सोमवार, १ ऑक्टोबर, २०१२

पाऊस यावा पण आपण पोचल्यावर...



                                       - डॉ सुधीर रा. देवरे


इथे
प्रत्येकाला वाटतं
खूप
पाऊस यावा-
आपण
घरी पोचल्यावर...
ही माझी कविता आहे. आदिम तालनं संगीत या माझ्या अहिराणी कविता संग्रहात ही कविता आहे. मूळ कविता अहिराणी भाषेत असून तिचा हा मराठी अनुवाद. पाऊस कोणाला नको असतो? पण ऑफिसातून घरी निघताना मला वाटतं, त्याने जरा थांबावं. मी घरी पोचलो की पाऊस काय कोसळायचा तेवढा कोसळो.
पण मी घरी पोचलो म्हणजे सगळे जग घरी पोचेल असे थोडेच आहे? माझ्याऐवजी आता दुसरा कोणीतरी पावसाला थोडावेळ थांब म्हणेल. प्रत्येक पावसाळ्यात मला वाटतं, भरपूर पाऊस यावा मात्र माझ्या कोणत्याही कामाला व्यत्यय न करता यावा. पावसाने प्रमाणापेक्षा कमी येऊ नये आणि जास्तही येऊ नये. फक्त कामापुरते यावे.
हे झाले काव्यात्मक रसग्रहण. पण पाऊस आला तर मी पाणी साचवणार नाही. त्याला नीट वाहूही देणार नाही उतारावरून. माझ्या पन्हाळाचे पाणी माझ्या अंगणात सुध्दा पडता कामा नये. त्याला लांब पाईप लावून मी ते गल्लीत पडू देईल आणि शेजार्यांच्या अंगणातून कसे वाहील याची काळजी घेईल. मला पिण्यासाठी पाणी मात्र नगरपालिकेच्या नळाचेच पाहिजे. जे पावसाच्या ताज्या पाण्यापेक्षा कितीतरी पटीने दुषित असले तरी.
पावसाने यावे मी कितीही प्रदुषण केले तरी त्याने यावे. त्याला जमिनीत झिरपायला जागा ठेवली नसली तरी. त्याला येण्यासाठी योग्य तेवढी झाडी अस्तित्वात ठेवली नाही तरी त्याने यावे. वृक्ष लावायला जागा कुठून आणायची असेही कोणी म्हणेल. घराच्या आजूबाजूला जी थोडीफार जागा असते तिथे झाडे लावता येतात. पण आपले घर दुरून दिसावे म्हणून कोणी झाडे लावत नाही. कोणी असलेली झाडे तोडून टाकतात. झाडांना घराजवळची अडचण समजतात.
घराजवळ वृक्ष नकोत पण पाऊस हवा आम्हाला. वाटर सप्लायचे पाणी कपात सुरू झाल्यावर आम्हाला पावसाचे महत्व कळते. शेतकर्याला वझाड्यामुळे बांधावर झाडे नकोत पण पाऊस हवा पेरणीसाठी, पिकं तगवण्यासाठी आणि विहिरीतील पाणी पातळी वाढण्यासाठी. पर्यावरणाची काळजी न घेता सर्वांना पाऊस हवा. काही लोकांना तर पाऊसच नको पण घरातल्या नळाला पाणी हवंय चोवीस तास.

-         डॉ सुधीर रा. देवरे
     इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा