शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१३

शाहरूख: एक सामान्य माणूस 
-         डॉ. सुधीर रा. देवरे  

      शाहरूख खानला मी एक थोर कलावंत समजत होतो. थोर अभिनेता समजत होतो. त्याचे काही अभिनय पाहून मी भारावलोही होतो. म्हणूनच काही रिअँलिटी शोंमधून त्याच्या उथळ विनोदांनाही मी त्याचा हजरजबाबीपणा समजून दाद दिली होती. पण परवाच्या आऊटलूक साप्ताहीकामधील त्याच्या लेखातील काही संदिग्ध विधानांनी तो फक्त एक अतिसामान्य माणूस आहे, हे त्याने आपल्या निदर्शनास आणून दिले.
      त्याची ती संदिग्ध विधाने वाचून पाकिस्तानातील कुप्रसिध्द दहशतवादी हाफिस सइद त्याला पाकिस्तानात वास्तव्याला बोलावतो, तर पाकिस्तानचे गृहमंत्री भारताला सल्ला देतात की, भारताने शाहरूखला सुरक्षा व्यवस्था पुरवावी. इतके सारे होऊनही शाहरूख तात्काळ प्रतिक्रिया देण्याचे टाळतो. जेव्हा उशीरा का होईना पण त्याने जी गुळमुळीत प्रतिक्रिया दिली तीत त्याने उघडपणे पाकिस्तानचे नाव घेतले नाही. खरे तर त्याच्या फालतू विधानांमुळे एक दहशतवादी व्यक्ती आणि पाकिस्तान किती धुर्त चाल खेळले हे त्याच्या लक्षात येऊन आपली ही कृती त्याला स्वत:लाच लज्जास्पद वाटायला हवी होती. पण त्याच्या वागण्यावरून तसे अजिबात जाणवले नाही. हे सर्व घडत असताना शाहरूख हा एक अतिसामान्य, उथळ आणि स्वार्थी माणूस आहे हे सिध्द झाले.
      भारतात काही मुठभर लोक आणि मुठभर राजकारणी जातीयवादी, धर्मांध नक्कीच आहेत. अशांमुळे अनेक लोकांच्या भावनेला ठेच लागते हे ही खरे आहे. मात्र अशा मुठभर लोकांसाठी तुम्ही करोडो भारतीयांची मने दुखावता हा कृतघ्नपणा ठरतो. थोर कलावंत म्हणून शाहरूखला हे वागणे अजिबात शोभनिय नव्हते. माय नेम इज खान आणि चक दे इंडिया या सिनेमातील अभिनयाने त्याच्या मानसिकतेत परिणाम झाला की काय अशी शंका येते. हे चित्रपट कला म्हणून मला आवडले. पण शाहरूख त्याला वास्तवता समजतो की काय. आणि असेलच ती वास्तवता तर ती सगळ्या जाती धर्मांसाठी- आणि सगळ्याच अल्पसंख्यांकासाठी- दलितांसाठीही आहे, पण अपवादात्मक. नव्हे, असे अनुभव बहुसंख्यांकानाही येतात. परंतु आपले तारतम्य सुटायला नको हे महत्वाचे.
      मोहम्मद अझरूद्दीन हा भारतीय क्रिकेट टीम मध्ये येताच तो क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातला ताईत बनला होता. त्याच्या गुणवत्तेवर तो कर्णधारही झाला होता. त्याच्यावर मॅचफिक्सींगचे आरोप झाले तरी क्रिकेटप्रेमी त्या आरोपाशी सहमत नव्हते. पण तसा आरोप होताच अझरूद्दीनला आपण अल्पसंख्यांक असल्याचा साक्षात्कार झाला होता. तेव्हा पासून तो माझ्या मनातून उतरला तो अजूनही. तीच गत शाहरूखची.
      माझे असंख्य मुस्लीम मित्र आहेत. हे सगळे सामान्य लोक आहेत. त्यांना कोणत्याही प्रसिध्दीचे वर्तुळ नाही. सुरक्षा नाही. श्रीमंतही नाहीत ते. ‍काही हिंदू- मुस्लीम दंग्यात त्यांना अनेक वाईट अनुभवांनाही सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर कधीही शंका घेतली नाही. त्यांना इथे कधी असुरक्षित वाटले नाही. ज्या घटना घडतात त्या तात्कालीक आणि काही असमंजस प्रवृत्तींकडून होतात, हे ते चांगल्याप्रकारे जाणतात. आपण पाकिस्तानात नाही हे आपले सुदैव आहे, असेही त्यांनी माझ्याजवळ अनेकदा बोलून दाखवले आहे. असे माझे सामान्य मित्र शाहरूखपेक्षा कितीतरी पटीने मनाने श्रीमंत ठरतात आणि सुज्ञही. अशी सुज्ञता शाहरूखला दाखवता आली नाही हे आपल्या धर्मनि‍रपेक्ष भारताचे दुर्दैव.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा