शनिवार, २० ऑक्टोबर, २०१२

मलाला ला सलाम



-         डॉ. सुधीर रा. देवरे

         तीन वर्षांपूर्वींपासून पाकिस्थानातील स्वात खोर्यात तालिबानी दहशतवाद्यांनी थैमान मांडले आहे. त्यांच्या अनेक आदेशांपैकी एक आदेश असा होता, स्वात खोर्यातील मुलींनी शाळेत जायचे नाही, घराबाहेर एकट्याने पडायचे नाही, पारंपरिक वेशभुषा करायची. अशा प्रकारच्या घटनांवर त्यांनी अनेक महिलांना आदिम शिक्षाही दिल्यात. वडिलांच्या सल्ल्याने या प्रकारच्या जुलमांना मलालाने विरोध केला. तेव्हा ती फक्त अकरा वर्षाची मुलगी होती. मलालाचे वडील एका मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत.
         मलाला शाळेत भाषणे करून तालिबान्यांच्या या आदेशाला आव्हान देत होती. मुलींचे प्रबोधन करत होती. टोपण नावाने तिने तालिबान्यांच्या विरोधात  इंटरनेटवर ब्लॉगही लिहिलेत. या सर्वांची परिणीती म्हणून तालिबान्यांनी तिची हत्या करायचे ठरवले. त्यांचा एक प्रयत्न वाया गेला. पण परवा त्यांनी शाळेची बस अडवून डाव साधला. आज ती फक्त चौदा वर्ष वयाची आहे.
         तालिबान चौदा वर्षाच्या निशस्त्र मुलीला घाबरले. हातात एके 47 असलेले असंख्य दहशतवादी या चिमुरडीला घाबरले आणि त्यांनी तिच्या डोक्यात गोळी घातली. ती आज मरणाच्या दारात आहे. किती भेकड असतात दहशतवादी त्याचे हे ताजे उदाहरण. तालिबानचा अर्थ देवाचे सेवक असा होतो. पण त्यांच्या आतापर्यंतच्या सगळ्या कृत्यांवरून ते सैतानाचे सेवक ठरतात.
         यातून जर बरे काही घडले असेल तर आंतरराष्ट्रीय समुदायासोबत पाकिस्तानातील सरकारसह सर्व राजकीय पक्ष, मुल्लामौलवी आणि सर्वसामान्य ना‍गरिकही मलालाच्या बाजूने उभे राहिलेत. तिला शौर्याचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येत आहे. तालिबान आणि काश्मीर खोर्यातील दहशतवादी यांच्या विरोधात पाकिस्तानचे जनमत गेले तर दहशतवाद टिकणार नाही. आणि पाकिस्तानच्या उज्ज्वल भवितव्यासाठीही दहशतवाद निपटवणे गरजेचे आहे.
         मलाला लवकर बरी व्हावी. तिला उदंड आयुष्य लाभावे. भविष्यात पाकिस्तानात तिच्या नेतृत्वाचे पुरोगामी लोकशाहीचे सरकार स्थापन व्हावे, अशी इच्छा व्यक्त करून मलाला ला सलाम .

-            डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

४ टिप्पण्या: