आजपर्यंत
नरेंद्र मोदी यांच्या एकही उद्गाराची दखल घ्यावीशी वाटली नाही. परंतु परवा ते जे
काही आपल्या भाषणात देवालयाला जोडून शौचालयांविषयी बोलले आणि त्या उद्गारावर जी
देशभर चर्चा सुरू झाली त्याचे श्रेय त्यांना द्यावे लागेल. याआधी दोन व्यक्तींनी
असा उल्लेख केला असला तरी त्यांच्या विशिष्ट दृष्टीकोनामुळे त्यांना अशोभनिय ठरवले
गेले. मात्र देवालय अजेंड्यावर असलेल्या मोदींच्या शौचालय आख्यानामुळे देशात अनेक
छोटे छोटे भूकंपाचे धक्के बसले. घरचा आहेर म्हणून हे धक्के बसणे गरजेचेच होते.
शौचालयासाठी
पायपीट करण्याचा ओझरता उल्लेख मराठी ललित साहित्यात मला तरी दया पवारांच्या बलुतं
मध्ये वाचल्याचं आठवतं. त्याआधी साहित्यात असा उल्लेख आलेला असेल तर तो माझ्या तरी
वाचण्यात नाही. माझ्या पंख गळून गेले तरी या 2007 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात
हा प्रश्न मी सुचकतेने हाताळलेला आहे तर सहज उडत राहिलो या माझ्याच पण अजून
प्रकाशित न झालेल्या पुस्तकात हा प्रश्न मी सविस्तरपणे लिहिला आहे.
खरं तर हा प्रश्न इतका भयानक असूनही ललित
वाड्मयाबरोबरच नाटक, चित्रपट आदी कलांमध्ये हा विषय गांभीर्यांने कधी उपयोजित झाला
नाही आणि वैचारिक लेखनामध्येही तो जाणूनबुजून आणला जात नाही की काय अशी शंका यावी
इतपत हा विषय वाळीत टाकलेला दिसतो.
शौचालयांच्या
अजिबात नसण्यामुळे, त्यांच्या कमतरतेमुळे वा अस्वच्छतेमुळे अनेक गंभीर प्रश्न उद्भवतात,
हे जो या गोष्टीला मुकला आहे त्याच्याही लवकर लक्षात येत नाही. शौचालये उपलब्ध
नसल्याने लज्जेमुळे महिलांचे तर शारीरिक व्याधीमुळे अपंगांचे अतोनात हाल होतात.
देशातील अनेक मुलींनी शाळेत शौचालये
नसल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडले आहे. आजही अनेक शासकीय आश्रम शाळांमध्ये मुलींना
उघड्यावर अंघोळी कराव्या लागतात. उघड्यावर
लघवीला बसावे लागते. दिवसभर लघवीला जावे लागू नये म्हणून आजही शहरातील स्त्रिया
सुध्दा गरज असूनही कमी पाणी पितात. दिवसा शौचासला बाहेर जावे लागू नये म्हणून आजही
खेड्यातल्या महिला कमी जेवण घेतात. अनेक अपंग लोक शौचासची धास्ती घेऊन आपल्या
खाण्यावर नको इतके नियंत्रणे आणतात.
नैसर्गिक
विरेचनाची अशी अनैसर्गिक कोंडी केल्याने अनेक शारीरिक व्याधींना लोक सामोरे जात
राहतात. यात किडनी स्टोन पासून पोटांचे आजार या अवरोधाने होतात. तर उघड्यावरील
शौचासमुळे जंतू संसर्ग आणि पाणी दुषीत होऊन अनेक रोगांना आपण निमत्रंण देत असतो.
अभ्यासकांच्या
एका निरिक्षणानुसार आजही भारतात फक्त 40 टक्के लोक आधुनिक शौचालये वापरतात. बाकी
60 टक्के लोक उघड्यावर शौचासला जातात. भारतातली ही स्थिती बांगलादेश आणि ब्राजिल
यांच्यापेक्षा वाईट आहे हे ही आताच उजेडात आलंय. महासत्तेचे स्वप्न पाहणार्या
भारतासाठी ही लज्जास्पद गोष्ट आहे.
अगदी
प्राचीन काळापासून भारतात देवालये तर आहेतच. भारतातच नाही तर सर्व जगात देवालये
आहेत. आणि मार्केटींगसाठी रोज प्रचंड प्रमाणात देवालये उभारली जात आहेत. एकाच
धर्माची नाहीत तर सर्वच धर्मांची ही देवालये आहेत. या सगळ्या भावनिक आणि
श्रध्देच्या आभासातून जागे होऊन आपल्याला शौचालयांचा गांभीर्याने विचार करावाच
लागेल. याचे श्रेय कोणी जरी घेतले तरी हरकत नाही. पण या भयाण वास्तवापासून
आपल्याला खूप काळ दूर राहता येणार नाही. आणि नैसर्गिक अवरोधात दिर्घ काळ जगणे
म्हणजे मृत्यूला निमंत्रण असते.
- डॉ. सुधीर रा. देवरे
देवरे साहेब, आपण मांडलेल्या मुद्द्यांशी १००% सहमत आहे. अपंगत्वामुळे कुठे बाहेर जायचे असेल तर खाण्या - पिण्यावर कल्पनातीत निर्बंध मला घालून घ्यावे लागतात. कारण, प्रवासात गरज पडलीच तर मला किंवा माझ्यासारख्यांना सहजासहजी वापरात आणता येतील अशी शौचालये मुळात आहेतचं कुठे ?
उत्तर द्याहटवा