बुधवार, १ एप्रिल, २०१५

पुस्तक प्रकाशनाचा प्रयोग


 
- डॉ. सुधीर रा. देवरे

       माणूस जेव्हा देव होतो ह्या नावाचा माझा संदर्भ ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला. (ज्याच्या प्रकाशन समारंभाला मात्र मी स्वत:च उपस्थित नव्हतो.) या आधीची माझी प्रकाशित असलेली सर्व नऊ पुस्तके महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा वेगवेगळ्या प्रकाशकांनी प्रकाशित केली आहेत. ग्रंथाली, पद्मगंधा, शब्दालय, भाषा अशी ही प्रकाशने आहेत. मात्र माणूस जेव्हा देव होतो हे पुस्तक प्रकाशकांकडे पाठवले तर त्यांनी पुस्तक प्रकाशित करायला असमर्थता दाखवली. एका स्थानिक वीरगळाच्या निमित्ताने हे पुस्तक असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात ते कोण वाचेल, म्हणजेच ते कसे विकले जाईल हा प्रकाशकांपुढे व्यावसायिक प्रश्न होता. (खरे तर हे पुस्तक प्रातिनिधीक देवत्वाचे चिंतन करणारे आहे. लोकधाटी, लोकश्रध्दा, लोकजीवन समजून घेत संशोधनात्मक साधने वापरली असल्याने हा ग्रंथ केवळ स्थानिक म्हणता येणार नाही.)
         हा ग्रंथ स्थानिक एका वीरगळाच्या निमित्ताने लिहिला असल्यामुळे याला माझे नेहमीचे प्रकाशक लाभणार नाहीत हे नक्की होताच यातून मार्ग काढण्यासाठी कोणी प्रायोजक शोधावा का, असे मनात आले. लोकजीवनातील लोकश्रध्दा उपयोजित होत संशोधनाच्या वाटेने जाणारा व वैश्वीक देवत्वाचा विचार मांडणारा हा ग्रंथ प्रकाशित व्हायला हवा, असे मला वाटत होते. म्हणून प्रकाशनासाठी काय करावे हा मला प्रश्न पडला होता.
         मनात विचार आला की स्थानिक वीरगळाच्या एखाद्या भक्‍ताकडे पुस्तक प्रकाशित करण्याची विचारणा करावी का? म्हणजे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी स्वत: पैसा खर्च करावा. बदल्यात पुस्तकाच्या शेवटी त्यांचा प्रायोजक म्हणून अल्प परिचय आणि फोटो छापावा. या पुस्तकाच्या छपाईसाठी त्यांनी परस्पर खर्च केला असा परिचयात स्पष्ट उल्लेख करावा. कल्पना माझीच मला छान वाटली. पण कोणाला विचारायला संकोच वाटत होता. आजपर्यंत कोणाकडे काहीच मागितले नाही आणि आता एकदम पुस्तक प्रकाशनाची गळ कशी घालायची? मनातल्यामनात साधकबाधक विचार करून ज्या स्थानिक वीरगळाच्या निमित्ताने हा ग्रंथ लिहिला त्या देव मामलेदारांच्या एका भक्‍ताला घरी बोलवून माझी ही संकल्पना त्यांना सांगितली. त्यांना हे ही स्पष्ट सांगितले की, हा ग्रंथ म्हणजे पोथी नसून देवाच्या मीमांसेचा वैचारिक ग्रंथ आहे. म्हणजे काही गोष्टींवर टीका आहे. योगायोगाने माझे म्हणणे पहिल्याच भक्‍ताने मान्य केल्यामुळे मला इतर भक्‍तांकडे तसा शब्द टाकण्याची पुन्हा वेळ आली नाही. (त्यांनी नाही म्हटले असते तर दुसर्‍या भक्‍ताला तसे सांगण्याची माझी कधी हिम्मतही झाली नसती.)
         मात्र ग्रंथ प्रकाशनासाठी मला काही तडजोडी कराव्या लागल्यात. उदाहरणार्थ, पुस्तकाचा मुद्रक हा प्रायोजक भक्‍ताने स्वत: शोधल्यामुळे माझ्या मनातल्या ग्रंथाची संकल्पना मला सोडून द्यावी लागली. पुस्तक सर्वसामान्य पुस्तकाच्या आकाराऐवजी दिवाळी अंकाच्या आकारात छापले गेले. छपाई करणारे लोक सराईत नसल्याने प्रुफ तपासणी मला स्वत:ला पाच वेळा करावी लागली, तेव्हा कुठे पुस्तकातल्या चुका कमी झाल्या. पुस्तक छपाईला खर्च करणार म्हणून प्रायोजकाचा फोटो आणि परिचय पुस्तकामागे मी देणार होतोच. तो दिला. पण त्या खर्चासाठी प्रायोजकांनी स्वत: काही जाहिराती परस्पर गोळा केल्या आणि नंतर (तीन वेळा प्रुफ तपासणी झाल्यावर) मला तसे सांगितले. जाहिराती छापण्यासाठी (मुद्रणाची प्रक्रिया पुढे गेल्यामुळे) मला नाइलाजाने होकार द्यावा लागला. पुस्तक प्रकाशनाची चर्चा करताना पुस्तकात अशा जाहिरातींच्या समावेशाचा प्रायोजकांनी माझ्याजवळ उल्लेख केला नव्हता. आणि मी ही जाहिरातींचा विचार केला नव्हता. यातल्या यात मला एकच समाधान मिळाले की पुस्तकात जाहिराती छापल्या तरी माझ्या म्हणण्याप्रमाणे त्या सर्व जाहिराती पुस्तकाच्या शेवटी छापल्यात. पुस्तकाच्या सुरूवातीला आणि मध्यभागी जाहिराती छापण्याचा प्रयत्न झाला, पण मी तसे होऊ दिले नाही.
         इतके सारे होऊनही (माझ्या मते पुस्तक प्रातिनिधीक असले तरी) मला स्थानिक पातळीवरचे पुस्तक प्रकाशित करता आले याचे मी समाधान मिळवू पाहतो. कारण अशा तडजोडी केल्या नसत्या तर हे पुस्तक प्रकाशनाअभावी घरात पडून राहिले असते. अशा पध्दतीने मी माझ्या एका पुस्तक प्रकाशनाचा प्रयोग यशश्वी केला का? खरे तर हे पुस्तक माझ्या प्रकाशकांच्या म्हणण्याप्रमाणे स्थानिक पातळीवरचे आहे असे मी मानायला तयार नाही. एका ‍वीरगळाच्या निमित्ताने असले तरी महाराष्ट्रभर वा जिथे जिथे मराठी माणूस आहे अशा वैश्वीक जगात हे पुस्तक उपरे ठरणार नाही असे मला वाटते. कारण या वीरगळाच्या निमित्ताने लिहिलेला हा समग्र वैश्वीक देवत्वाचा ग्रंथ आहे. स्थानिक पातळीवरील फक्‍त एका देवाचा नाही. हा ग्रंथ फक्‍त आस्तिकासाठी नाही, तर नास्तिकासाठीही आहे. या ग्रंथात विचार आहेत. पुराण नाही. यासाठी दंतकथांचा शेंदूर, चमत्कार मीमांसा, देव आणि माणूस, तेहतीस कोटी देव आदी प्रकरणे वाचलीत तरी पुस्तकाच्या वैचारिक व संशोधनात्मक अधिष्ठानाचा प्रत्यय येईल.
         आज सगळ्याच प्रकाशकांकडे छापण्यासाठी पुस्तकांची प्रचंड रांग लागलेली असते. म्हणून अनेक चांगली पुस्तके पाच पाच वर्ष प्रकाशकांकडे नुसती पडून असतात. या पार्श्वभूमीवर पुस्तक प्रकाशनासाठी असे प्रायोजक शोधावेत का? प्रकाशनासाठी पुस्तकाच्या मागे अशा जाहिराती छापून दर्जेदार पुस्तके उजेडात आणण्याचे प्रयोग करावेत का? असे काही प्रश्न या निमित्ताने पुढे येतात. प्रायोजकांनी पुस्तके प्रकाशित केलीत तर पुस्तकाच्या किमतीही आटोक्यात येऊ शकतील आणि सामान्य माणसापर्यंत पुस्तक पोचेल. या प्रयोगावर सखोल चर्चा व्हावी. 
       (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या
ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.) 

     -  डॉ. सुधीर रा. देवरे   
           इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा