रविवार, ७ ऑक्टोबर, २०१२

आता महालक्ष्मीच्या प्रसादाची पाळी


                                                      - डॉ सुधीर रा. देवरे
   
         शिर्डीच्या साईबाबांचे प्रसादाचे लाडू काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशात गाजले. भेसळीच्या तूपाचा भ्रष्टाचार देवाला सोडत नाही तर आपल्यासारख्या आम आदमीला कोण विचारतो? आणि आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या प्रसादाची पाळी आली. जी आख्या महाराष्ट्रात गाजतेय.
         महालक्ष्मीच्या मंदिरातील प्रसाद म्हणजे लाडू बनवणार्या महिलांवर कोणीतरी आक्षेप घेतला की मासिक पाळीच्या वेळी महिला अपवित्र असतात म्हणून त्यांनी प्रसाद बनवू नये. या सगळ्या प्रकाराकडे नीट बघितले तर प्रश्न आर्थिक आणि गटातटाचा आहे हे लक्षात येते. पण आश्रय घेतला गेला महिलांच्या मासिक पाळीचा. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण आपले कौतुक करून घेतो. पण अशा आज अनेक गोष्टींकडे निर्देश करता येईल की आपण पुरोगामी राहिलो नाहीत. पुरोगामी पूर्वी असू पण आता नाही.
         महिलांची मासिक पाळी म्हणजे काय? हेच आपल्याला माहित नाही. तशी कोणत्याही शिक्षणाची व्यवस्था आपल्याकडे नसल्यामुळे असे अज्ञान पिढ्यानुपिढया सुरू आहे:
         : प्रत्येक महिण्यात स्त्री च्या गर्भाशयात बीज तयार होते. विशिष्ट दिवसात त्या बिजाशी पुरूष बिजाचा संबंध आल्यास ते बीज रूजते व महिला गर्भवती होते. तसे झाले नाही तर ते बीज गळून पडते. याला स्त्री ची मासिक पाळी म्हणतात.
         असा हा निसर्गधर्म आहे. आणि जो निसर्गधर्म आहे त्याला मानवनिर्मित धर्म अपवित्र कसे ठरवू शकतो? हा तर पुरूष जन्माचा उगम आहे. म्हणजेच मानव जन्माचे सातत्य राखणारा तो शरीरधर्म आहे.
         आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट. कोल्हापूरची महालक्ष्मी हे दैवत स्त्री आहे म्हणजे एक महिलाच आहे. दैवत असले तरी शरीरधर्म चुकणार नाही. मग महालक्ष्मीलाही आपण चार दिवस अपवित्र समजायजे का ???

-         डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा