रविवार, १४ ऑक्टोबर, २०१२

अपंगांच्या नावानेही सुरू ...
-         डॉ. सुधीर रा. देवरे

         माजी राष्ट्रपती डॉ. जाकिर हुसेन यांच्या नावाने डॉ. जाकिर हुसेन मेमोरियल ट्रस्ट 1986 सालापासून उत्तरप्रदेशात स्थापन झाला आहे. या ट्रस्टचे संस्थापक चेअरमन आजचे केंद्रिय कायदा मंत्री सलमान खुर्शीद आहेत तर या ट्रस्टच्या तहहयात सर्वेसर्वा प्रोजेक्ट ऑफिसर खुर्शीद यांच्या पत्नी लुईस खुर्शीद या आहेत. या ट्रस्टचे काम सहा राज्यांमध्ये चालतंय असे ट्रस्टचे म्हणणे आहे. अपंगांची उन्नती करणे, तीन चाकी सायकली देणे, कॅलिपर्स देणे, ब‍धिरांना ऐकण्याची उपकरणे देणे, पल्स पोलिओ मोहिम राबवणे आदी या ट्रस्टची कामे आहेत असे ट्रस्टची घटना सांगते. पण ---
         कागदावर जी हजारो अपंग लाभार्थिंची नावे आहेत ती तीस टक्के असली आणि सत्तर टक्के नकली असल्याचे उघड झालंय. ट्रस्ट 1986 पासून केंद्र सरकारची ग्रँट घेतंय. आणि या व्यतिरिक्त अनेक ठिकाणांहून ट्रस्टसाठी देणग्या मिळवल्या जातात. पैकी 2010  साली केंद्र सरकारकडून अडुसस्ट लाख रूपये आणि 2011 साली एक्कात्तर लाख रूपये ज्या कामासाठी ट्रस्टने कागदोपत्री खर्च केलेले दाखवले, त्या तीस टक्क्यातल्या असली लोकांनाही ती उपकरणे मिळालेली नाहीत. नकली व्यक्ती या जगातच अस्तित्वात नसल्याने त्यांना तो लाभ मिळणार नाही म्हणून त्यांना वगळून म्हणजे त्यांच्या नावाच्या पैशांचा गफला केला तरी खर्या तीस टक्के लोकांना तो लाभ मिळायला हरकत नव्हती. नकली नावांचे जे पत्ते दिले आहेत त्या पत्त्यांवर कोणीही भेटत नाही आणि गावातले लोक सांगतात की या नावाची व्यक्ती आमच्या गावात नाही. ही घटना आज उजेडात आली असली तरी ही फसवणूक 1986 सालापासून सुरू आहे हे स्पष्ट होते.
         कोणत्या अपंगाला कोणत्या उपकरणाची गरज आहे, हे तपासण्यासाठी वैद्यकीय अधिकार्यांच्या देखरेखीत अंपंगांची शिबीरे घेऊन उपकरणे वाटणी व्हावी असा नियम आहे. शिबिरात लाभार्थिंची वैद्यकीय तपासणी होते. त्यांना तसे प्रमाणपत्र दिले जाते. पण यापैकी या ट्रस्टने प्रत्यक्षात काहीही केलेले नसले तरी ग्रँट घेण्यासाठी कागदोपत्री सर्व सोपस्कार झालेले आहेत, असे दाखवले आहे. शिबीरे घेतली असल्याची विशिष्ट अधिकार्यांची पत्रे शासनाला सादर केलेली आहेत. मेडिकल ऑफिसर, समाज कल्याण अधिकारी, तहसिलदार, बिडीओ यांच्या खर्या नावांची पण खोट्या सह्या असलेली पत्रे कायद्याच्या चौकटीत सादर केली गेलीत.
         या प्रकरणाचा छडा आजतक या चॅनलने आपल्या पत्रकारांकडून गुप्त कॅमेर्याने लावला त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. अपंगांची ही फसवणूक - हा गुन्हा कायद्याच्या 420 कलमात बसणारा आहे हे उघड आहे. उत्तर प्रदेशातील 17 जिल्ह्यांच्या प्रत्यक्ष सर्वेतून या ट्रस्टचा खोटारडेपणा उघडकीस आला आहे.
         हा गुन्हा उघड होत असताना लुईस खुर्शीद यांनी उत्तर प्रदेशातील एका सचिवाचे प्रतिज्ञापत्र आजतकला सादर केले. या पत्रात हे सचिव म्हणतात की, या ट्रस्टचे काम योग्य रितीने सुरू असून तिथल्या शिबिरांना मी स्वत: उपस्थित होतो. मात्र आजतकचे पत्रकार या सचिवांना भेटले असता सदर प्रतिज्ञापत्र त्यांनी दिलेले नाही आणि प्रतिज्ञापत्रावरची सहीही त्यांची नाही पण नाव मात्र त्यांचे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
         सलमान खुर्शीद हे भारताचे आजचे कायदामंत्री आहेत. स्वत: कायदामंत्र्याने कायद्याची खिल्ली उडवली आहे. कायदा लोकांसाठी आणि आपल्यासाठी कायद्यात बसणार्या नकली फायली सादर करून ग्रँट मिळवणे आणि ती ही कोणाच्या नावावर तर अंपगांच्या. आता अपंगांच्या नावानेही लुट सुरू झालीय. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ जाकिर हुसेन हे सलमान खुर्शीदचे आजोबा असावेत. खुर्शीद यांनी डॉ जाकिर हुसेन यांच्या नावाला तर काळिमा फासलाच पण अपंगांच्या नावावर जे आजपर्यंत करोडो रूपये या ट्रस्टने हडपले आहेत, त्यासाठी कितीही कठोर शिक्षा या खुर्शीद पती-पत्नीला दिली गेली तरी ती कमीच पडेल इतके नीचतम कृत्य त्यांनी केले आहे.  

-            डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा