मंगळवार, १ मार्च, २०२२

कळा सोसत मोकळा... (भाग दोन)

 

-        डॉ. सुधीर रा. देवरे 

 

(‘हंस दिवाळी, 2021 च्या अंकात प्रकाशित झालेली कथा) :

                    रोज सकाळी मामा पेशंटचे कपडे बदलायचे. बॉडी वाइप्सने अंग पुसायचे. डायपर बदलायचे. नवीन कपडे घालायचे. गादीवरचं बेडकव्हर बदलायचे. यावेळी त्याला या कुशीवरुन त्या कुशीवर वळावं लागायचं. त्यासाठी मामाही सहकार्य करायचे. त्याला ओढलं जायचं. सरकवलं जायचं. आजारामुळे अंग सुजल्याने व अशक्‍तपणामुळे त्याच्याकडून कंबर वर उचललं जायचं नाही की त्याला स्वत:हून पाय खाली- वर करता यायचे नाहीत. या स्वच्छतेच्या दिव्यातून पार पडलं की त्याला बरं वाटायचं.            

                    रुग्णालयात मामा आणि मावश्या महत्वाचा रोल निभावतात. नर्सने मामाला हाक मारली की समजावं, कोणत्या तरी पेशंटला टॉयलेट झाली. डायपर बदलायचं आहे. स्वच्छता करायची आहे. नर्सने मावशीला हाक मारली की समजावं, कोणाला तरी थुंकायचं आहे. जमिनीवर काहीतरी पडलं ते स्वच्‍छ करायचं आहे. मावश्या आणि मामा फरश्या पुसतात. मेडीकल कचर्‍याची विल्हेवाट लावतात. मामा रोज सकाळी पेशंटची बॉडी वाइप्सने स्वच्‍छता करतात. पेशंटचे कपडे बदलतात. मामा हा कोणी एकच नाही. मावशी ही कोणी एकच नाही. एका वेळी दोन तीन मामे आणि दोन तीन मावश्या ड्युटीवर असतात. नुसतं मामा म्हटलं की कोणीतरी मामा हजर होतो. विशिष्ट नावाने हाक मारताना, गांगुर्डे मामा, इकडे या. असंही म्हटलं जातं. थोडक्यात हॉस्पिटलात मामा मावशींशिवाय सिस्टर्सचे पान हलत नाही. मामा मावशींचं त्यांना सहकार्य हवं असतं. मामा मावशी हे प्रेमाचं नाव नसून हॉस्पिटलात ती एक केडर आहे. ड्युटीवर असणार्‍या मामांच्या अंगात लाल शर्ट असतो. त्याच्या मागे लिहिलं असतं, गॅस वर्क. (शौचास- लघवीला गॅस म्हणत असावेत.) लग्नात जसं नात्याच्या मामा मावशींशिवाय कामं पुढे सरकत नाहीत तसं इथंही पहायला मिळतं. आया फुकती बाया फुकती, फुकती मामा मावश्या हे लग्नातलं तेलन पाडायचं गाणं त्याला आठवलं. लग्नात जसे नवरदेव- नवरीमागे मामे उभे राहतात तेव्हाच लग्न लागू शकतं. तसं इथंही प्रत्येक पेशंटच्या मागे मामा असतो म्हणून तर तो पेशंट आतून विधी मोकळा करु शकतो. स्वच्‍छ राहतो. लग्नात जसा मामा मावश्यांच्या बोलण्याचा कलगा उठतो, तसा वणका इथंही होतो. आपण आयसीयूत आहोत हे विसरुन मामा मावश्या घरातल्यासारखं मोठमोठ्याने बोलू लागतात.

                    प्रेमाची चावळ होते तशी आपसात धुसफुसही. नर्स आणि नर्स मध्ये संघर्ष होतो. नर्स आणि मामांमध्ये संघर्ष होतो. नर्स आणि मावशीत संघर्ष होतो. नर्स आणि डॉक्टर मध्येही संघर्ष होतो. एक डॉक्टर समोरच्या रांगेतले पेशंट तपासायला आले. तिथं बराच वेळ ते नर्सशी बोलत होते. नर्सकडून काहीतरी चुकलं असावं. डॉक्टर संतापले. नर्सला यू ब्लडी म्हणाले. नर्स मल्याळम होती. नर्सने लगेच मल्याळम भाषेत डॉक्टरला जोरात शिव्या द्यायला सुरवात केली. नंतर त्या डॉक्टरला समजाव्यात म्हणून तिने हिंदीतही शिव्या दिल्या. ग्रामीण भाषेत बारा टिकल्यांचा अशी एक शिवी आहे. तश्या तिच्या शिव्यांत बाराचा उल्लेख आला. डॉक्टरला त्या पेशंटचं छोटंसं ऑपरेशन करायचं होतं. पण नर्स त्याला शिव्या देत होती. दुसरे एक डॉक्टर कानात शिव्या झेलणार्‍या त्या डॉक्टरला बाहेर घेऊन गेले. मग दुसर्‍या डॉक्टरने येऊन ते ऑपरेशन केलं. तीच नर्स त्या दुसर्‍या डॉक्टरला सर्व मदत करत होती.

                    सकाळी जाग आली तेव्हा त्याला वाटलं, आपल्याला हॉस्पिटलात आल्यापासून आज पहिल्यांदा छान झोप लागली. त्याने डोळे उघडून समोरच्या मशीनकडे पाहिलं. त्याला आ‍ता पहिल्याच दृष्टीक्षेपात स्त्री‍ शिल्प न दिसता ते जसंच्या तसं वास्तव मशीनच दिसलं. त्याला आनंद झाला. मनात म्हणाला, आपली तब्बेत सुधारण्याचं हे लक्षण असावं! बायको आली. त्याने पलंगावरच ब्रश केला. टबात गुळण्या केल्या. उकडलेलं अंडं खाल्ल. चहा पिला. आपली तब्बेत सुधारत असल्याचा अनुभव तो आतून घेऊ लागला. अॅलोपॅथीतले साइड इफेक्टस् काढून टाकण्यात कुणाला यश आलं तर पुढे अॅलोपॅथी मानवजातीसाठी संजीवनी ठरु शकेल! त्याला मनातल्यामनात हे सुचलं.

                    आपल्या कॉटवरुन आख्या आयसीयूतल्या पेशंटस् कडे तो आळीपाळीने सहज लक्ष देऊन पहात होता. त्याच्या समोरचा एक पेशंट जो त्याच्याच आजाराने- व्हायरल निमोनियाने- आजारी होता. पलंगाची डोक्याकडची बाजू वर केल्यामुळे आरामखुर्चीवर बसल्यासारखा दिसत होता. सकाळी त्या पेशंटची मान जशी एकीकडे अतोनात कलती झालेली त्याने पाहिली, आत्ता सुध्दा तशीच होती. त्या पेशंटची कोणतीही हालचाल त्याला दिसत नव्हती. तो झोपलेला आहे असंही वाटत नव्हतं. नंतर लवकरच त्याच्यासाठी नेमणुकीतल्या नर्सच्या लक्षात आलं की तो आता राहिला नाही. तिने डॉक्टरांना कळवलं. त्याच्या तोंडावरुन पांघरण्यात आलं आणि नंतर त्याला स्ट्रेचरवरुन बाहेर हलवण्यात आलं.

                    प्रत्येक तीन पेंशटस् ना एक नर्सची ड्युटी लावलेली. नर्स सिरियस असलेल्या पेशंटला जास्त वेळ द्यायच्या. बरा होत आलेल्या पेशंटकडे दुर्लक्ष व्हायचं. बरा होत आलेल्या पेशंटने पाणी मागीतलं की नर्स म्हणायची, पाच मिनिट हं. अर्धा तास होऊनही तिचे पाच मिनिट संपायचे नाहीत. पेशंटजवळ नातेवाईकांना जास्त वेळ थांबू देत नसत. नातेवाईकाने खाण्यासाठी काही आणून दिलं की ते पेशंटला नर्सने द्यायचं असा नियम. नातेवाईक बाहेर आणि नर्स म्हणायची, पाच मिनिट थांबा.

                    जसं काही घडलंच नाही अशा पध्दतीने बर्‍याचदा एका पेशंटच्या वस्तू दुसर्‍या पेशंटसाठी वापरल्या जातात. एका पेशंटचे डायपर दुसर्‍या पेशंटला वापरलं जातं. एका पेशंटने मागवलेले हातमोजे दुसर्‍या एखाद्या पेशंटसाठी वापरले जातात. यात नर्स आणि मामा यांचा विशेष रोल असतो. त्याच्या समक्ष त्याने मागवलेले डायपर आणि हातमोजे मामा- सिस्टर्स इतरत्र वापरत. हाताच्या सूजेला लावण्याचं त्याचं औषध सहजपणे इतर पेशंटना वापरलं जायचं. न बोलता तो विकतची गंमत पहात राहायचा.

                    तोंडावरुन पांघरुन घेतलं की त्याला झोप लागायची. म्हणून तो सिस्टरला सांगायचा, हे ब्लँकेट तोंडावरुन टाकून द्या. नर्स म्हणायची, तोंडावरुन नाही टाकत. पण मी नाकापर्यंत टाकून देते. दवाखान्याच्या भाषेत, ज्याच्या तोंडावरुन पांघरुन.. तो गेला. म्हणून नर्स असं करायचं टाळायच्या. नंतर तो हळूच आपल्या नळ्या जोडलेल्या हातांनी पांघरुन कपाळापर्यंत ओढून घ्यायचा.

                    एके दिवशी सिस्टर ऐवजी त्याच्या देखरेखीसाठी ब्रदरची ड्युटी होती. ब्रदरने सलाइन लावली. सलाइन मध्ये इंजेक्शन देण्यासाठी बाटलीत सिरींज खुपसून इंजेक्शनमध्ये औषध भरलं. इतक्यात ब्रदरला कोणीतरी हाक मारली.  औषध भरलेलं इंजेक्शन तसंच छोट्या टेबलावर ठेऊन ब्रदर बोलवणार्‍याकडे घाईत निघून गेला. त्याला इलेक्ट्रिशियन- लाईनमन- वायरमन लोक आठवले. या लोकांना कोणी हाक मारली की ते हातातले काम सोडून आणि प्लायर- पकड खाली फेकून केव्हाही बाहेर निघून जातात. अशा वायरमनसारखाच हा ब्रदर वागला. अर्धा तास होऊनही तो आला नाही. नंतर काही वेळाने ब्रदर त्याला आयसीयूमध्ये दिसला. मात्र तो इकडे फिरकत नव्हता. ब्रदरला टाइमपास करताना पाहून त्याचा पारा आणखी चढायला सुरुवात झाली. त्याने शेजारच्या पेशंटच्या नर्सला हाक मारली, सिस्टर, ब्रदरला जरा बोलवता का?’ तिने त्याला आवाज दिला. ब्रदर, काका बोलवतात. ब्रदर तिथूनच म्हणाला, बघ ना काय म्हणतात ते. नर्स म्हणाली, काय पाहिजे काका?’ तो म्हणाला, मला ब्रदरशीच बोलायचं आहे. त्यांना बोलवा. नर्सने तिथूनच ब्रदरला सांगितलं, मला नाही सांगत. त्यांच्याशीच बोलायचं म्हणे. मग ब्रदर जवळ आला. काय झालं सर?’

तुम्ही सलाइनमध्ये इंजेक्शन देण्यासाठी औषध घेतलं होतं ना सुईत?’

हो.

मग ते तसंच टाकून निघून गेलात बाहेर?’

त्याला वेळ आहे सर. तीन तासात केव्हाही दिलं तरी चालतं.

मग जेव्हा सलाइनीत टाकायचं होतं, तेव्हाच घ्यायचं ना. असं सुईमध्ये काढून तुम्ही इकडे तिकडे निघून जातात हे बरं नाही.

ब्रदर शरमला. सॉरी म्हणत ते इंजेक्शन त्याने सलाइनीत खोचलं.

                    आता बर्‍याच नर्स त्याला चांगल्या ओळखू लागल्या होत्या. त्याचा मुक्काम आयसीयुमध्ये बर्‍यापैकी वाढला होता. तो ट्रिटमेंटला चांगलं सहकार्य करतो अशी डॉक्टरांमध्ये आणि सिस्टर्समध्ये त्याची ख्याती झाली होती. या सहकार्यामुळे त्याची तब्बेत पूर्ववत व्हायला मदत होत होती. त्याला समोर घड्याळ दिसायचं. किती वाजले ते कळायचं. रात्रीचा वेळ की दिवसाचा ते ही कळायचं. पण तारीख आणि वार हरवले होते. कोणता वार, कोणती तारीख त्याला कळत नव्हतं. तारीख, वार समजून तरी काय होणार होतं? असंख्य कामं सोडून आपण हॉस्पिटलात झोपलो आहोत. इथून बाहेर पडणं आपल्या हातात नाही. आपण वाचतो की मरतो हे ही आपल्या हातात नाही.

                    आतापर्यंत सलाइन लावायची मुख्य सुई- इन्ट्रा क्याथ चारदा बदलून झालं होतं. हातांच्या केसांमुळे त्याला प्रचंड वेदना व्हायच्या. आताच्या सुईतूनही आत सलाइन जात नव्हती. सलाइनकडे त्याचं स्वत:चं लक्ष असायचं. औषधाचे थेंब पडणं बंद झालं की तो सिस्टरला सलाइन बंद पडल्याचं सांगायचा. आताची जी नर्स ड्युटीवर होती तिलाही त्याने सलाइन बंद पडल्याचं दाखवून दिलं. म्हणून तिने इन्ट्रा क्याथ दुसरीकडे करायचं ठरवलं. ती म्हणाली, इन्ट्रा क्याथ बदलावं लागेल. सिरींज औट झाली. पण प्रत्येक वेळी त्याची व्हेन लवकर सापडत नव्हती. तिने मदतीला दुसरी नर्स बोलवली. हातावरच्या केसांचा जास्त त्रास होणार नाही म्हणून तिने हाताच्या दुसर्‍या पालथ्या बोटाच्या टोकाला ती सुई टोचायचं ठरवलं. त्यानेही सहकार्य केलं. त्या सुईला बँडेजसारखं लालसर कापड गुंडाळून झाल्यावर त्याच्या बोटाचा पुढचा भाग विशिष्ट पध्दतीने फुगलेल्या बोंडासारखा दिसू लागला, आणि मागे सरळ बोट. तयार झालेलं इन्ट्रा क्याथ त्या सिस्टर्सना अश्लील वाटू लागलं असावं.

                    दोन्ही नर्स आपसात हसू लागल्या. त्याला वेदना व्हायच्या आणि नर्स हसायच्या. आपसात कमेंट करायच्या. त्याला थोडीफार कल्पना येऊन चुकली की यांना काय म्हणायचं. सिस्टर्सची ड्युटी बदलली तरी ह्या बोटावरचं इन्ट्रा क्याथ पाहून नवीन नर्सही हसायच्या. हे कोणी बनवलं?’ म्हणून त्याला विचारायच्या. एक नर्स दुसरीला काहीतरी त्या बोटाबद्दल बोलली. तेव्हा दुसरी पहिलीला म्हणाली, फिलींग काय होतंय ते सोड, वेदना किती होतात त्यांना. आणि त्या दोन्ही जणी हसू लागल्या.

                    नंतरच्या दिवशी ही सुईही काम करीनाशी झाली. डॉक्टरांच्याही ते लक्षात आलं. त्यांनी नर्सला हातावर मागे इन्ट्रा क्याथ करायला सांगितलं. आतापर्यंत त्याचे दोन्ही हात सुजले होते. लाल काळे झाले होते. गांधील माश्या चाऊन गेल्यासारखे त्याचे दोन्ही हात दिसत होते. आता ड्युटीला आलेली नर्सही हसत हसत त्याला म्हणालीच, हे कोणी केलं होतं. खुपच छान दिसतं. तो तिला म्हणाला, मला वेदना होतात ग बये आणि तुम्हाला कुठल्या फिलिंग होतात?’ ती जोरात हसली म्हणून प्रतिसादत तो ही हसला. आजारी पडल्यापासून पहिल्यांदा हसला होता तो. त्या नर्सने त्याच्या हातावरचे केस रेझरने काढले. व्हेन सापडवली आणि नवीन इन्ट्रा क्याथ तयार केलं. त्याला सुईच्या वेदना झाल्या पण इलाज नव्हता. आधीचं बोटावरचं अश्लील इन्ट्रा क्याथ बोंड तिने हसत हसत काढून टाकलं.

                    नर्सची शिप्ट बदलली की पहिली नर्स दुसरीला चार्ज द्यायची. ड्युटीत त्या पेशंटला कोणत्या गोळ्या दिल्या, काय औषधे दिली, सलाइनीत कोणती इंजेक्शने दिली, कशाची अॅलर्जी आहे, बीपी, लघवी‍ किती वगैरे रोज विहीत नमुन्यातील कागदांवर लिहून ठेवायचं असे. त्याप्रमाणे एक दुसरीला चार्ज द्यायची. पहिली नर्स दुसरीला सांगू लागली, पेशंटचं नाव अमूक. व्हायरल निमोनिया, लघवी शंभर, बीपी नॉर्मल, अजून थोडा दम लागतो, थोडा खोकला, कायम ऑक्सीजन मास्क ठेवायचं. तीन चमचे प्रोटीन पावडर दिवसातून तीन वेळा पाण्यातून किंवा दुधातून, सायंकाळी व्हीटॅमिनच्या दोन गोळ्या द्यायच्या, आणि पेशंटला... तिचं बोलणं तोडत ड्युटीवर आलेली नर्स मध्येच म्हणाली, पोथी नको वाचू गडे. एकतर माझ्या डोक्यात आज खिचडी शिजतेय. येणार नव्हती ड्युटीवर. पण आली. दोन चार शब्दांत सांग महत्वाचं काय ते. पहिली नर्स दुसरीला पुढं काही बोललीच नाही. आपले तीन पेशंट कोणते ते तिला बोटाने दाखवून ती निघून गेली.

                    त्याच्या जवळ एक थोराड बाई आली. तिने त्याचे पाय पाहिले. पाय सुजलेले होते. कंबर पाहिलं. त्याला एका कुशीवर वळवलं. त्या बाईंनी त्याच्या कंबरेवरुन पाठीवरुन हात फिरवला. तिच्या दोन्ही पालथ्या हातांनी चापटी मारल्यासारखं केलं. ही फिजिओथेरपी असावी. सारखं उताणं झोपून त्याच्या पायात आणि कंबर- पाठीला रग आलेली होती.‍ ‍ती म्हणाली, अर्धा तास या कुशीवरच पडून रहा. नंतर त्या कुशीवर अर्धा तास. हे तिने त्याच्या नर्सलाही सांगितलं. तो आता उजव्या कुशीवर होता. तसाच पडून राहिला. अर्ध्या तासाने तो हळूहळू कोणाची मदत न घेता अंगावरच्या सगळ्या नळ्या सांभाळत डाव्या कुशीवर झाला. पडून राहिला. हा बदल त्यालाही बरा वाटत होता.

                    दुपारी एक डॉक्टर आले. त्याला तपासत त्याचे पोट दाबत म्हणाले, संडास होते?’ तो म्हणाला, नाही

कधीपासून नाही

अॅडमिट झाल्यापासून एकदाच झाली.

आज झाली तर ठीक नाहीतर रात्री अॅनिमा द्यावा लागेल. डॉक्टरने नर्सला सांगितलं. त्याला पोट फुगल्यासारखं वाटायचं. शौचास करावी असं वाटायचं. पण व्हायची नाही. आपल्याला या कॉटपासून मुक्‍त केलं तर आपण खाली उभं राहताच आपल्याला मोकळी शौचास होईल असं त्याला वाटायचं. पण आता त्याला तसं करता येणार नव्हतं. तो त्या कॉटला पूर्णपणे बांधला गेला होता. हातांची जास्त हालचाल केली की इन्ट्रा क्याथ औट व्हायचं. सलाइनच्या नळ्या, ऑक्सीजन मास्कची नळी, लघवीची नळी आणि त्या नळीला जोडलेली कॉटला बांधलेली लघवीची प्लॅस्टीक पिशवी, बोटाला लावलेलं प्रोब आणि त्याची वायर. या सर्वांनी आपल्याला कॉटला बांधून ठेवलंय, तो मनात म्हणाला. हात, पाय, पोट सुजलंय, त्याच्या लक्षात आलं. मुरगळलेला पाय सुजावा तशी सुज पायांवर होती. पाय बेगडीच्या कागदासारखे पांढरेफटक पडले होते. सापाने टाकलेल्या कातीसारखा तो दिसत होता.

                    बायको जेवणाचं देऊन गेल्यावर आणि पोट फुगलेलं म्हणून थोडंफार खाऊन झाल्यावर रात्री तो नर्सला म्हणाला, अॅनिमा द्यायचा होता ना?’ नर्स म्हणाली, डॉक्टरांनी आता सिरप द्यायला सांगितलं. अॅनिमा नाही. नर्सने त्याला लगेच बुचभर सिरप दिलं. त्याने ते पिऊन टाकलं. तो पलंगावर रेलला. डोक्याकडची बाजू सिस्टरला खाली घ्यायला सांगितली. तो डोळे लाऊन पडून राहिला. टन टन टन... टनऽ टनऽ. काँप्युटर संगीत वाजू लागलं. त्याचे डोळे जड होत तो झोपून गेला. (अपूर्ण)

                    (प्रकाशित: हंस दिवाळी 2021, कथेचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा