शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३

धर्म आणि मार्केट




-         डॉ. सुधीर रा. देवरे


         एखादा बुवा सपशेल उघडा पडतो. त्याचे सगळे रिपोर्ट पॉजि‍टीव्ह येतात. आणि चौकशीनंतर त्याच्या या आधीच्याही अनेक भानगडी उजेडात येऊ लागतात. अशा वेळी बेगडी संतांबद्दलची समाजात असलेली अंधश्रध्दा गळून पडायला हवी अशी आपण अपेक्षा करतो. पण नेमके होते याच्या उलटच. अशा तथाकथित संतांच्या समर्थनार्थ आंदोलने होतात. त्याला वाचवण्यासाठी लोक रस्त्यावर येतात. त्याने बळकावलेल्या जमिनी- अतिक्रमणे त्याचे भक्त कायदेशीर मार्गाने परत घेऊ देत नाहीत. लोक कायद्यांपेक्षा आणि संविधानापेक्षा एखाद्या व्यक्तीला मोठे समजू लागतात.
         अमूक एक संत म्हणजे धर्म असे लोक मानू लागतात. तो संत कितीही उघडा पडला तरी त्याच्यासारख्या दुसर्‍या बुवांच्या प्रसिध्दीला ओहटी लागत नाहीच पण ज्याच्यावर आरोप होतात तोही संत म्हणून जनमानसाच्या मनातून उतरत नाही. त्याचे स्थान अढळ राहते. बाकीचे स्वयंघोषित तथाकथित संतही ह्या बुवाचे समर्थन करतात. कालची घटना आज लोक सहज विसरून जातात. हा काय प्रकार आहे. हा कोणत्या प्रकारचा विश्वास आहे. हे कोणते गारूड आहे. ही कोणती श्रध्दा आहे. ही कोणती मानसिकता आहे. कळायला मार्ग नाही.
         तथाकथित संत, त्यांच्या लीला, त्यांचे सत्संग, दरबार, सोहळे पाहिले तर कुबेराचे वैभव कशाला म्हणतात ते लक्षात येते. तीच गोष्ट आजच्या सार्वजनिक उत्सवांची. सगळ्या सार्वजनिक उत्सवांचा आपण बट्याबोळ करून टाकलाय. परवाचे लालबागच्या गणपतीजवळचे दृश्य बघून हादरलो. तरीही ह्या इतक्या प्रंचड गर्दीतून स्त्रियांना असा स्पर्श करण्याला कोणीही आक्षेप घेत नव्हते हे जास्त धक्कादायक होते. गणपती उत्सवाच्या काळात पूर्वी अनेक प्रबोधनाचे कार्यक्रम केले जात. अजूनही लोकांना विविध क्षेत्रातील प्रबोधनाची नितांत गरज आहे हे रोज लक्षात येऊनही असे कार्यक्रम आखले जात नाहीत.
         गणपती उत्सव, गोकुळाष्टमीची दहीहंडी आणि नवरात्रीतल्या गरब्यांचे आज पूर्णपणे मार्केटींग झाले आहे. कर्मकांडांना आपण धर्म म्हणू लागलोत. उधळपट्टीच्या उत्सवांना आपण श्रध्दा म्हणू लागलोत. चंगळवादाला आपण संस्कृती म्हणू लागलोत. आणि ‍अतिशय नियोजनबध्दपणे लोकांच्या धार्मिक श्रध्दांचे मार्केटींग करणार्‍यांच्या हातचे आपण दिवसेंदिवस बाहुले बनत चाललोत हे कोणाच्याच लक्षात येत नाही.
         धर्म म्हणजे तत्व, धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे समाजात वागण्याची आचारसंहीता. धर्म म्हणजे नीती- नियम. धर्म आणि श्रध्दा ह्या सार्वजनिक जीवनात अरेरावी पध्दतीने मिरवण्याच्या गोष्टी नाहीत. धर्माची सां‍केतिक कर्मकांडे पाळायची तर ती आपल्या घरात पाळायची असतात. धार्मिक स्थळांमध्ये पाळायची असतात. पण धर्म आता आक्रमकपणे रस्त्यावर येऊ लागला. शाळा- कॉलेजात बसू लागला. विधीमंडळात- संसदेत वावरू लागला. कार्यालयांतही घुसू लागला. जसे ग्लोबलायझेशनमुळे साध्या दुकानांच्या जागी मॉल येऊ लागलेत तशी धार्मिक स्थळेही चकाचक होऊन मार्केटींग करू लागलीत. धर्मात मार्केट सुरू झाले की मार्केटात धर्म गेला हे समजायला मार्ग उरला नाही.
         आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे आधी फक्त राजकारणात राजकारण होत असे. आता कोणत्याही क्षेत्रात राजकारण होऊ शकते. म्हणून सावधान.
      - डॉ. सुधीर रा. देवरे            
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा