रविवार, ४ नोव्हेंबर, २०१२

माझी एअर होस्टेज फ्रेंड- एक गोष्ट



-         डॉ. सुधीर रा. देवरे

         काही दिवसांपूर्वी मला एका स्त्री आयडीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती मी स्वीकारली. प्राथमिक चॅटींग झाल्यानंतर मी विचारले की, आपण काय करता आणि कुठे असता. उत्तर मिळाले, इंग्लडला असते आणि एअर होस्टेज आहे. कुठल्या एअरलाइन कंपनीत असे विचारले तर उत्तर मिळाले की, हा प्रश्न पर्सनल आहे मी सांगणार नाही. आयडीत फक्त नाव होते, आडनाव नव्हते. म्हणून मी आडनाव विचारले. उत्तर मिळाले की, हा प्रश्न सुध्दा पर्सनल आहे. इंग्लड मध्ये आपल्यासोबत कोण राहतं विचारल्यावर उत्तर आलं की, मी अनमॅरिड आहे म्हणून एकटीच राहते. आपले भारतातले गाव कोणते असं विचारल्यावर चेन्नई उत्तर मिळालं. चेन्नईत राहून मराठी? असं म्हटल्यावर मी मूळची पुण्याची हे स्पष्टीकरण आलं.
         दोन दिवसानंतर मला विचारण्यात आलं की तुम्ही दिवसभर ऑनलाइन का येत नाहीत. मी म्हणालो, मी ‍िबझी असतो म्हणून फक्त संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत ऑनलाइन असतो, पण रोज असतोच असे नाही. मला त्यांनी सुचवलं, मग आपण एसेमेस ने बोलायचं का, पण फक्त एसेमेस नेच बोला. मी‍ ‍िबझी असल्यामुळे फोन मुळीच करायचा नाही, असं मला बजावण्यात आलं. मी हो म्हणालो. मला त्यांनी त्यांचा मोबाइल नंबर दिला. मी तो नोट करून घेतला. माझ्याकडे नंबर मागितला. मी दिला.
         ऑफ लाइन झाल्यानंतर माझ्या मोबाइलवर मला एक मेसेज आला. मी मॅसेजने लगेच उत्तर पाठविले. आंतरराष्ट्रीय एसेमेस म्हणून माझ्या बॅलन्स मधून 5 रूपये वजा व्हायला हवे होते. मात्र फक्त 60 पैसे वजा झाले. मला पहिली शंका आली. नंतर मला त्यांचे खूप एसेमेस यायला लागले. ते वाचून कोणतीही महिला असे एसेमेस पुरूषाला पाठवू शकेल का अशी मला शंका यायला लागली, असे ते एसेमेस होते.
         एके दिवशी मी माझ्या दुसर्या मोबाइलवरून या नंबरला कॉल करायचे ठरवले. जो नंबर मी त्यांना दिलेला नव्हता. हा माझा नंबर पोष्टपेड असून त्याला एसटीडी आणि आयएसडीची सुविधा नाही. म्हणून या नंबरवरून आंतरराष्ट्रीयच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही कॉल लागू शकत नाहीत. पण ह्या नंबरला मी कॉल करताच चक्क रिंग गेली. मी कॉल कट केला. म्हणजे ही व्यक्ती इंग्लड मध्ये नसून महाराष्ट्रात होती. थोड्या वेळाने याच नंबरवरून मला कॉल आला. मी अँटेंड करताच पुरूषाचा आवाज आला, कोणाचा नंबर आहे हा. मी म्हणालो, आपल्याला कोण हवय? म्हणाला, मला मिस कॉल होता. म्हटलं, राँग नंबर लागला होता.
         दोन दिवसानंतर ऑनलाइनवर ती व्यक्ती माझ्याशी बोलू लागली. तेव्हा मी म्हटलं, तुम्ही पुरूष असून स्त्री च्या नावाने का वावरता? पाच मिनिटपर्यंत मला उत्तर आले नाही. नंतर अतिशय उध्दटपणाचे मॅसेज येऊ लागले. मी म्हटलं, तुमच्या मोबाइलवर मी फोन केला तर माझ्याशी एक पुरूष बोलला. पुन्हा पाच मिनिटांनी उत्तर आले, तो माझा नवरा होता. मी म्हणालो की, तुम्ही अनमॅरिड आहात असे मला सांगितले होते. उत्तर आले, मी तेव्हा खोटे सांगितले. कुठे आहेत आता तुमचे मिस्टर? उत्तर, माझ्याजवळ बसलेत. मी म्हणालो, तुम्ही इंग्लड मध्ये आहात तर तुमचा कॉल लोकल पध्दतीने कसा लागला? उत्तर मिळाले, माझे मिस्टर इंडियात आले आहेत आणि माझा मोबाइल त्यांच्या जवळ आहे. मी म्हटलं, इंडियात असताना ते इंग्लड मध्ये तुमच्याजवळ कसे बसलेत? काही मिनिटांनंतर अर्वाच्य उत्तर आले, तुम्ही तुमचे थोबाड बंद करता का? मी तुम्हाला पाहून घेईन...
         आणि मी ही घटना कोणाजवळ बोलतो की काय या भीतीने घाईगडबडीत ती व्यक्ती कोणताही आगापिछा नसलेले कुठेतरी आरोपाचे शस्त्र परजू शकते- आरोप पोस्ट करू शकते.

         कोणाला कोणाचं आकर्षण वाटावे हे जसे आपल्या हातात नाही तसे त्या व्यक्तीच्याही हातात नाही. गे असणे अथवा तृतीय पंथी असणे, आपण नैसर्गिक समजत असलो तरी त्यात पुन्हा मनोरूग्ण असणे ही वेगळी बाब आहे. हा एक आजार आहे. अशा व्यक्तीने मानसोपचार तज्ञाकडे जाऊन सल्ला घेणे योग्य. असे सांगण्यासाठीच मी फोन झाल्यानंतरही चॅटींग सुरू ठेवली होती, परंतु त्या व्यक्तीने मला ती संधीच मिळू दिली नाही. (कदाचित ही व्यक्ती मूळात स्त्री सुध्दा असू शकते पण वारंवार खोटे बोलल्यामुळे व मोबाईलवर पुरूषी आवाज आल्यामुळे मी शंका घेतली.) आरोप करण्यासाठी कोणत्याही पुराव्यांची गरज नसते म्हणून उठसूठ कोणावर आरोप करणे योग्य नव्हे. आपल्याला शंभर चांगले मित्र भेटतात, त्यात कधीतरी असाही एखादा मित्र भेटतो. त्याला आपला इलाज नाही. त्याला आपण समजून घेतले पाहिजे.
         (या मजकुरातून मला कोणाचीही बदनामी करायची नाही म्हणून मी या मजकुराला एक गोष्ट म्हणतोय. पण कोणाला ही गोष्ट आपल्यावर आहे असे वाटले तर तो केवळ योगायोग नसावा. सॉरी. समजावा.)

-         डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा