शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

दहशतवादाचा बाँब



 
- डॉ. सुधीर रा. देवरे

         हैद्राबादला बाँबस्फोट झाला. भारतातला हा पहिला दहशतवादी बाँबस्फोट नाही. मोजायचे ठरवले तर तात्काळ मोजता येणार नाहीत एवढे बाँबस्फोट आतापर्यंत भारतात झाले आहेत. हैद्राबादेतीलही हा पहिला बाँबस्फोट नाही आणि या शहरातील त्या जागेवरीलही हा पहिला बाँबस्फोट नाही. तरीही या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरूस्त आढळून आले.
         आता युध्दपातळीवर तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. जसे दिल्लीला धावत्या बसमध्ये बलात्कार झाल्यावर कॅमेरे लावले गेले वा बंद पडलेले दुरूस्त केले गेले. पुढे कधीतरी जयपूरला स्फोट झाल्यावर तेथेही कॅमेरे बसवले जातील. बँगलोरला स्फोट झाला तर तेथेही बसवले जातील. पण तोपर्यंत आम्हाला दहशतवादाचे कितीही चटके बसले तरी आम्ही पूर्वतयारी करणार नाही. आणि दिल्ली- हैद्राबादला नवीन स्फोट होईपर्यंत तिथले आता बसवलेले कॅमेरे पुन्हा बंद पडलेले असतील.
         लोक कितीही असुरक्षित असले तरी यापुढेही नेत्यांची सुरक्षाच वाढवली जाईल. देशात प्रचंड सुरक्षा रक्षक असूनही ते सगळे नेत्यांच्या सुरक्षेवर तैनात केले आहेत. आजचे सगळे बाँबस्फोट रिमोट कंट्रोलने केले जातात हे उघड सत्य आहे. तरीही कोणत्याही शहरातील गर्दीच्या ठिकाणी रिमोट जॅमर बसवले जात नाहीत. कारण आमच्यात म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षात तशी इच्छाशक्तीच उरलेली नाही. मात्र अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या घरादारात आणि वाहनांमध्येही हे जॅमर बसवले आहेत असे कळते. सर्वसामान्य लोकांचे रक्षण एवढ्या अवाढव्य देशात शक्य नाही असेही एका नेत्याने काल आडवळणाने सांगितले. सगळ्याच राजकीय नेत्यांना प्रचंड प्रमाणात सुरक्षा व्यवस्था पुरवली असल्याने दहशवादी हल्ल्यात जे काही वाईट होईल ते नागरीकांचे होईल. परवा हैद्राबादेत या गर्दीच्या ठिकाणी रिमोट जॅमर बसवलेले असते तर इतक्या निरपराध माणसांना ‍जिवाला मुकावे लागले असते का?
         दहशतवादी हा सलीम असो की अनिल, हरसिंग असो की अशोक, उजवा नक्षलवादी असो की डावा. दहशतवादी हा फक्त दहशतवादीच असतो. कुठल्या धर्माचाच काय तो साधा माणूस म्हणायलाही लायक नसतो. जगातील कोणता धर्म सांगतो, की इतर धर्माच्या लोकांना ठार मारा? एखाद्या धर्मग्रंथात असे लिहिले असेल तर दहशतवाद्यांनो तो ग्रंथ दाखवा.
         अशा दहशतवादाला काही उथळ राजकीय लोक केवळ मतांच्या राजकारणासाठी धर्माचा रंग देऊ पाहतात ही आमच्या लोकशाही देशाची खरी शोकांतिका आहे. आणि म्हणून आपल्या नेहमीच्या रस्त्यावर दहशतवादाचा बाँब आपला पाठलाग करत राहतो. कायम.

-          डॉ. सुधीर रा. देवरे          
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा