सोमवार, ३० जून, २०१४

प्रमाणपत्र कोणाकडे मागावे?



 
- डॉ. सुधीर रा. देवरे

       समजा तुम्ही प्रामाणिक, निर्व्यसनी, निष्कलंक आणि आपल्या तत्वांशी तडजोड न करणारी व्यक्‍ती आहात. तुमच्या आजूबाजूला सगळेच नाही, मात्र काही संधीसाधू लोक आहेत. स्वार्थासाठी ते कोणत्याही तडजोडी करायला तयार असतात. म्हणून अशा लोकांपासून तुम्ही कायम सुरक्षित अंतर ठेऊन असता. अशा लोकांनाही तुम्ही कायम थोडे दूर राहिलेले सोयिस्कर असते. तुम्ही या सर्व लोकांबरोबर व्देषाने नव्हे, पण तार जुळत नसल्यामुळे दूरत्वाने वागता. यामुळे तुमच्यामध्ये साहजिकच भावनिक अंतर वाढत जाते. हे अंतर कमी होण्याऐवजी गैरसमजातून दिवसेंदिवस वाढत राहते.
         अशा वेळी तुमच्या कुटुंबातील एखादा नाजूक संबंध घडताना तुमचा एखादा असा सहकारी अचानक तुमच्याजवळ येतो. आणि तुम्हाला सांगतो. अमूक एका नंबर वरून मला एक फोन आला होता आणि ती व्यक्‍ती मला तुमच्याबद्दल विचारत होती की अमूक एक व्यक्‍ती म्हणजे तुम्ही कसे आहात? तुमचा स्वभाव कसा आहे? यावेळी अशा एखाद्या व्य‍‍‍क्‍तीकडून हे ऐकून तुमच्या मनाची अवस्था काय होईल? तुम्ही काय सांगितले त्यांना? असे विचारण्याची हिम्मत तरी करू शकाल का तुम्ही? ज्या व्यक्‍तीशी आपल्या विचारांची तार कधीच जुळली नाही. उलट आपली चिडचिडच वाढली आहे, अशी व्यक्‍ती आपल्याबद्दल कोणाला चांगले सांगू शकेल का? चांगले सांगूही शकेल पण त्या चांगल्याचे प्रमाण काय राहील? आणि वाईटाचे प्रमाण काय असेल?
         सोबत दारू पिणारे, सोबत पार्ट्या करणारे, सोबत तंबाखू खाणारे, सोबत भ्रष्टाचार करणारे, सोबत निंदानालस्ती करणारे, स्वस्त प्रसिध्दीसाठी उथळ कार्यक्रम करणारे, टाइमपाससाठी गेट टुगेदर करणारे वा चालता बोलता फालतू राजकारण खेळणारे लोक एकमेकांना सांभाळून घेतात. अशा संबधांच्या वेळी एकमेकांबद्दलची ते चांगली माहिती देऊ शकतात. पण तुम्ही त्यांच्या टोळक्यात नसल्यामुळे तुमच्या बाबत कोणाला चांगले सांगितले जाईलच याची खात्री नाही. कारण त्यांच्या मते तुम्ही त्यांच्यासारख्या लोकांत मिसळत नाहीत, म्हणजे त्यांच्यानुसार तुम्ही समाजात मिसळत नाहीत.
         आणि आपल्या बाजूने विचार केला तर ज्याला आपण आपल्या सोबत घेण्याचाही कधी विचार करणार नाही अशा व्यक्‍तीकडे तुमच्या चांगुलपणाचे प्रमाणपत्र कोणी मागत असेल तर तुमची मनोवस्था काय होईल? अशा माणसांनी यापुढे तरी आपल्याबद्दल कोणाजवळ चांगले बोलावे म्हणून यावेळी तुम्ही तडजोड करण्याचा विचार करू शकता. पण या मागच्या काळात झालेल्या तुमच्या नुकसानाचे काय करायचे? हा प्रश्न मागे उरतोच. खरे तर अशी अवस्था आपल्या शत्रूचीही कधी होऊ नये.
         शिखराएवढ्या उंच माणसाच्या स्वभावाविषयीचे प्रमाणपत्र कोणी एखाद्या मुंगीएवढ्या खुज्या माणसाकडे मागितले तर काय होईल? माणसाला माणसासारखा माणूस समजणे तर सोडाच, त्याच्या विशालपणाचा आवाका न कळल्यामुळे ही मुंगी माणसाला राक्षसही समजू शकते!
         कोणाचे प्रमाणपत्र कोणाकडे मागावे याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. आणि प्रमाणपत्र देणार्‍यानेही ते विचारपूर्वक दिले पाहिजे. पण विचार असला तरच ते विचारपूर्वक दिले जाऊ शकते ना.

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा