कधीच नव्हते. आपसात ज्या लढाया होत होत्या त्या दोन
राजांच्या सत्ता संघर्षासाठी असत. धर्मासाठी नव्हे.
भारतात आलेल्या मुस्लीम राजांनी इथली
संपत्ती लुटून इंग्रजांसारखी मायदेशात पाठवली नाही. त्यांनी इथेच बस्तान बसवून
आपली राजवट सुरू केली व या भूमीला आपली कर्मभूमी मानले. अनेक चांगल्या वास्तू
निर्माण झाल्या. त्यापैकी एकच उदाहरण द्यायचे झाले तर आग्य्राच्या ताजमहालाचे देता
येईल. जो आज जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.
या पार्श्वभूमीवर भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा
विचार केला तरी भारतात हिंदू- मु्स्लीम गुण्यागोविंदाने नांदत आहेत. ज्या काही
दंगली झाल्या असतील त्या राजकीय हेतूने प्रेरित होत्या. दोन्ही बाजूंच्या काही
राजकीय लोकांनी आपल्या स्वार्थासाठी अशा दंगली वेळोवेळी घडवून आणल्या आहेत, हे
कोणाला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही.
व्दिराष्ट्रवाद
स्वीकारून मुस्लीमांसाठी स्वतंत्र पाकिस्तान निर्माण झाला तरीही पाकिस्तानातील जनतेपेक्षा संखेंने जास्त असलेले
मुस्लीम भारतीय प्रजासत्ताक पध्दतीने गुण्यागोविंदाने भारतात आपले जीवन व्यतीत करत
आहेत. याचा अर्थ जिनांच्या मदतीने इंग्रजांनी जो व्दिराष्ट्रवादाचा मुद्दा मांडला
होता तो काल्पनिक होता आणि तो आज पूर्णपणे निकालात निघाला आहे, हे स्पष्ट होते.
म्हणून आज पाकिस्तानच्या निर्मितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
या कृत्रीम देशाची निर्मिती भारत व्देषातून
झाली असल्यामुळे पाकिस्तान हा त्याच्या निर्मितीपासूनच आपल्या अस्तित्वासाठी
भयग्रस्त होऊन भारताच्या खोड्या काढतोय. भारतात भाडोत्री दहशतवादी तर घुसवतोच पण भारतातील
धार्मिक सहिष्णुतेत व्यत्यय आणण्यासाठी काही वाट चुकलेल्या नागरीकांना चिथावून
भारतात दंगे घडवून आणण्याचा मुद्दाम प्रयत्न करीत आहे. भारताच्या नागरीकांनाच
भारताविरूध्द भडकावणे हा या कटाचा भाग असून त्याच उद्देशाने पाकिस्तान भारतात
दहशतवादी पेरतो. भारतात हिंदू-मुस्लीम भांडणे होत राहिली तर पाकिस्तान निर्मितीचे
कारण योग्य होते असे पाकिस्तानला आतंरराष्ट्रीय स्तरावर सांगता येते.
पाकिस्तानची
ही चाल लक्षात घेऊन इथल्या प्रत्येक राजकीय पक्षाने आणि नागरिकांनी त्याचा हा डाव
हाणून पाडला पाहिजे. भारतातला मुस्लीम हा प्रथम भारतीय नागरीक आहे. आम्ही सगळे
भारताचे आहोत आणि भारत हा आमचा सगळ्यांचा देश आहे, हेच खरे सत्य आहे.
- डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा