शनिवार, ८ सप्टेंबर, २०१२

साहित्याची जात का साहित्यिकाची जात



- डॉ सुधीर रा. देवरे

         साहित्यिक, विचारवंत, कलावंत यांना जात धर्म नसतो. ते मानवतावादी असतात. पशु, किटका‍दी प्राण्यांवरही साहित्यिक प्रेम करतो. साहित्य आणि साहित्यिक हे वैश्वीक असतात. अनेक साहित्यिकांना देशाच्या सीमा पाळणे सुध्दा कमीपणाचे वाटते. अशा परतत्वस्पर्श क्षेत्रात कालबाह्य जातीयवादी डबके तयार करणे हे कृत्य किती किळसवाणे ठरावे.  जेव्हा एखादा साहित्यिकच जातीयवादी बोलतो, जातीचे समर्थन करतो तेव्हा सर्वसामान्य लोकांनी काय करावे? राजकारणी लोकांनी  जातीपातीचे तट उभे करून देशाचे या आधीच वाटोळे केले आहे. आणि आता आपणही? साहित्यिक हा जातीभेद, धर्मभेद, लिंगभेद, वर्गभेद, देशभेद, वाईट प्रथा यांच्याविरूध्द दंड थोपटणारा असतो. राजकारण्यांनाही चार खडे बोल सुनावू शकतो.
         खरे तर अशा जातीयवादी तथाकथित लेखकांनी आपण साहित्यिक आहोत का? आपल्या साहित्याची जात काय आहे? म्हणजे आपले साहित्य काय दर्जाचे आहे याचे आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. पण तसे न करता म्हणजे तसे करून आपण आपल्याच नजरेतून उतरण्यापेक्षा, आपण ‍श्रेष्ठ साहित्यिक नसलो तरी श्रेष्ठ जातीचे आहोत असा समज करून घेण्यासाठी कोणत्याही कष्टांची गरज नसते. आपल्या वंशश्रेष्ठत्वाचा आश्रय घेणे केव्हाही सोपे असे अशा प्रकारचे जातीय भांडवल करणार्या ‍साहित्यिकाला वाटत असावे.
         ह. मो. मराठे यांची पुस्तके किती प्रगल्भ वा सकस, दर्जेदार आहेत हे या आधीच सर्व ‍साहित्यिक, रसिक, वाचक यांना ज्ञात आहे. आपल्याला अध्यक्षिय मते मिळावीत यासाठी आज ते त्यांच्या साधारण गुणवत्तेच्याही कितीतरी खाली उतरले म्हणून त्यांच्या पोरकटपणाबद्दल वाईट वाटले. विशेष म्हणजे ते आपल्या पत्रकातील वा पत्रातील मजकुरावर ठाम असून त्याचे ते समर्थन करतात की, मी ब्राम्हण असल्यामुळे मला मतदान करा असे मी कुठेही सरळपणे म्हटलेले नाही. व्यंजना, लक्षणा, वक्रोक्ती माहीत असलेला साहित्यिक सांगतो की मी तसे सरळपणे बोललो का? असे बालीश समर्थन फक्त एखादा पाचवीतला मठ्ठ मुलगा करू शकेल. साहित्यिक असलेला माणूस नव्हे.
         अ. भा. साहित्य संमेलनाचे त्याच्या पेक्षा मोठे विकृत अपत्य म्हणजे विश्वसाहित्य संमेलन आणि ओंगळ अनुकरणीय अपत्य म्हणजे गावपातळ्यांवर होणारी असंख्य साहित्य संमेलने. ही दोन्ही संमलने घेणारे महामंडळ एकच आहे. घटना एकच आहे. पण एका संमेलनासाठी निवडणूक होते तर दुसर्यासाठी अध्यक्ष ठरवला जातो. आणि मतदार कोण हा पुन्हा एक संशोधनाचा विषय. कवयित्री इंदिरा संत निवडणूकीत हरल्या आणि साहित्यिक नसलेली व्यक्ती ज्यावेळी निवडून आली तेव्हाच ही संमेलने रद्द झाली पाहिजेत असे मला वाटले होते. पण आता तर कहर झाला. कोणताही साहित्यिक दृष्टीकोन नसलेले आणि एक दोन पुस्तके प्रकाशित झालेल्याला आपण साहित्यिक झालो असे वाटते तर दुसरीकडे फक्त संखेने शंभर पुस्तके प्रकाशित झालेल्या माणसालाही आपण ‍साहित्यिक झालो असे वाटते. आणि म्हणून ह. मो. मराठ्यांसारखे साहित्यिक उत्पन्न होतात. अस्सल साहित्यिकांचा या सर्व घटनांशी काहीही संबध नसतो.
         प्रत्येक साहित्य संमेलन कशाच्या तरी वादात सापडते. पण या वर्षाच्या साहित्य संमेलनाची चर्चा एका नियोजित अध्यक्षाच्या पत्रामुळे इतक्या खालच्या पातळीवर आली की आता आपण साहित्यिक आहोत हे सांगायला लाज वाटावी. सगळ्याच प्रकारची साहित्य संमेलने होणे यापुढे त्वरीत थांबावे असे मनापासून वाटते.

  - डॉ सुधीर रा. देवरे

1 टिप्पणी:

  1. आपल्या ब्लोग वरील सर्वच लेख \ मते छान आहेत.
    टोरांटो येथे होणारे विश्व साहित्य संमेलन, आणि त्या आधीचे हि बरीच वादादित असलेली साहित्य संमेलने, यामुळे काही ठरावीक मंडळींमुळे सर्वसामान्य वाचकांपर्यंत चुकीचा संदेश गेला आहे. पण तरीही आपल्या लेखातील शेवटच्या वाक्याशी मला नम्रपणे असहमती दर्शवावी असे वाटते आहे.

    आपला नम्र वाचक
    श्रीकृष्ण र. पाटील

    उत्तर द्याहटवा