- डॉ. सुधीर रा. देवरे
काही
वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. शिक्षणासाठी मी माझ्या मित्रासोबत एका शहरात खोली
घेऊन राहत होतो. त्यावेळी एका राजकीय पुढार्याची हत्या झाली. शहरात अचानक बंद
पाळण्यात आला. सगळीकडे शुकशुकाट. संध्याकाळी आमची मेस उघडली नाही. सर्व हॉटेली
बंद. सर्व वाहने बंद. कुठून काहीही मिळत नव्हते. कुठून कुठेही जाता येत नव्हते. ही
घटना अचानक घडल्यामुळे खाण्यासाठी आधी काही आणून ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही
त्या रात्री उपाशी राहिलोत.
अशीच
एकदा दंगल झाली आणि कर्फ्यू लागला. यावेळीही आम्हाला खोलीतून बाहेर पडता आले नाही.
आम्ही दिवसभर उपाशी राहिलोत. परवा 18 नोव्हेंबर 2012 या तारखेच्या रविवारी संध्याकाळी
पुण्याहून मला एका विद्यार्थ्याचा फोन आला की, संपूर्ण पुणे बंद आहे. आज आम्हाला
संपूर्ण दिवस उपवास करावा लागला आणि रात्रीही तसेच राहावे लागेल. दुसर्या दिवशी
म्हणजे 19 तारखेला या विद्यार्थ्यांची महत्वाची परीक्षा होती. पुण्याला ही
परिस्थिती तर मुंबईला अशा बाहेर जेवणार्या लोकांचे किती हाल झाले असतील? एखाद्या व्यक्तीची
हत्या होणे जितके वाईट वा नैसर्गिक मृत्यूचा शोक पाळणे जितके रास्त, तेवढेच एखाद्या
सामान्य माणसाला वा विद्यार्थ्याला वेळेवर जेवण मिळणेही गरजेचे आहे. बंदमुळे
आर्थिक नुकसान किती होते हा नंतरचा भाग.
टीव्ही
समोर बसून जेवण करत, नाष्टा करत वा चहा पित बंद एनजॉय करत शोकयात्रा बघणे वेगळे
आणि बंदमुळे उपाशी पोटी घरादारापासून लांब अडकून पडणे वेगळे. ज्यांनी कोणी असे
अनुभव आपल्या आयुष्यात घेतले असतील त्यांच्या बंद विषयीच्या प्रतिक्रिया ऐकून
पहाव्यात.
अशा
पार्श्वभूमीवर सोमवारी 19 नोव्हेंबर 2012 ला एक घटना कळली: रविवारच्या बंद विरूध्द
एका मुलीने फेसबुकवर कॉमेंट केली म्हणून तिला व त्या कॉमेंटला लाइक करणार्या
तिच्या मैत्रिणीला पोलिसांनी अटक केली. पालघर येथील साहीन फारूक धाडा असे या
मुलीचे नाव असून लाइक करणारी रितू श्रीनिवासन नावाची तिची मैत्रिण आहे. (आता
एखादी कॉंमेंट लाइक करतानाही शंभरदा विचार करावा लागेल.)
बंदला
विरोध करणे हा गुन्हा नाही. बंदचा आदेश देणे हा मात्र गुन्हा आहे. बंद पाळू नये असे
कोणी आवाहन करणे हा कधीही गुन्हा होऊ शकत नाही. आज कोणाच्या भावना नेमक्या कशाने
दुखावतील ते काही सांगता येत नाही.
-
डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा