शनिवार, २१ डिसेंबर, २०१३

अंधश्रध्दा निर्मूलन ते जादूटोणा विरोधी कायदा




- डॉ. सुधीर रा. देवरे


         अंधश्रध्दा विरोधी विधेयक अठरा वर्षांपासून प्रवास करत होते. रस्त्यात त्याच्या अनेक संज्ञा- शब्द बदलले. ढाचा बदलला. काही कलमांची छाटाछाटी झाली. मूळ विधेयकाचे नामकरण अंधश्रध्दाऐवजी जादूटोणा विरोधी असे करण्यात आले. ज्यांनी हा कायदा करण्यासाठी अभियान चालवले होते ते नरेंद्र दाभोळकर आणि श्याम मानव यांच्यापैकी दाभोळकरांचा बळी दिल्यानंतर या विधेयकाचा अध्यादेश काढला गेला होता. दिनांक 13-12-2013 ला विधानसभेत तर दिनांक 18-12-2013 ला विधान परिषदेत हा अध्यादेश पास होऊन आता तो कायदा म्हणून अस्तित्वात आला.
         हा कायदा होऊ नये म्हणून अनेक राजकीय लोकच नव्हे तर जनसामान्यांतील परप्रकाशी लोकही छुपे राजकारण करत होते, हे त्यांच्या खाजगी गप्पांतून दिसून येत होते. दाभोळकरांचा खून झाल्यानंतर सुध्दा या प्रवृत्ती थांबल्या नव्हत्या. दाभोळकरांच्या मृत्यूनंतर काही दिवसातच एक जण माझ्याकडे या विषयावर बोलताना म्हणाले, ...हे माझेच मत आहे असे नाही सर, पण ही जी काही अंधश्रध्दा निर्मूलन समिती आहे ना ती सर्वधर्मिय असायला हवी होती. आणि हा कायदासुध्दा सर्वधर्मिय असायला हवा.
         मी त्यांना माझ्या पध्दतीने तात्काळ उत्तर दिले, खरे तर हे विधेयक सर्वधर्मिय आहेच. पण ते न वाचल्यामुळे आपल्याला तसे वाटते. दुसरी गोष्ट अशी, की समजा हे विधेयक फक्त हिंदू धर्मियांसाठी आहे असे आपण काही वेळ गृहीत धरले तरीही हा कायदा व्हायलाच हवा. याचे कारण असे, की समजा मी जर एखाद्या रोगाने आजारी असेल आणि दुसराही कोणीतरी त्याच रोगाने आजारी असेल. आम्ही दोघं एका दवाखान्यात आहोत. तर मी डॉक्टरांना असे सांगेन का, की माझ्यावर इलाज करण्याआधी त्या दुसर्‍या पेशंटला आ‍धी ट्रिटमेंट द्या, त्याला आधी बरे करा, मी त्याच्यानंतर बरा होईल, असे मी सांगणार नाही. कारण मी आजारातून लवकरात लवकर बरा व्हायला हवे असे मला वाटते.
         मात्र या विधेयकाच्या निमित्ताने आम्ही आजारी असलोत तरी हरकत नाही, दुसर्‍या धर्माच्या लोकांना आधी या आजारातून उठवा मग आम्ही जागे होऊ अशी भूमिका तथाकथित धार्मिक- राजकीय लोकांनी आणि त्यांच्या हातातील बाहुले झालेल्यांनी घेतली होती. अशा प्रकारच्या अंधश्रध्दा पाळणे हा आपल्याला झालेला आजार आहे. या आजारातून बरे होण्यासाठी ह्या विधेयकाचा कायदा होणे आवश्यक होते. आधी केले, मग सांगितले अशी जर आपली संस्कृती असेल तर आपले घर आधी आपण सुधारू या. आपले पाहून इतर नंतर सुधरतीलच.
         सोळाव्या शतकात युरोपात रेनेसान्स काळ सुरू झाला. मात्र अकराव्या- बाराव्या शतकात श्रीचक्रधर- ज्ञानदेवांपासून आपल्याकडे सुधारणेचे वारे वाहत आहेत. नामदेव, तुकाराम, एकनाथांच्या संत साहित्यापासून तर अगदी अलिकडच्या गाडगेबाबांच्या किर्तनांपर्यंत अशा अघोरी प्रथांवर संतांनी कोरडे ओढले आहेत. संत तुकाराम तर नास्तिक ठरावेत इतक्या टोकाला जाऊन त्यांनी अशा प्रथांवर हल्ला केला आहे. नुसत्या या अंधश्रध्दाच नव्हेत, तर अगदी कुंभमेळ्यांवरही त्यांनी आपल्या अभंगांतून प्रहार केले आहेत. अशा संतांच्या वारकरी संप्रदायात आज मात्र काही नकली वारकरी शिरून त्यांनीही या कायद्याला विरोध केला होता. या पुरोगामी महाराष्ट्रात आज एकविसाव्या शतकातही अगदी वरवर मलमपट्टी करणारा कायदा जो अंधश्रध्दा निर्मूलनापासून प्रवास करत फक्त जादूटोणावर थांबत पास झाला, तरी तसे करण्यासाठी एका चळवळ्याला आपले बलिदान द्यावे लागावे ह्यावरून आपण पुन्हा कुठे चाललोत यावर झगझगीत प्रकाश पडतो. तथापि, अठरा वर्ष रखडूनही आणि अनेक बदल करूनही अशा प्रकारचा कायदा करणारे महाराष्ट्र हे भारतातले पहिले राज्य ठरले, हे ही नसे थोडके.
         (यातील मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  - डॉ. सुधीर रा. देवरे          
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा