शनिवार, २२ सप्टेंबर, २०१२

मराठी माणूस महाराष्ट्रापुरता
- डॉ सुधीर रा. देवरे

         दिल्लीला गेल्यावर मी मराठी माणूस आहे हे सांगायला मला कमीपणा वाटेल का? पाटण्याला गेल्यावर मी ताट मानेने सांगू शकेन का, मी मराठी माणूस आहे म्हणून? भोपाळ, चेन्नई, हैदराबाद, कानपुर, लखनऊ, चंदीगड, अलीगढ आदी ठिकाणी मराठी माणूस म्हणून माझे कसे स्वागत होईल? देशात- इतर राज्यात जर माझे कुठेच चांगले स्वागत होणार नसेल तर मी माझ्या महाराष्ट्रात चुकीचा वागतो असे म्हणावे लागेल का?
         दोनहजार दहा साली दिल्लीतील प्रगती मैदानातीन जा‍गतिक पुस्तक मेळाव्यात मराठी पुस्तकांच्या स्टॉलसमोर एका व्यक्तीने शिव्या देण्याचा प्रयत्न केला असे पद्मगंधा प्रकाशनाचे अरूण जाखडे यांनी सांगितले होते. प्राध्यापक श्रीनिवास सिरास या मराठी माणसाचा काही दिवसांपूर्वी अलिगढ विद्यापीठ परिसरात गुढ मृत्यू झाला होता. (संदर्भ: लोकसत्ता). काही मराठी तरूण दिल्लीहून रेल्वेने येत असताना अशाच रोषाला सामोरे गेले. असे का होते?
         या पुरोगामी महाराष्ट्राची सर्वांना समावून घ्यायची आणि देशाचे नेतृत्व करायची थोर आणि उज्वल परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर-तुकाराम पासून आताच होऊन गेलेल्या गाडगे महाराजांपर्यंत महाराष्ट्राला थोर संत परंपरा आहे. छत्रपती शिवाजी, शाहू महाराज, टिळक, आगरकर, गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, साने गरूजी, सी. डी. देशमुख, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, मधु दंडवते, एस. एम. जोशी आदींची दृष्टी विशाल आणि कोणत्याही जातीपलिकडे होती-आहे. स्वातंत्र्यासाठीच्या चळ‍वळीतही महाराष्ट्राचे योगदान अग्रणी होते.
         अशा पार्श्वभूमीवर आपण संकुचित विचार करणे विघातक ठरणारे आहे. महाराष्ट्राबाहेर काही कोटी मराठी लोक आहेत. या सवार्नांच आपण बृहन महाराष्ट्र म्हणतो. देशाबाहेरही मराठी लोक राहतात. त्यांना नीट राहू द्यायचे असेल तर आपण महाराष्ट्रात नीट वागले पाहिजे.

-         डॉ सुधीर रा. देवरे
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा