-
डॉ. सुधीर रा. देवरे
माझा एक वार्ताहर मित्र काही दिवसांपूर्वी
माझ्याजवळ म्हणाला होता की, नाशिकला तो अमूक एका वर्तमानपत्रात कामाला होता.
तेव्हा अनेक लोक त्याच्याकडे बातमी देताना एक पाकिट देत. त्या पाकिटात पैसे
असायचे. त्यामुळे ती बातमी छापून आणण्यासाठी तो आग्रही व्हायचा. असे छोटे वार्ताहर
अशी पाकिटे स्वीकारीत असतील म्हणून या घटनेकडे मी किरकोळ म्हणून पाहिले.
अलिकडे अशा अनेक बातम्या वर्तमानपत्रातील
पहिल्या पानावर वाचायला मिळतात की ज्यांना कोणतेही बातमीमूल्य नसते. अशा बातम्या
वाचून मला अचंबा वाटतो. या बातम्यांबाबत संशय येतो. ही बातमीच आहे की ही बातमी
बनवण्यामागे काही देवघेव आहे असे वाटू लागते. एखाद्या कंपनीच्या एखाद्या गाडीबद्दलचे
कौतुक या बातमीत असते. अथवा कुठल्यातरी निवडणुकीला उभ्या राहणार्या उमेदवाराचे
स्वच्छ चारित्र्य या बातमीत वितृतपणे कथन केलेले असते. आणि दुसर्या दिवशी त्याच
जागेवर त्याच्या विरोधी उमेदवारालाही नावाजण्याची कला या वर्तमानपत्रातून होताना
दिसते.
याला
चॅनल्स सुध्दा अपवाद नाहीत. आत्ताच झी चॅनल आणि उद्योजक जिंदाल यांच्यातील हा
देवघेवीचा वाद चव्हाट्यावर आला. बातमी देण्यासाठी जसे पैसे लागतात तसे बातमी
दडपण्यासाठीही पैसे लागतात. काही दिवसांपूर्वी पैशांचे पाकिट स्वीकारणारे भुरटे
पत्रकार आपण किरकोळ समजत होतो. तर आता चॅनल आणि वृत्तपत्राचे संपादक-मालकच सौदा
करतात आणि तोही काही कोटींचा, अगदी करारपत्र करून.
चॅनल्स-
वृत्तपत्रे म्हणजेच पत्रकारीता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आणि तोही आता
विश्वासार्ह राहिला नाही. तिथेही अनैतिकता आणि भ्रष्ट लोक घुसलेच. आता वृत्तपत्रे वाचायची
की नाहीत आणि चॅनल्सवर बातम्या ऐकायच्या की नाहीत इथून विचार करावा लागेल.
-
डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा