मंगळवार, १५ मार्च, २०२२

कळा सोसत मोकळा...(शेवटचा भाग)

 

-        डॉ. सुधीर रा. देवरे

 

(‘हंस दिवाळी, 2021 च्या अंकात प्रकाशित झालेली कथा) :

                    ...डॉक्टरांनी त्याला आज व्हील चेअरवर बसवायला सांगितलं होतं. दुपारी त्याला दोन मामांनी उचलून व्हील चेअरवर ठेवलं. त्याची लघवीची पिशवी खुर्चीच्या बाजूला बांधली. तो बसून राहिला. कॉटपेक्षा हा बदलही त्याला मानवला. रात्री घेतलेल्या सिरपचा आताशी गुण येतोय असं त्याला वाटलं. अधूनमधून गॅस जाऊ लागला. शौचासही होईल असं त्याला वाटलं. डायपर बांधलेलं होतंच. पण व्हील चेअरवर असल्याने त्याने टॉयलेट होऊ दिली नाही. कॉटवर असताना त्याला वाटायचं की खाली उभं राहिलं की आपण मोकळे होऊ. पण खुर्चीवर बसताच त्याच्या लक्षात आलं की आपल्याला जमिनीवर पाय टेकता येत नाहीत अजून. पायांत सूज आहे. रग आहे. ते शरीराचा भार घ्यायला तयार नाहीत. शौचास होईल असं वाटलं तेव्हा त्याने कॉटवर झोपायचं असं सिस्टरला सांगितलं. मामांनी उचलून त्याला कॉटवर ठेवलं. कॉटवर ठेवताच त्याने शौचास करायचं ठरवलं. बळ करुन प्रयत्न केला. झालीही. पण थोडीशीच. अजून व्हावी असं वाटायचं. पण होत नव्हती. तो पूर्ण मोकळा होत नव्हता. आता आणखी होणार नाही असं लक्षात येताच त्याने नर्सला सांगितलं, टॉयलेट झाली. नर्सने मामाला बोलवलं. मामाने स्वच्छता केली. दुसरं डायपर बांधलं. नंतर त्याला सिरप दिलं गेलं नाही. त्याच्याकडूनही तशी आठवण डॉक्टर- नर्सला केली गेली नाही. म्हणून त्याचं पोट साफ झालंच नाही.

                    दुपारी डॉक्टर रांऊडला आले. त्याला तपासलं. म्हणाले, तब्बेत सुधारतेय तुमची. दोन दिवसांनी सोडून देऊ तुम्हाला. हे ऐकून बरं वाटून तो डॉक्टरांना थँक्यू म्हणाला.

0

                    आयसीयूत त्याच्या कॉटचा नंबर चार होता. रात्री त्याला न सांगता त्याच्या नंबरवरुन त्याचा कॉट हलवला गेला. तो कॉटवर झोपलेला असला तरी जागा होता. त्याने विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता. कुठंतरी कॉट थांबला. तो पडून राहिला. तो काही बोलला नाही तरी हा कॉट चार नंबरवरुन हलवला ते त्याला आवडलं नाही. त्याला राग आला. हातावरची सलाइनची सुई काढून फेकून द्यावी असं त्याला वाटलं. नाकावरचा ऑक्सीजन मास्क काढून फेकावा असंही त्याला वाटलं. टन टन टन... टनऽ टनऽ या संगणकीय संगीताने आज तो मोहून गेला नाही. त्याला ग्लानी आली नाही. थोड्या वेळाने तो जोरात बोलला, कोणी नर्स आहे का इथं?’ नर्सला तिच्या तोंडावर नर्स असं तो पहिल्यांदा म्हणत होता. आजपर्यंत सिस्टर म्हणत आला. सर्व नर्स ओळखू लागल्याने आणि त्याच्या मुलीच्या वयाच्या त्या असल्याने तो त्यांना त्यांच्या नावानेही हाक मारायचा. ड्युटीतली नर्स जवळ आली. तिला तो विद्या या तिच्या नावाने हाक मारायचा. त्याच्या अशा हाकेने तिलाही आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, काय झालं काका?’ काका उल्लेख ऐकून तो वरमला. म्हणाला, विद्या, मला पाणी दे जरा. तिने त्याला पाणी दिलं. कॉटच्या या जागेवरुन त्याने आयसीयूभर इकडे तिकडे पाहिलं. त्याची दिशाभूल झाली होती. आपला कॉट नक्की कुठं होता, त्याला ठरवता आलं नाही. दाराची एंट्री उलटी दिसत होती. उलट्या दारातूनच सकाळी बायको आत आली. म्हणाली, इकडे केव्हा टाकलं.

रात्री. मी कुठं होतो या आधी?’

बोटाने जागा दाखवत बायको म्हणाली, समोर.

          त्याला ओळख पटली नाही. माणूस एका ठिकाणी रमला की त्याला आपलं ‍स्थान सोडू वाटत नाही. मग ते स्थान हॉस्पिटलातले का असेना. त्या जागेवर तो पंधरा दिवस पडून होता. कोणत्याही एका जागेचा लळा लागणं तसं घातकच. माणसाला आपलं स्थान का सोडू वाटत नाही? दवाखान्याच्या कॉटवरुन खरं तर आपण लवकर उठून घरी जायला हवं. पण केवळ जागा बदलण्याचं दु:ख आपण मनाला लाऊन घेतलं. आपण काय इथं परमंनंट आलो आहोत? जागा बदलली तर बदलली. त्याचं काय एवढं. तब्बेत ठीक होण्याशी मतलब. तो मनात म्हणाला.

0

                  सकाळी रांऊडला आलेले डॉक्टर म्हणाले, आज ‍तुम्हाला बाहेर जनरल वॉर्डमध्ये न्यायचंय. जनरल वॉर्डपेक्षा स्वतंत्र खोली घेऊ हे नातेवाईकांनी बाहेर ठरवलं. दुपारी त्याला स्पेशल रुममध्ये हलवलं. चाकांच्या दुसर्‍या कॉटवर त्याला ठेवण्यात आलं आणि त्याच्यासहीत कॉट बाहेरच्या रुममध्ये हलवण्यात आला.

                    रुममध्ये येताच त्याला खूप बरं वाटलं. आपण आता ठणठणीत बरे झालोत अशी त्याने मनाची तयारी केली. पण लघवीची पिशवी परमनंट असल्यासारखी कॉटला बांधली होतीच. म्हणजे नळी पँटच्या आतही होतीच. दहा मिनिटात नाकाला ओटूची नळी लावली गेली. सलाइनस्टँड आला. सलाइन्स सुरु झाल्या. पुन्हा हातावर नवीन जागेवर इन्ट्रा क्याथ तयार केलं गेलं. हाताच्या बोटाला प्रोब लावला गेला. मागे मॉनिटर आला. पोटाला इंजेक्शन्स सुरु झालीत. बीपी घेतला जात होता. बोटातून रक्‍त काढलं जात होतं. त्याला आयसीयूतून बाहेर काढून रुममध्ये ठेवलं एवढाच बदल. स्वतंत्र रुम असल्याने आजूबाजूला पेशंट नव्हते एवढाच बदल. रुममध्ये रात्री टन टन टनचे काँप्युटर संगीतही वाजणार नव्हतं. बाकी ट्रीटमेंट मात्र जशीच्यातशी सुरु होती. आजची तारीख आणि वार काय याची त्याने नातेवाईकांकडे विचारपूस करुन मनात अपडेट होण्याची इच्‍छा केली.

                    त्याला स्वत:च्या पायांवर उभं राहायचं होतं. नातेवाकांना सांगून त्याने वाकर विकत मागवून घेतलं. आताचा कॉट जास्त उंच होता. खाली पाय पुरत नव्हते. नर्सला त्याने कॉटची उंची कमी करायला सांगीतली. नर्स म्हणाली, हा कॉट खाली वर होत नाही. रुममध्ये अजून एक लाकडी कॉट होता. त्याची उंची कमी होती. पेशंट सोबत असलेल्या एका माणसासाठी तो कॉट होता. त्याने नर्सला सांगितलं, मला काही वेळेसाठी त्या कॉटवर तरी हलवा. नर्सने मामाला बोलवलं. मामाने त्याला उचलून दुसर्‍या कॉटवर ठेवलं. कॉटवर ठेवताच त्याला पुन्हा सलाइन, प्रोब, ओटूच्या सगळ्या नळ्या नर्सने जश्याच्यातशा पटापट जोडल्या. माणसाच्या हातातील दोर्‍यांनी तालावर नाचवल्या जाणार्‍या कळसूत्री बाहुल्या त्याला आठवल्या. आपण अशा दोर्‍या बांधलेला बाहुला झालोत की काय. आणि डॉक्टर- नर्स नाचवतील तसं आपण नाचायचं. या सर्व दोर्‍या सांभाळत त्याला चालण्याची प्रॅक्टीस करायची होती. कॉटच्या कडेवर बसत त्याने पाय खाली लांबवले. वाकरला पकडलं. उभं राहण्यासाठी धडपडला. पण त्याला पायांवर भार देऊन उभं राहता येत नव्हतं. चालणं फार लांबची गोष्ट. त्याने उभं राहण्याचा प्रयत्न सोडून दिला.

                    टॉयलेटमध्ये जाऊन पोटभर शौचास करावी असं त्याला आतून वाटत होतं. पोट टम्म फुगलं होतं. दोन पावलांच्या अंतरावर रुममधला टॉयलेट समोर दिसत होता. पण त्याला उभं राहता येत नव्हतं. कंबरेला डायपर बांधलेला होता. त्याने प्रयत्न केला. पण टॉयलेट होत नव्हती. सायंकाळी डॉक्टर तपासायला आले. तपासून म्हणाले, छान प्रगती आहे. तुम्हाला सोमवारी सोडून देऊ. तो थँक्यू म्हणाला. आजचा शुक्रवार. अजून तीन दिवस! बापरे. तो मनात म्हणाला.

डॉक्टर म्हणाले, अजून काही त्रास?’

तो म्हणाला, टॉयलेट मोकळी होत नाही.

अजिबात होत नाही असं नाही ना?’

स्लो मोशन.

मग काही हरकत नाही. त्यासाठी औषधं घेणं चुकीचं ठरेल. होईल ठीक.

                    दरम्यान अॅडमिट केल्यावर डॉक्टरांनी कसं घाबरवलं हे त्याला बायकोकडून समजलं. डॉक्टरांच्या टीममधील एक डॉक्टर म्हणाले म्हणे, केस क्रीटीकल आहे. व्हेंटिलेटरवर ठेवावं लागेल. पंधरा वीस लाख लागू शकतात. पन्नास पर्यंतही जाऊ शकतं बील. तुमची तयारी आहे का? तुमच्याकडे पाहून वाटत नाही की तुम्ही इतके पैसे पेलू शकाल?’ हे आता ऐकून तो अवाक झाला. चालणं बंद झालं होतं, हे खरं. पण आपण सिरीयस होतो असं त्याला वाटत नव्हतं. आजपर्यंत चार लाख लागले होते.            

                    सोमवारी सकाळी नातेवाईकांनी बाकी राहिलेलं हॉस्पिटल बील पेड केलं. दुपारी डिचार्ज घेण्याआधी त्याची लघवीची नळी काढली. नर्सने भरपूर पाणी प्यायला सांगितलं. त्यानेही ती आज्ञा पाळून पाणी पिलं. नळी होती तोपर्यंत लघवी आपोआप व्हायची. त्यामुळे टॉयलेटचं सांभाळता यायचं. नळी काढून तीन तास झाले. लघवी लागली. पण होत नव्हती. पोट तुडुंब फुगलं. पोटात कळा. आधी शौचास व्हावी आणि मग लघवी होईल असं त्याला वाटायचं. तो शौचास होण्यासाठीही बळ करत होता. पण नाही. न राहवून त्याने नर्सला निरोप दिला. नर्सने मामांना बोलवलं. मेडीकल मधून विशिष्ट रबरी नळी मागवण्यात आली. ती नळी पाहताच दोन्ही मामांच्या चेहर्‍यावर नाराजी पसरली. ही चुकीची नळी आहे, हे त्याने ओळखलं. त्याने मामांना विचारलं, काय झालं?’ मामा म्हणाले, काही नाही. नळी रिप्लेस न करता त्यांनी ती नळी पेनीस मध्ये टाकली. त्याला खूप वेदना झाल्या. तो ओरडला. नळी तशीच कशीतरी काढत मामा म्हणाला, आता होईल लघवी. त्याच्या वेदना शांत व्हायला अर्धाएक तास लागला.

              त्यानंतर त्याला थोडीशी लघवी झाली. पोट तुडुंब. मामा आले. म्हणाले, झाली का?’

हो. थोडी झाली. ती नळी चुकीची होती ना?’

हो. तुम्हाला लागलं असेल थोडं.

थोडं नाही. खूप लागलं. तुम्ही ती नळी बदलून का नाही घेतली.

नंतर नर्स रागावतात आम्हाला.

                    तो अचंबीत झाला. काय बोलावं आता. कोणाचा जीव गेला तरी चालेल पण चूक कबूल करायची नाही. आयसीयूतल्या नर्स वेगळ्या. स्पेशल रुम मधल्या नर्स वेगळ्या होत्या. पोट फुगलेलं. कळा. आज हॉस्पिटलातून सोडायचं होतं तर यांनी लघवीची नळी काल का नाही काढली. वेळेवर सगळा गोंधळ. कोणावर रागवावं, त्याला कळत नव्हतं.

                    घरी निघायची वेळ झाली. गाडी केलेली होती. गावापर्यंत जायला कमीतकमी दोन तास लागणार होते. त्याने नर्सला सांगितलं, मला पोटात त्रास होतोय. डॉक्टरांना बोलवा जरा. बर्‍याच वेळाने डॉक्टर आले. सर पोटात खूप कळा येतात. टॉयलेट व्हावी असं वाटतं. होत नाही. डॉक्टरांनी पोट तपासलं. आधी त्यांच्या चेहर्‍यावर जे आहे ते दिसलं. त्यांनी तशी मानही हलवली. पण लगेच भूमिका बदलत त्याला म्हणाले, इतकं काही नाही. जाऊ शकता तुम्ही घरी. दोन तास लागतील ना? निघून जा.

                    त्याने मनाची तयारी केली. त्याला व्हील चेअरवर बसवून मामा गाडीजवळ घेऊन गेले. दोन जणांनी उचलून गाडीत बसवलं. त्याला क्षणभरही बसवलं जात नव्हतं. पोटात असह्य कळा सुरु होत्या. पण लघवी होत नव्हती की शौचास. तो घटक्यात इकडे कलंडायचा तर घटक्यात तिकडे. मूळ आजार विसरुन दुपारपासून ह्या नवीन आजाराला तो तोंड देत होता. पोटातल्या प्रचंड कळा सोसत दोन तास दोन वर्षांसारखे संपवून तो जीव मुठीत धरुन कसातरी घरी पोचला. दोन जणांनी गाडीतून उचलून त्याला घरातल्या कॉटवर झोपवलं. त्याने वरुन पांघरुन घेतलं. बळ करुन शौचास करुन पाहिली. मध्येच अडकून बसली.

                    डॉक्टर वा अन्य कोणाचा सल्ला न घेता त्याने शौचास साफ होण्याचं सिरप मागवून घेतलं. ते बूचभर पिलं. तो रात्रभर तळमळत राहिला. बाळंतीण होऊ पाहणारी बाई जशा कळा घेते, तशा कळा तो मोकळी शौचास होण्यासाठी आज दुपारपासून घेत होता. आता घरी येताच या कळा घेण्याचं प्रमाण त्याने वाढवलं.

                    रात्रभर तळमळत्या ग्लानीत हाच विचार त्याच्या डोक्यात थैमान घालू लागला... हा आजार वेगळा आणि तो आजार वेगळा. आपण डॉक्टरांना उद्या फोन करुन सांगू की हे दोन्ही आजार वेगवेगळे करा. या आजाराचा त्या आजाराशी काडीमात्र संबंध नाही. प्लीज दोन्ही आजारांची एकमेकांशी गल्लत करु नका. हे दोन्ही आजार एकमेकांत गुंतवलेच कसे? आता असं रामबाण औषध द्या की मी पटकन मोकळा होईल. अशा विचारात तळमळतही त्याला समाधान मिळत होतं की दोन्ही आजार वेगवेगळे झाले की आपण चांगले होऊ. रात्रभर जीवघेण्या कळा घेत त्याला मध्येच किंचित शौचास व्हायची. बायकोने पाहिलं तर एक दोन लेंड्या बाहेर पडताना दिसायच्या. पोटात लेंड्या- गठोळ्या झालेल्या होत्या. त्याने बळ केलं की एक दोन गठोळ्या बाहेर पडायच्या. बाकी आत अडकून रहायच्या. सतरा दिवसांपासून या गठोळ्या त्याच्या पोटात साचलेल्या असाव्यात की काय.

                    शेवटी दुसर्‍या दिवशी सकाळी सिरपचा गुण म्हणूनही असेल कदाचित त्याच्या कळा घेण्याच्या प्रयत्नाला यश येऊन... कॉटवर झोपूनच पोटात साचलेल्या सर्व लेंड्या बळ करुन बाहेर फेकायला त्याला यश आलं. आणि पसारा पडलेल्या बाळंतीनबाईची अखेर सुटका व्हावी तसा तो मोकळा झाला.

0

                    घरात त्याचं सगळं काही पलंगावर. चालणं फिरणं दूरच, पण पाय अजून शरीराचा भार पेलून जागेवर सुध्दा उभं राहू देत नव्हते. आता त्याला वार समजतो. तारीख समजते. कोणी पहायला येतं. त्याचं चिंतन सुरु असतं... आपण आजारी आहोत, मरणाच्या दारातून परत आलो हे अनेकांना माहीतही नाही. बाहेरच्या जगात सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत. आपलं काही बरंवाईट झालं असतं तरी बाहेर कोणाला फरक पडला नसता. क्रियाकर्म करुन नातेवाईकांचंही पुन्हा सुरळीत झालं असतं. डॉक्टरांनी आपल्या घरच्यांनाही कल्पना देऊन ठेवली होती, मनाची तयारी करुन ठेवा. घरच्यांना आपण कितीही हवेसे असलो तरी त्यांनीही मन घट्ट केलं होतंच.  

                    सतरा दिवसांच्या गॅप नंतर त्याचा मोबाईल त्याच्या हातात आला. या सतरा दिवसांत फेसबुकवर त्याची आठवण कोणी काढली नव्हती. तो व्हॉटस अॅपवरच्या चार पाच ग्रुपवर आहे. त्याचं चिंतन सुरु झालं... कोणी वारलं की ग्रुपवरचे सगळे सभासद भावपूर्ण श्रध्दांजली वाहून मोकळे होतात. त्या सोबत मोबाईलच्या इमोजीतलीच बिगरवासाची नकली फुलंही वाहतात. विनाखर्च. अनेक लोक भावपूर्ण श्रध्दांजली हे आठ अक्षरं पुन्हा टाईप करण्याच्या भानगडीतही न पडता, आधीच्याने वाहिलेल्या श्रध्दांजलीचे शब्द कॉपी पेस्ट करुन भावना व्यक्‍त करतात. काही फॉरवर्ड करतात. कोणाच्या मृत्यूसाठी आठ अक्षरं पुन्हा टाइप करण्याइतकाही आज कोणाला वेळ नाही. असा आजचा काळ किती प्रचंड गतिमान झाला पहा.    

                    त्याचं चिंतन सुरु... आयुष्य म्हणजे काय? एक लढाईच. मग ती लढाई हॉस्पिटलातली असो की बाहेरची. हॉस्पिटलात डॉक्टर शरीराला भोकं पाडतात. बाहेर समाज मनाला भोकं पाडतो. हॉस्पिटलात शिल्पाचा भास होणं वेगळं आणि जीवनातल्या रोजच्या कामात शिल्प कोरणं वेगळं. बाहेर कुठंही सहज कोणावर निंदेत थुंकता येतं. (काही लोक रागाने म्हणतात, लोक भुंकतात वगैरे.) हॉस्पिटलात आपलंच थुंक आपल्याला नाइलाजाने गिळावं लागतं.

                    सर्वदूर काठोकाठ संघर्षच भरुन आहे. हॉस्पिटलात अंगात औषधं भरत जगायची धडपड करायची. बाहेरही अपमान गिळत- पचवत कसंतरी जगत रहायचं. हॉस्पिटल माणसासाठी तात्पुरतं संजीवनी ठरु शकतं, थोडंफार आयुष्य वाढवतं, पण ते कोणाला कायमचं अमरत्व बहाल करु शकत नाही. वार-  तारीख विसरुनही माणूस जगायचं म्हणून केवळ जगू शकतो, असं हॉस्पिटलकडून शिकता येतं.

                    त्याचं चिंतन सुरु... आपण कायम परावलंबी असतो, हे हॉस्पिटलात जास्त कळतं. आपल्या जन्माला आपण जबाबदार नसतो. आपण कोणामुळेतरी जन्म घेतो. जन्म घेणं आपल्या हातात नाही आणि मरणंही. (आत्महत्येनेच फक्त मरण हातात घेता येतं.) मात्र नेमून‍ दिलेल्या जागेत माणूस रमून जातो हे खरंय. सवयीने कुठंही रमतो माणूस. काही दिवसांच्या सवयीनंतर माणूस हॉस्पिटलातही रमून जातो. जसं आपण आयसीयूत चार नंबरच्या कॉटवर रमलो होतो. आपल्या घरी आपल्या माणसांच्या सवयीमुळे आपण रमतो. आपल्याला वाटतं हेच खरं आयुष्य. प्रेमामुळे माणूस रमतो, असं म्हणणं धारिष्ट्याचं आहे. खरं तर माणूस सवयीत रमतो. सवयीच्या माणसात रमतो.   

                    काही दिवसांपूर्वी- आजारी पडण्यापूर्वी घराच्या खिडकीतून बाहेरच्या डबक्यात लोळणार्‍या डुकरांकडे पहात तो चिंतन करत होता. ते चिंतन या चिंतनात त्याला आठवलं : आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी साचून बाहेर डबकं तयार झालेलं. त्या डबक्यात डुकरांनी लोळून ते आणखी मोठं केलं. या डबक्यात डुकरं कशी काय रमतात? नाईलाजाने डबक्यात लोळतात, का त्यांना मनापासून आवडतं? सांडपाण्याचं डबकं म्हणजे रोगराईला निमंत्रण देणारी किळसवानी जागा. पण डुकरांना ते आवडतं. डुकरांच्या जन्मात डबकं म्हणजे स्वर्ग असावा का? डबकं त्यांना सवयीने आवडतं का उपजत? माणसांचंही तसंच असेल. घर, आपली माणसं, त्यांच्यासाठी राबणं आणि विशिष्ट ध्येयासाठी सतत पळणं, ही खरं तर सगळी डबकीच! कोणाचं डबकं मोठं तर कोणाचं छोटं. माणूस डबक्यात रमतो आणि त्यात तुडुंब लोळण्याला सुख समजतो!  

                    त्याचं चिंतन सुरु... आपण सगळेच कोणाच्यातरी हातातल्या कळसूत्री बाहुल्या. हॉस्पिटलात सलाईन - मुत्र - प्रोबच्या वेगवेगळ्या दृश्य नळ्यांमध्ये बांधून डॉक्टर आपल्याला नाचवतो आणि बाहेर अजून कोणीतरी अदृश्यात. सारांश, आपल्या हातात काहीच नाही! आपलं असणं, जगणं - स्थिती आणि लयही कोणीतरी परस्पर नियंत्रित केलेलं. हे अध्यात्मिक होत चाललं की काय! आपण कोणाच्यातरी प्रयोगशाळेतले अॅप्रेटस- साधन आहोत की काय?... त्याचं हे अखंड चिंतन नेमकं केव्हा संपलं त्यालाही कळलं नाही...

                    ...त्याला आता काही आठवतंच नाही. तो विचार करु शकत नाही. त्याला आजूबाजूचं काही दिसत नाही. ऐकू येत नाही. त्याचं अस्तित्व त्याला स्वत:लाच जाणवत नाही. म्हणून आता तो आहे की नाही? आयुष्यभर कितीतरी कळा सोसत तो शेवटी मोकळा झाला की काय! माहीत नाही...      

                    (प्रकाशित: हंस दिवाळी 2021, कथेचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

३ टिप्पण्या: