शनिवार, १४ मार्च, २०१५

संस्कार म्हणजे काय

- डॉ. सुधीर रा. देवरे
         संस्कार म्हणजे काय? संस्कार हे सापेक्ष असतात का? संस्कार हे सुसंस्कारच असतात का? खरे तर संस्कार या शब्दातच सु ही गृहीत धरलेली संज्ञा आहे. तरीही संस्कारात सुसंस्कार आणि कुसंस्कार अशी वर्गवारी करता येईल का? संस्कार हे कृत्रिम असतात का नैसर्गिक असतात? निसर्गाला अनुसरून असणारे संस्कार कोणते आणि निसर्गाच्या विरूध्द असणारे संस्कार कोणते? संस्कारांनी माणसाचा देव होतो का? होत असेल तर संस्कारांनीच माणसाचा राक्षस होतो का? होत असावा. कारण संस्कारानेच दहशतवादी वा मानवी बाँब स्वखुशीने तयार होतात.
         रोज मंदिरात जाणे, रामरक्षा म्हणणे, त्रिसंध्या करणे, प्रार्थना म्हणणे, पोथ्या वाचणे, आरत्या म्हणणे, उपवास करणे, सत्संग करणे, जानवे घालणे, मुंज करणे याला पारंपरिक अर्थाने संस्कार म्हटले जाते. इतर धर्मातील याच पध्दतीची विशिष्ट कर्मकांडे करणे यालाही त्या त्या धर्मात संस्कार म्हटले जातात. अशा धार्मिक कर्मकांडांनाच फक्‍‍त संस्कार म्हटले पाहिजे का संस्कारात यापेक्षा विशाल दृष्टीकोन असू शकतो? असे संस्कार विशिष्ट गटांसाठी आहेत की सार्वत्रिक ठरतात?
         आजच्या अर्थाने रोज प्रमाणापेक्षा जास्त पाणी वापरणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? प्रमाणापेक्षा जास्त वीज वापरणे वा वीज चोरी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का?  घराच्या आजूबाजूला झाडे न लावणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? झाडे तोडणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? येता जाता रस्त्यावर थुंकणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? भर रस्त्यावर वाहणे उभी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? सार्वजनिक जागी अस्वच्छता करणे वा कचरा टाकणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? एखाद्याला घरातून बाहेर बोलवण्यासाठी कॉलनीत जोराने हॉर्न वाजवणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? सुसाट वाहने चालवणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? वयाच्या अठरा वर्षाच्या आत मुलांजवळ वाहने चालवायला देणे हे चांगले संस्कार आहेत का? महिलांशी बळजबरी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? ध्वनी-वायु-जल प्रदुषण करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? सभ्य भाषेत न बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? खोटे बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? न्यायालयात धर्मग्रंथाची शपथ घेऊन खरे बोलण्याच्या आविर्भावात खोटे बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का?
         आपल्या मागण्यांसाठी आंदोलने करताना सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणे वा जाळपोळ करणे हे चांगल्या संस्काराचे लक्षण आहे का? लाच घेणे- देणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? हुंडा घेणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? प्रमाणापेक्षा जास्त नफा घेणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? साठेबाजी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? आपल्या कळपाविरूध्द असलेल्याला कोंडीत पकडणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? कोणाला त्याच्या व्यंगावरून बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? आपल्या देशात कशावरही उठसूट नवनवीन कायदे करावे लागतात हे नागरिकांच्या चांगल्या संस्काराचे लक्षण आहे का?
         सारांश, जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात जे वागणे सुसंस्कृत वाटेल त्यालाच संस्कार म्हणता येतील. संस्कार हा आपल्या घरापेक्षा, आपल्या जातीपेक्षा आणि आपल्या धर्मापेक्षा खूप मोठा असतो. अशा वैश्वीक संस्कारांची आज गरज आहे.
         (यातील मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
-         डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा