शनिवार, १८ मे, २०१३

व्यवस्था म्हणजे काय ?-         डॉ. सुधीर रा. देवरे


         चिखलीकर यांनी जमा केलेली माया संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. एक साधा इंजिनियर इतक्या कोटींपर्यंत माया जमवू शकतो आणि त्यातील निम्म रक्कम ही रोख आणि सोन्याच्या रूपात ठेवतो हे सुध्दा देशाने प्रथमच ऐकले असेल. महाराष्ट्रात आपली कुठे कुठे मालमत्ता, जमीन, घरे, प्लॉट आहेत हे नक्की माहीत नसणारा व त्या इस्टेटीचे ट्रंकभर कागदपत्रे बाळगणारा हा एकमेव इंजिनियर नक्कीच नसावा. धर्मभास्करापासून तर चिखलीकरांपर्यंत असे अनेक लोक होऊन गेले असतील ‍आणि आजही समाजात उजळ माथ्याने वावरत असतील पण अजून ते उघडे पडले नाहीत इतकेच. राजकारणी, कर्मचारी, व्यापारी, दलाल, तथाकथित संत, मंदिरांचे विश्वस्त, क्रिकेटर आणि सर्वच खेळाडू यांना पैसे कमवण्याची हाव सुटलेली आहे. माणूस हा किती प्रचंड हावरा प्राणी आहे, याचे खरे चित्र जरा इकडेतिकडे पाहिल्यावर लक्षात येते! आपण हे नक्की कोणासाठी करत आहोत याचे तारतम्य न बाळगणारे असे अनेक लोभी सापडतील.
         चिखलीकरांसारखे अनेक सरकारी कर्मचारी, अनेक राजकारणी आणि आपण सर्व नागरीकही या व्यवस्थेला कारणीभूत आहोत. आपण कोणाकडून लाच घेत नसलो तरी आपण आपले कामे लाच देऊन करून घेतो. अनेक पापभिरू लोक अवघड जागेचे दुखणे म्हणून पैसे देतात व कामे करून घेतात. कोणतेही प्रमाणपत्र घ्यायचे असेल तर पावतीशिवायचे पैसे ठरलेले. आरटीओकडून गाडी पासींग करून घ्यायची, योग्य नंबर हवा असेल, लायसन्स काढायचे तर पैसे ठरलेले. रेशनकार्ड काढायचे, पैसे. खरेदी विक्री करायची आहे, पैसे. पोलीसांकडे जा, पैसे. उच्च शिक्षणासाठीच नव्हे तर बालवाडी प्रवेशासाठीही देणग्या. नोकर्‍या मिळवण्यासाठी पैसे. ठेका मिळण्यासाठी पैसे. आणि यासाठी शिपायापासून मंत्र्यांपर्यंतची साखळी. कोणत्याही कार्यालयात कोणत्याही किरकोळ कामासाटी जा, एका फेरीत काम होणार नाही. झालेच तर तुमचा पूर्ण दिवस त्या कामावरून ओवाळून टाकावा लागतो. आपल्याला लाच दिल्याशिवाय चैन पडत नाही. वरीलपैकी ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्यात आपण कोणाकडे कोणत्याही नियमबाह्य गोष्टी मागत नाहीत तरी लाच द्यावी लागते. सामाजिक क्षेत्रात हुंडा देणे-घेणे, धुमधडाक्यात लग्न, वाढदिवस, मानपान या बाबी आपल्याला सोडवत नाहीत.
         घेणारे लोक कमी आहेत, पण देणारे सर्वच आहेत. म्हणून एखाद्याने नियमावर बोट ठेवला की त्याचे काम होत नाही. त्याला नियमांचा बडगा दाखवून वेगळ्या प्रकारे त्रास दिला जातो. त्याच्या बाजूने लाच देणारे इतर लोक उभे रहात नाहीत. हीच आपली अवनती. नियम फक्त पाळणार्‍या लोकांसाठी आहेत. जे नियम पायदळी तुडवतात त्यांची सर्व कामे दललांमार्फत घरबसल्या होतात.
      आपले सरकार आणि शासन दिवसेंदिवस भ्रष्ट होत आहे. कारण आपलेच प्रतिबिंब आपल्या शासन व्यवस्थेत पडलेले असते. काही मतदार जात पाहून मतदान करतात. काही धर्म पाहून मतदान करतात. काही मतदार पैसे घेऊन मतदान करतात तर काही स्थानिक ठिकाणी पार्ट्या घेऊन मतदान करतात. आणि अशा पार्ट्यांचा आस्वाद घेत लोक, देशात भ्रष्टाचार वाढल्याच्या चर्चा करतात. भ्रष्टाचार हा फक्त पैशांचाच नसतो. वागण्याच्या, कर्तव्याच्या, वेळेच्या आणि विचारांच्या भ्रष्टाचाराने आज सर्वत्र थैमान घातले आहे.
         व्यवस्था म्हणजे केवळ शासन, सरकार आणि कर्मचारी नव्हेत, तर देशातील नागरीक म्हणजे आपणही या व्यवस्थेचे घटक आहोत. जसे नागरिक तशी व्यवस्था. या व्यवस्थेचा एक घटक म्हणून आपल्यापासून अभ्यास करू या.

-            डॉ. सुधीर रा. देवरे        
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

1 टिप्पणी:

  1. ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे संपर्काचे साधन नाही अश्या अतिदुरगम खेडेगांवातील माणूसही भ्रष्टाचारात पारंगत आहे तो आपले भाऊ ,बहिणी ,आई, वडील यांना फसवतो.शुल्लक कारणावरून खून मारामाऱ्या करतो . तो हे( गाढ ज्ञान )कोणाकडून शिकला याचा खोलात जावून विचार करणे आवश्यक वत्या मुळातल्या घाणीची साफ सफाई करणे आवश्यक आहे त्यासाठी सध्या कोण प्रयत्न करताना दिसत नाही .जमीन साफ करा मग त्या जमिनीत येणारी फळे चांगली येतील .फळे म्हणजे म्हणजेच सरकारी नोकर राजकारणी होय.

    उत्तर द्याहटवा