गुरुवार, १६ एप्रिल, २०१५

घुमान साहित्य संमेलन


-         डॉ. सुधीर रा. देवरे


साहित्य संमेलन असले की अनेक मित्र विचारत असतात, साहित्य संमेलनाला जाणार आहात का? संमेलनाला गेले होते का? नाही सांगितले तर का नाही जाणार? का नव्हते गेले? साहित्यिक असले म्हणजे साहित्य संमेलनांना हजेरी लावलीच पाहिजे असे अनेकांना वाटत असते. साहित्य म्हणजेच साहित्य संमेलन असे समजले जातेय की काय? साहित्य संमेलनांच्या व्यासपीठांवर वावरणारा वा साहित्य संमेलनांना जाणारा तो साहित्यिक असाही समज अलिकडे दृढ होत चाललाय असे दिसते. असो.
प्रत्येक वर्षांप्रमाणे आताचे 88 वे घुमान साहित्य संमेलन सुध्दा यशश्वी संपन्न झाले. साहित्य संमेलनात अखिल भारतीय हे भारदस्त शब्द असल्यामुळे अधून मधून महाराष्ट्राबाहेर साहित्य संमेलन भरवणे आता अगदी अगत्याचे आणि अपरिहार्य होऊन बसले असावे. जिथे जिथे मराठी माणूस आहे अशा महाराष्ट्राबाहेरच्या शहरांतही आतापर्यंत अ. भा. साहित्य संमेलने भरवली गेलीत. उदा. ग्वाल्हेर, बडोदा, इंदोर, बेळगाव आदी ठिकाणी संमेलने झालेली आहेत आणि या शहरांत प्रचंड मोठ्या लोकसंखेच्या प्रमाणात मराठी माणूस वास्तव्याला आहे.
      मात्र या सर्वांत घुमान साहित्य संमेलन वेगळे ठरणार होते- वेगळे ठरले आहे. घुमानला मराठी माणसं जवळ जवळ नाहीतच. तरीही संत नामदेवांच्या उत्तरायुष्यातील कर्मभूमीत आणि निवासभूमीत हे संमेलन भरले. पंजाब सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्‍त विद्यमाने भरवलेले हे संमेलन होते असे म्हटले तरी चालेल. या वाक्याकडे टीका म्हणून कोणी पाहू नये. पंजाबसारख्या एकदम भिन्न भाषिक राज्यात मराठी साहित्य संमेलन भरवणे कौतुकास्पद असले तरी आणि भाषा जोडो या अर्थाने दोन भाषा जोडण्यासाठी एक वेगळा प्रयोग म्हणून याकडे पाहणे सयुक्‍तीक असले तरी संपूर्ण मराठी श्रोता महाराष्ट्रातून रेल्वेने तिथे घेऊन जाणे कितपत सयुक्‍तीक होते, हा प्रश्न कोणालाही पडणे स्वाभाविक आहे. म्हणून टीव्ही चॅनल्सवर लाइव आणि नंतर प्रसारित होणारे वृत्तांत पहात असताना एक गोष्ट लगेच प्रकर्षाने लक्षात येत होती ती ही की व्यासपीठाशिवाय टीव्ही कॅमेरे इकडे तिकडे वा श्रोत्यांकडे अजिबात सरकत नव्हते. म्हणजे समोर श्रोते किती होते आणि कोण कोण होते हे कळायला नको याची खबरदारी घेतली जात होती की काय? अध्यक्षिय भाषणावेळी एकदाही उपस्थितांवरून कॅमेरा फिरला नाही.
      संपूर्णपणे राजकीय व्यासपीठ असलेल्या या मंचावर एकुलते एक मराठी साहित्यिक की जे या संमेलनाचे अध्यक्ष सुध्दा होते ते सदानंद मोरे अवघडल्यासारखे वा एकदम उपर्‍यासारखे एकटे वाटत होते. राजकीय लोकांच्या वेळेला किंमत देऊन आणि त्यांचा वेळ आपण आपल्या अध्यक्षिय भाषणात वाया घालवू नये याची जाणीव ठेऊन अध्यक्ष आपले भाषण वेगवान शैलीत उरकताना दिसत होते. प्रत्येक चार पाच वाक्यांनंतर ते आपल्या मनगटावरचे घड्याळ पहात होते. अध्यक्ष असे घड्याळ पाहून भाषण करतात म्हणून राजकीय नेत्यांना हमखास खात्री पटली की आपला जास्त वेळ आता वाया जाणार नाही. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षिय भाषणात काहीतरी वेगळे आणि मराठी साहित्याला पुढे घेऊन जाणारे मुद्दे असतील असे वाटत होते. पण त्यांच्या भाषणाने भ्रमनिरास झाला. राजकीय इतिहासात आणि संत परंपरेत ते रमले आणि त्यातूनही भरीव असे काहीच मिळाले नाही.
      बाकी काही असो. साहित्य संमेलनाकडे एक वारी म्हणून पाहणार्‍यांसाठी अथवा पर्यटन म्हणून साजरे करणार्‍यांसाठी अथवा दरवर्षी साहित्य संमेलनातील कुठल्यातरी मंचावर हजेरी लावणार्‍यांसाठी हे साहित्य संमेलन एक पर्वणी नक्कीच होती आणि ती पर्वणी त्यांनी खूप मजेत साजरी केलेली दिसली. फक्‍त परतीच्या प्रवासात दुपारचे जेवण उशीरा मिळाले एवढीच काय त्यांची गैरसोय झाली असावी. (तीन दिवसाच्या साहित्य संमेलनातील जेवणावर एक्काहत्तर लाख रूपये खर्च होणार असल्याचे संमेलनाआधी वाचले होते. म्हणजे एवढी रक्कम जेवणावळीला लागू शकते असे मराठी माणसाने पंजाबी अधिकार्‍यांना सांगितले होते. चूकभूल देणे घेणे.)
      नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे साहित्य संमेलन सुरू झाले की सडकून टीका करायची असे ज्यांचे उद्योग आहेत त्यांनी या संमेलनावरही भरपूर टीका केलीच. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील एक थोर लेखक एकीकडे घुमान साहित्य संमेलनाला आयुष्यातून पहिल्यांदाच लेखी शुभेच्‍छा पाठवतात तर त्याच वेळेचा मुहुर्त साधून एका चिल्लर मंडळाचा चिल्लर पुरस्कार स्वीकारताना साहित्य संमेलनावर टीकाही करतात. (अशी टीका करता करता यापुढे अध्यक्षपद चालून आलेच तर तेही ते स्वीकारतील.) अ. भा. साहित्य संमेलन हे त्यांच्या म्हणण्यानुसार जर एक उत्सव असेल तर आपल्या फालतू हौशी प्रसिध्दीसाठी पुरस्कार वितरण करणार्‍या एका संस्थेच्या इतक्या क्षुल्लक कार्यक्रमाला त्यांनी का उपस्थित रहावे हा कोणालाही प्रश्न पडावा. हे मराठी साहित्य संमेलन निदान नावाने तरी अखिल भारतीय होते पण हे थोर लेखक ज्या पुरस्कार वितरण समारंभात पुरस्कार घेत संमेलनावर टीका करीत होते ते पुरस्कार मोजक्या तालुक्यांतल्या लोकांना वाटले जातात. हे पुरस्कार जिल्हास्तरीय सुध्दा नसतात. असे अनेक विरोधाभास काही साहित्यिकांच्या वागण्या- बोलण्यातून दिसून येतात. पण त्याला आपला इलाज नाही.
      मराठी माणूस उत्सव प्रिय आहे. फोटो प्रिय आहे. प्रसिध्दीप्रिय आहे. फेसबुक प्रियही आहे आता. म्हणून काही साहित्यिकांनी संमेलनाच्या दिंडीत नाचतानाचे फोटोही अपलोड केले आहेत. अशाच पध्दतीने यापुढेही मराठी माणूस संमेलने भरवत राहील. त्याच त्याच कविता म्हणत तेच तेच कवी प्रत्येक कवी संमेलने गाजवत राहतील. परिसंवादातही तेच तेच आलटून पालटून आलेले लोक आणि शब्दांचा खेळ करत वर वर बदललेले तेच विषय चघळले जातील. याच वेळी मराठी भाषेत लिहिणारे काही मोजके साहित्यिक आपल्याला घरात कोंडून घेत- समाधी घेत कोपर्‍यात आयुष्यभर लिहीत रहातील. त्यांचे साहित्य कोणी प्रकाशित करो वा न करो. आणि जिथे तिथे व्यासपीठांवरून नुसते बोलणारे वक्‍ते यापुढेही कायम बोलत रहातील. मग ते व्यासपीठ कोणते का असेना. बोलायला फक्‍त व्यासपीठ हवे. संमेलनात आपल्याला निमंत्रण मिळाल्याशी मतलब. आणि नाही मिळाले तरीही आम्हाला अडवणार कोण? आम्ही स्वयंभू.

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा