शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१३

देशांतर्गत खाजगी फतवे
-         डॉ. सुधीर रा. देवरे


            भारतातील अनेक लोकांना भारताची राज्यघटना माहीत नाही की काय असा संभ्रम पडावा इतक्या प्रमाणात रोज अगम्य असे फतवे देशभर निघत राहतात. हे फतवे फक्त अडाणी माणसेच काढतात आणि ते त्यांच्यापुरतेच मर्यादित आहेत असे नाही तर काही संघटना आणि राजकीय संघटनाही चालवणारे लोक या फतव्यांमागे असतात ह्या जास्त चिंताजनक घटना आहेत.
पैकी काही फतवे आणि घटना पहा:
1 पंधरा वर्ष वयाच्या मुलींचे लग्न लावा म्हणजे बलात्कार होणार नाहीत.
2 मुलींनी- महिलांनी मोबाइल वापरू नयेत.
3 रिसेप्सेनिष्ट म्हणून मुस्लीम महिलांनी काम करू नये.
4 दर्ग्यात जायला मुस्लीम महिलांवर बंदी.
5 बुरखा वापरल्याशिवाय मुस्लीम महिलांनी बाहेर पडू नये.
6 मुस्लीम महिलांनी- मुलींनी शिक्षण घेऊ नये. नोकर्‍या करू नयेत.
7 परजातीत वा परधर्मात लग्न केले तर ठार मारणे.
8 खाप पंचायतीचे अनेक निकालांत राज्यघटनेविरूध्द वर्तन.
9 शाळेत मुलींना अमूक एक ड्रेस घालायला परवानगी नाकारणे.
10 जम्मू काश्मीर मध्ये मुलींना वाद्य वाजायला व गायला बंदी घालणे.

      फक्त एवढेच आदेश नाहीत. इथे फक्त आठवले ते सांगितले. असे असंख्य फतवे आपल्या रोज वाचनात येतात. हे सर्व प्रकारचे फतवे आपल्या देशाच्या राज्यघटनेविरूध्द आहेत, हे फतवे काढणार्‍यांना आणि ते आमलात आणणार्‍या नागरीकांनाही माहीत नाही की काय असे वाटावे असे आज सर्वत्र भयावह चित्र पहायला मिळते. काही लोक या बातम्या ऐकून-वाचून-पाहून सोडून देतात तर काही लोक या फतव्यांच्या समर्थनार्थ बोलू लागतात, हे त्याहून भयंकर आहे.
      अशा देशांतर्गत खाजगी फतव्यांना नुसत्या कायद्यानेच विरोध करून चालणार नाही तर नागरिकांनी मुद्दाम अशा फतव्यांविरूध्द वागावे आणि फतवा काढणार्‍यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. फतवा काढणारा एखादा लोकप्रतिनिधी असेल तर भारतीय राज्यघटना मान्य नाही म्हणून त्याच्या राजिनाम्याची मागणी करायला हवी. 

    -         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा