शनिवार, १३ जुलै, २०१३

करूणेची सावली...
-         डॉ. सुधीर रा. देवरे


         गौतम बुध्द यांचे नाव घेताच समोर साक्षात करूणा, प्रज्ञा, अहिंसा ‍यांचा प्रत्यय येतो. बुध्द गया. जिथे बोधी वृक्षाखाली गौतम बुध्दांना बोधी म्हणजे ज्ञान प्राप्त झाले ते हे शांततेचे प्रतिकात्मक ठिकाण. अशा विभूतीला कोणी शत्रू असू शकतो हे आपल्या आकलनापलिकडचे आहे.
         आधी अफगानिस्तानातील बामियाना येथे असलेले गौतम बुध्दांचे भव्य शिल्प सुरूंग लावून फोडणारे तालिबानी आपण आठ वर्षांपूर्वी चॅनल्सवरून पाहिले. आणि आता भारतातील या शांततेच्या मंदिरात बाँबचे दहा स्फोट होतानाही आपण हताशतेने पाहिलेत. याचा अर्थ असा नाही की हे तालिबान्यांचे कृत्य आहे. पण यामागे जे कोणी असतील ती तालीबानी प्रवृत्तीच.
         भारतातील हा पहिला स्फोट नाही आणि तो शेवटचाही असणार नाही. पण दहशतवाद्यांनी हे जे ठिकाण निवडले त्यावरून त्यांची मानसिकता कशी किडलेली आहे याचा कयास आपण बांधू शकतो. इतर धर्मांचाच काय ज्याने स्वत:चा धर्मही नीट अभ्यासला नाही तोच असा धर्मव्देष्टा असू शकतो. ज्याने आपल्या धर्माचा डोळस अभ्यास केला तो कधीही धर्मांध होऊन दहशतवादी होणार नाही. कारण प्रत्येक धर्म शेवटी हे विश्वची माझे घर असेच म्हणतो.
         आता या घटनेवर भारताचे आजचे राजकारण. या स्फोटांनंतर राजकारणी जे काही बोलले ते ऐकून आपले नेते किती खालच्या पातळीवरचे राजकारण करतात ते पुन्हा एकदा सिध्द झाले. कोणत्याही दहशतवादी हल्यानंतर सगळ्या राजकारणी लोकांनी नुसते मौन पाळले, बाकी काहीही केले नाही तरी भारतातील लोक त्यांना धन्यवाद देतील आणि त्यांनी प्रत्यक्षात काहीही न करताही ऐशी टक्के काम केले असे आपल्याला वाटेल.
         जुन्या खेड्यांमध्ये पूर्वी माळी गल्ली, कुणबी गल्ली, शिंपी गल्ली, सुतार चौक, लोहार चौक, धोबी आळी अशा नावांच्या गल्ल्या- चौक असायचे आणि त्यांचे एकेक मोरखे असायचे. या जातीय गल्ल्या म्हणजेच आजचे हे राजकीय पक्ष वाटायला लागलेत. अशा जातीयवादी मोरख्यांनाही लाजवेल असे आजच्या राजकीय पक्षांचे मोरखे बोलतात. ते कोणत्या जातीधर्माचे वा गटातटाचे नेतृत्व करतात हे लपून रहात नाही. सगळ्या राजकीय पक्षांना धर्मांधता आणि जात्यंधतेचा आजार झाला आहे. आपण सर्वांचे आहोत असे त्यांच्या कोणत्याही कृतीतून दिसून येत नाही हे आपल्या देशाचे आणि राज्यघटनेचे दुर्दैव.
         या जातीय पक्षांचा आणि नेत्यांचा हा आजार फक्त भारतीय नागरीकच बरा करू शकतो. जेव्हा या पक्षांना आणि राजकीय नेत्यांच्या लक्षात येईल की, भारतीय नागरीक हा जाती- धर्माच्या नावाने मतदान करत नाही. तो काम आणि चारि‍त्र्य (भ्रष्टाचारी नसलेला) पाहून मतदान करतो. तेव्हाच त्यांचा हा आजार बरा होऊ शकतो. पण नागरिकच जातीयवादी होत असेल तर मग भवितव्य कठीण आहे.
         या सगळ्या अराजकातही हा देश चाललाय तो ‍दिवसेंदिवस अतिशय अल्पसंख्यांक होत चाललेल्या जातीभेद- धर्मभेद न मानणार्‍या करूणेच्या सावलीमुळे. ही सावली विस्तारण्याची जबाबदारी आता सामान्य नागरिकांवर येऊन पडली आहे.

     - डॉ. सुधीर रा. देवरे       
 इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा