शुक्रवार, २५ जानेवारी, २०१३

इथे भारतीय कोणी नाही
   
-         डॉ. सुधीर रा. देवरे

      कोणाला कशाचा पुळका येईल सांगता येत नाही. कोणी सीतेचे अपहरण करणार्‍या रावणाच्या प्रेमात पडतं तर कोणी आईचा शिरच्छेद करणार्‍या परशुरामाचे पोवाडे गातो. कोणी संमेलनाचे साहित्यिक व्यासपीठ बळकाऊ पाहतात तर कोणी आपल्या खिशातल्या कायद्याने चिपळूण बंदी घालतं. दरवर्षी काही साहित्यिकही राजकीय संमेलनात आपली प्रसिध्दी अजमावू पाहतात. स्त्री म्हणजे चूल आणि मूल हे वेगळ्या शब्दात सांगताना कोणी सामाजिक करार या भारदस्त वैचारिक संज्ञेचा आधार घेऊ पाहतं आणि बलात्कार पिडितांना इंडियात ढकलून आपण भारतात राहू पाहतात. कोणा प्रांतीय नेत्याच्या म्हणण्यानुसार सर्वच बलात्कारी ‍बिहारी असतील तर मग महाराष्ट्रातील मराठी कानाकोपर्‍यात एवढे बलात्कार कसे होतात. कुठे तुम्ही आणि आम्हीचा जमातवाद, कुठे नक्षलवाद्यांची क्रूरता तर कोणी तथाकथित संत मयत पिडितालाच उपदेश करतो की बलात्कार्‍याला भाऊ मानून त्याचे पाय धरायला हवे होते.  
      आज सगळेच नशेत बोलल्यासारखे बोलतात. इथे- या प्रजासत्ताक राष्ट्रात काहींना अमर्याद अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहेत. ते काहीही बोलले तरी त्यांच्यावर कोणी खटला भरत नाही. आणि सामान्य माणसाने अशांविरूध्द नुसता ब्र काढला तरी त्याला तुरूंगात जावं लागतं. काय झालं माझ्या भारताला... माझ्या आकलनापलिकडे आहे हे सगळं. म्हणून काही उद्‍गारांशिवायची अजून एक कविता:

फक्त अफगानीस्थानातच नाही
फक्त पाकिस्तानातच नाही
आता इथेही तालिबान्यांचा
सुळसुळाट झाला आहे...
ह्या धर्माचा दहशतवाद
त्या धर्माचा दहशतवाद
ह्या जातीचा दहशतवाद
त्या जातीचा दहशतवाद
ह्या झेंड्याचा दहशतवाद
त्या झेंड्याचा दहशतवाद...
आणि देशभर धुमाकुळ  घालणार्‍या
तथाकथित संतांची वाणी
लढाईची बढाई
फार पुढची बाब आहे राव...
नुसता ब्र काढाल
तरी तुमच्या अस्तित्वालाच
सुरूंग लागेल...

- अभिव्यक्ती,
इथे भारतीय कोणी नाही
जो तो ज्या त्या झेंड्यासाठी आहे
सावधान...

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा