शनिवार, १२ जानेवारी, २०१३

पाकिस्तान: एक कपटी शेजारी



 
-         डॉ. सुधीर रा. देवरे

    एकोणावीसशे सत्तेचाळीस पासून पाकिस्ताने भारताशी तीन युध्दे केले. तीनही युध्दे भारताने जिंकून पाकिस्तानची इंचभरही जमीन बळकावली नाही. कारगिल झाले. कारगिल संपतानाही पाकिस्ताने भारताच्या सैनिकांच्या मृतांची विटंबना केली. भारताने सोडून दिले. 1998 साली पाकिस्तानने भारताच्या सैनिकांचे शीरे कापली होती. भारताने पाकिस्तानला कडक इशारा दिला. 2000 साली तसेच झाले. भारताने कडक इशारा दिला. आता 2013 च्या सुरूवातीला पाकिस्ताने आमच्या दोन जवानांची हत्या करून शीर कापून नेले. भारताने फक्त कडक इशाराच दिला.
      यापूर्वी पाकिस्तानने अनेकदा काश्मीरमध्ये उघड उघड हस्तक्षेप केला. पंजाब तोडण्याचा प्रयत्न केला. भारतातील अनेक शहरांत बाँब स्फोट घडवून आणले. विमान अपहरण केले. संसदेवर हल्ला केला. जम्मू काश्मीर विधानभवनावर हल्ला केला. मुंबईवर हल्ला केला. भारत कडक इशारा देतोच आहे कायम. भारत पाकिस्तानशी विविध करार करतो आहे. तिथल्या नेत्यांना भारतात बोलवले जाते. ते दिल्लीत एक बोलतात आणि इस्लामाबादला पोचताच भलतेच बोलतात. आपण विसरून जातो. आपले पत्रकारही पाकिस्तानच्या नेत्यांच्या प्रेमात पडतात.
      मुंबईचे पुरावे दिले ते पाकिस्तानला पुरावे वाटत नाहीत. दाऊदचे पुरावे दिले तरी दाऊद तिथे नाही. पाकिस्तानच्या मते कोणताच दहशतवादी पाकिस्तानात नाही. सैनिकांचे शीर कापणे आणि भारतीय हद्दीत शिरणे हे आपले आत्ताचे आरोपही पाकिस्तानने नेहमीप्रमाणे तात्काळ फेटाळले आहेत. पाकिस्तान लोकनियुक्त सरकार केव्हा अप्रत्यक्षपणे आयएसआय कडे बोट दाखवते तर केव्हा सैन्याकडे. आणि पाकिस्तानातील दहशतवादी हे नॉन स्टेट ॅअँक्टर्स आहेत असे उघडपणे पाकिस्तान सांगतं. सरकारचे त्या देशात काही धकत नसेल तर अशा सरकारशी वाटाघाटी करण्याचा काय उपयोग?
      आपण पाकिस्तानला माफ करत मैत्री करत राहू या. त्यांच्याशी क्रिकेट खेळत राहू या. पाकिस्तानी कलाकारांना पाहुणे म्हणून बोलवत त्यांना सन्मान देत राहू या. पाकिस्तानच्या गायकांना जगापुढे आणू या. त्यांच्याशी आर्थिक करार करत राहू या. त्यांनी निर्यात केलेल्या बोगस चलनामुळे आर्थिक हानी सोसत राहू या. मात्र पाकिस्तान हा पाकिस्तानच आहे. तो मित्रच काय आपला दिलदार शत्रूही होऊ शकत नाही. तो फक्त एक कपटी शेजारी असल्यामुळे भारताचे मैत्रीस्तान होऊ शकत नाही, हे कधी कळेल आम्हाला.
      कितीही कडक इशारा द्या. पाकिस्तानला फरक पडत नाही. कारण पाकिस्तानला माहिती आहे, कडक इशारा देण्याशिवाय- भारतात निषेधमोर्चे निघण्याशिवाय- भारतातील टीव्ही चॅनल्सवर चर्चा होण्याशिवाय, भारत आपले काहीच वाईट करू शकत नाही.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
   इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा