शनिवार, ५ जानेवारी, २०१३

बलात्कारी पुरूषाची आई स्त्रीच असते...


                                          -         डॉ. सुधीर रा. देवरे

      प्रत्येक पुरूषाची आई ही एक स्त्री असते. प्रत्येक पुरूषाचा जन्म एका स्त्री पासून होत असतो. कोणत्याही लिंगपिसाट बलात्कारी पुरूषाची आईही एक स्त्रीच असते. म्हणून प्रत्येक आईने आपल्या पंधरा वर्षाच्या वयापुढील मुलाला- मुलांना घराघरात सुचकतेने सांगितले पाहिजे:
      : बाळा, मी जशी तुझी आई आहे. आपल्या घरात जशी तुझी बहिण आहे. तशाच तुला बाहेर भेटतात त्या इतर स्त्रियाही मनाने- भावनेने- शरीराने माझ्यासारख्याच आहेत. त्यापैकी तुला काही आवडतील. तुला काहींचे आकर्षण वाटेल. आणि तसे आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे- नैसर्गिक आहे. वाईट नाही. काहींशी तू मैत्री करशील. पुढे कुठली तरी स्त्री तुझी पत्नी होईल. स्त्रियांशी मैत्री जरूर कर. त्यांच्याशी चर्चा कर. वाद घाल. लैंगिकतेवरही बोल. पण तुझे विचार तिच्यावर लादू नकोस. कोणावरही कसलीही बळजबरी करू नकोस. (बलात्कार हा शब्द टाळावा. तुम्हाला काय म्हणायचंय हे त्याला कळेल.) एखाद्या स्त्रीने तुझ्या मैत्रीला नकार दिला तर तू दुखावला जावून मनात सूडाची भावना ठेऊ नकोस. कारण तुझा दृष्टीकोण कितीही निकोप असला तरी तिच्या मनातील वादळ वेगळे असू शकते. तू  असे कधी करणार नाहीस याची मला खात्री आहे. तुझ्या इतर मित्रांनाही अशा धाडसांपासून सावध रहायला सांग. जिथे तुला असा वास येईल तिथे तू मदतीला धाऊन जा. रस्त्यावर अशी असहाय्य स्त्री मदत मागत असेल वा एखाद्या अपघातात कोणाला इस्पितळात पोचवायचे असेल तर हातातले काम सोडून त्यांना मदत कर.     
      -असे किती महिलांनी आजपर्यंत आपल्या मुलांना विश्वासात घेऊन सांगितले आहे. नसेल सांगितले तर आता आपल्या घरापासून सुरूवात करायला हवी. (इतक्या नेमक्या शब्दात पुरूष पालक, कोणत्याही वर्गातले शिक्षक- शिक्षिकाही आपल्या पाल्यांना- विद्यार्थ्यांना असे सुचकपणे सांगू शकतात.) कारण हा ही एक वैश्वीक संस्कार आहे. तो केला पाहिजे.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा