शनिवार, १४ डिसेंबर, २०१३

चार राज्यांचा संदेश


                                 - डॉ. सुधीर रा. देवरे


            आता चार राज्यात जे काही सत्तेचे निकाल लागले ते सगळ्यांनाच अपेक्षित होते, असेच म्हणावे लागेल. नागरिकांसमोर दोन वाईट पर्याय होते. त्यापैकी कमी वाईट असलेला पर्याय कोणता हे लोकांना ठरवायचे होते. त्यातल्यात्यात बरा पर्याय शोधण्यासाठी या चार राज्यातल्या लोकांनी मतदान केले. दगडापेक्षा वीट मऊ म्हणून विचार करताना दगड आणि वीटेला अजून चांगला पर्याय दिसताच त्याकडेही लोक आकर्षित झाले आणि दिल्लीत आम आदमी पार्टीने देशात खळबळ उडवून दिली.
            काँग्रेसचा पराभव भाजपने केला असे म्हणण्यापेक्षा ही वेळ स्वत:वर काँग्रेसनेच ओढवून घेतली असे म्हणायला हवे. आता जे केंद्रात कार्यरत सरकार आहे ते गेल्या दोन वर्षांपासून काय करतंय, हे लोकांना माहीत नाही. या सरकारची धोरणे काय हे कोणाला समजत नव्हते. काँग्रेसचे जे जेष्ठ आणि श्रेष्ट नेते आहेत, ते स्वत:च्या विचारांनी तळपायला हवे होते, प्रत्येक घडलेल्या घटनांवर त्यांनी अभ्यासपूर्ण प्रकाशझोत टाकायला हवा होता. मात्र हे सगळे नेते फक्त पक्ष नेतृत्वाची हाजीहाजी करण्यात गुंतलेले दिसत होते. त्यांची नाळ जनसमान्यांपासून पूर्णपणे तुटली आहे हे वेळोवेळी निदर्शनास येत होते. काँग्रेसच्या काही चुकांवरून नुसती वर वर नजर फिरवली तरी हे सहज लक्षात येईल:
            भारताचे परराष्ट्र धोरण काय आहे? कोणाला माहीत नाही. भारताचे चीनबद्दल आणि पाकिस्तानबद्दल काय धोरण आहे? कोणाला माहीत नाही. भारताचे आर्थिक धोरण काय आहे? कोणाला माहीत नाही. जवानांचे शीरे नुकतीच कापून नेणार्‍या पाकिस्तानचे पंतप्रधान खाजगी भेटीसाठी अजमेरला येताच भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद त्यांना जेवण देतात. हेच परराष्ट्र मंत्री अपंगांचे पैसे खातात तरी त्यांना अभय दिले जाते. कोणी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना आदरार्थी जी लाऊन संबोधतो. गुन्हेगार लोकप्रतिनिधींना वाचवण्यासाठी काढलेल्या वटहुकूमावर जे सत्ताधारी प्रवक्ते व्याख्यान देत होते, तोच वटहुकूम राहूलने फाडून टाकताच हेच सत्ताधारी प्रवक्ते काही तासात विरोधी व्याख्याने देऊ लागली. काँग्रेसने काही कारण नसताना आंध्र प्रदेशचे तुकडे करून तिथली नाराजी तर ओढवलीच पण विदर्भाच्या फुटीलाही खतपाणी घातले. देशात जी व्यक्ती दिवसाला 26 रूपये आणि शहरात 34 रूपये कमवते ती गरीब नाही, हा आपल्या योजना आयोगाने शोध लावला. या अहवालावर अर्थशास्त्रान्वये अभ्यासपूर्ण आणि सावध बोलण्याऐवजी 5 रूपयाचे जेवण, 12 रूपयाचे जेवण, एक रूपयाचे जेवण यावर काँग्रसचे नेते आपली बुध्दी खर्च करत होते. महागाईवर त्यांना कोणताच उपाय सुचत नव्हता. काँग्रेसचे सगळेच प्रवक्ते नशेत बोलल्यासारखे बोलत होते. ही नशा दारू वा अमली पदार्थांची नसली तरी ती सत्तेची मस्ती आहे हे सहज कोणालाही ओळखता येऊ शकत होते.
            आजच्या आपल्या भारतीय पंतप्रधानांचा राग यावा, का त्यांची कीव करावी अशी परिस्थिती आहे. या सरकारजवळ कोणतेच धोरण नाही. सकाळी एक धोरण तर संध्याकाळी दुसरे अशा या सरकारची अवस्था आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी देश चालवतात, उपाध्यक्ष राहूल गांधी देश चालवतात की पंतप्रधान मनमोहन सिंग, यावर लोकांमध्येच संभ्रम आहे. पंतप्रधानपदी असलेली व्यक्तीच जर कळसूत्री बाहुले होत असेल तर देशाचे काय होईल?
            बाबा रामदेव यांना विमानतळावर घेण्यासाठी मंत्री का पाठवले गेले असे अनेकांना वाटले आणि नंतर त्यांनाच अटक करणे, आण्णा हजारेंना चर्चेसाठी बोलावणे आणि त्यांनाही अटक करून तुरूंगात पाठवणे, हे निर्णय सर्वसामान्य लोकांच्या आकलनापलिकडे होते. पण सत्ताधारी काँग्रेस हे सगळे कोणाच्या सल्ल्याने करत होती हे अजूनही गुलदस्त्यात आहे. शेवटी या चार राज्यांच्या निवडणूकीत अनेक डागाळलेल्या लोकांनाच तिकीटे देऊन काँग्रेसने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला.
            पर्याय असला तर लोकांना बदल पाहिजे असतो. भारतीय जनतेने 1977 साली पर्याय दिला, 1989 साली पर्याय दिला, 90 च्या पूर्ण दशकात पर्याय दिला. पण या पर्यायांनीच नागरिकांचा विश्वासघात केल्यामुळे त्यांना पुन्हा काँग्रेसकडे वळावे लागले. म्हणून अलिकडे स्थिर सरकार देणे हे सुध्दा जाहीरनाम्यात दिसू लागले अ‍ाणि नागरिककही म्हणू लागलेत, काही करू नका पण स्थिर सरकार तरी द्या.
            या सगळ्यांचा परिणाम जो दिसणार होता तो या चार राज्यांच्या निवडणूकीत दिसलाच. पर्यायासाठी आसुसलेल्या जनतेने या चार राज्यांमध्ये पुढे होणार्‍या लोकसभा निवडणूकीपूर्वीचा काँग्रेसला दिलेला हा सनसनीत संदेश समजावा.

- डॉ. सुधीर रा. देवरे            
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा