रविवार, २९ जुलै, २०१२

सद्यस्थितीत साहित्यिकांची जबाबदारी




- डॉ सुधीर रा. देवरे

      सद्यस्थितीत साहित्यिकांची जबाबदारी काय? असा आजच्या परिसंवादाचा विषय आहे. अशी जबाबदारी साहित्यिकांवर वा खरे तर सर्वच कलावंतांवर टाकता येईल का, हा खरा प्रश्न आहे.
      सद्यस्थिती म्हणजे नेमकी कोणती स्थिती? सद्यस्थितीचे वर्गीकरण तीन भागात करता येईल.
. व्यवस्था : भ्रष्टता, अनैतिकत, दांभिकता, सामाजिक वंचितता.
. धार्मिक अराजकता वा असहिष्णुता
. नैसर्गिक आपत्कालीन स्थिती
      भूकंप, महापूर, सुनामी, चक्रीवादळ ह्या नैसर्गिक घटना अपरिहार्य म्हणून स्वीकारल्या तरी पहिल्या दोन प्रकारच्या घटना या मानवनिर्मित आहेत. अशा घटना घडू नयेत यासाठी समाजाचे वैचारिक परिवर्तन घडविण्यासाठी लेखकावर प्राथमिक जबाबदारी येते. कारण साहित्यिक - कलावंत हे समाजाचे सांस्कृतिक व वैचारिक नेतृत्व करीत असतात.
      आजच्या कलाविष्कारात आजच्या व्यवस्थेचं वा धार्मिक अराजकता- असहिष्णुतेचं चित्रण मर्मभेदकपणे आविष्कृत होतं का - उपयोजित होतं का? असे प्रश्न उद्भवतात.  बहुतांशपणे नाहीच, असंच या प्रश्नाचं उत्तर येईल.
      आम्ही अजूनही ऐतिहासिक कादंबर्या लिहिण्यात आणि वाचण्यातही धन्यता मानतो. ऐतिहासिक काळात रमण्याची आपली ही मानसिकता आज बदलण्याची आवश्यकता आहे. कारण अशी मानसिकता नवनिर्माणासाठी मारक व घातक ठरत असते. इथे गैरसमज होण्याची शक्यता आहे. इतिहासाचा अभ्यास आवश्यक आहे. मी इतिहासात रमण्याच्या मानसिकतेवर बोलतो आहे. उदाहरणार्थ, आमच्या जातीचे लोक राजे होते यावर समाधान मानत राहणे.
      पानिपताच्या युध्दात दीड लाख बांगड्या फुटल्या - म्हणजे दीड लाख महिला विधवा झाल्या. तरी तत्कालीन पंत कवी पुराणांवरच आख्याने रचत राहिली. दीड लाख विधवांचे अश्रू समलाकालीन कवींपर्यंत पोचले नाहीत.
      पानिपताच्या युध्दाला दोन- अडीच शतके उलटून गेल्यानंतर आत्ता कुठे पानिपत हा कादंबरीचा विषय होतो. पानिपताच्या युध्दावेळी तत्कालीन कवींना पानिपतापेक्षा पुराणकथा जश्या महत्वाच्या वाटत होत्या. तसेच आजच्या लेखकाला आत्ताच्या सार्वत्रिक अराजकांपेक्षा भूतकाळातील पानिपत शोकांतिका महत्वाची वाटते वा जास्त भावते. हा काय प्रकार आहे?
      आजच्या व्यवस्थेवर कलावंत काय प्रतिक्रिया देतो. आजच्या धार्मिक असहिष्णुतेवर कलाकार काय भाष्य करतो. अशा कलावंताच्या प्रतिक्षिप्त क्रियांकडे जागरूक साहित्य - कला रसिकांचे कान असतात. मात्र कलावंत त्यांचा नेहमीच अपेक्षाभंग करीत असतात.
      सुनामीने साहित्यिकांत कशी अनुकंपा  निर्माण झाली? भूकंपाने साहित्यिक कसे हादरून गेले? महापुराने साहित्यिकांचा विचारप्रवाह कसा वाहू लागला? दुष्काळाने कलावंतांच्या तोंडचे पाणी पळाले का? ह्या गोष्टी वाचकांपर्यंत कधीच पोचत नाहीत.
      सद्यस्थितीत साहित्यिकाची जबाबदारी असे म्हणताना कलावंताने वा साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी पाळावी असे अभिप्रेत दिसते.  यात सामाजिक बांधिलकी साठी आपण कोणते निकष लावतो यावर लेखकाची बांधिलकी ठरवता येणार नाही. कलावंताची सामाजिक बांधिलकी सापेक्ष असते.
      आपल्या गुहेत राहणारा साहित्यिक हा कदाचित सामाजिक बांधिलकी जोपासणारा असू शकेल तर सभा, समेंलने गाजवणारा, उठसूट भाषणे करणारा आणि समाजात वावरणारा साहित्यिक आपल्या आविष्कारातून बांधिलकी धुडकावणाराही असू  शकतो.
      डॉ. गणेश देवी हे इंग्रजी, मराठी व गुजराती भाषेत लिहिणारे लेखक व समीक्षक वीस वर्षांपूर्वीपासून आपली सुखासीन नोकरी सोडून आदिवासींच्या उत्थापनासाठी स्वत:ला वाहून घेतात. लिहायचं झाल्यास अशा प्रश्नांवरच लिहितात. सुप्रसिध्द बंगाली भाषक लेखिका महाश्वेता देवी ह्याही भटक्या विमुक्तांसाठी कार्यरत होतात. मानवाधिकारासाठी लढतात.  अरूंधती रॉय या इंग्रजी भाषेतल्या कादंबरीकार एकदम आदिवासींच्या प्रश्नात लक्ष घालतात. मेधा पाटकरांसोबत आदिवासींच्या - विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी आंदोलनात सहभागी होतात. हे सगळे कुठल्या प्रेरणेतून होते, हे ही आपण समजून घेतले पाहिजे.
       कलाकार - साहित्यिक हा जगातील कोणत्याही जातीचा, वंशाचा, पंथाचा वा धर्माचा असला तरी त्याच्या कलाविष्कारातून मानवी मूल्यांचा साक्षात्कार कसा होतो, हे पाहणे महत्वाचे ठरते. कलाकार हा मानवी भावभावनांचा पुरस्कर्ता असला पाहिजे. कारण कलावंतला मानवी समाजातूनच निर्मितीची प्रेरणा मिळत असते.
      जीवननिष्ठा, जीवनबंधातून तत्कालीन समाजस्थितीचे आकलन कलावंताला झालं पाहिजे, अशा सार्वत्रिक अपेक्षा असतात. मात्र विशिष्ट भावविश्वाचा वारा प्यालेला कलावंत आपल्या पिंडाला मानवेल तसाच आविष्कृत होत राहतो. अशा साहित्यिकांचा उदाहरणार्थ म्हणून उल्लेख करायचा झाला तर पु. शि. रेगे, ग्रेस, बाबासाहेब पुरंदरे यांचा करता येईल.
      साहित्यात तत्कालीन जीवन जाणिवा येऊनही ते कालातीत असायला हवे. आठशे वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ज्ञानेश्वरीत तत्कालीन जीवन जाणिवा प्रत्ययास येतात. पण आजही ज्ञानेश्वरी कालबाह्य झालेली नाही. आठशे वर्षांपूर्वी इतकीच ती आज समरसून वाचली जाते. म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कालातीत ठरतो. तुकारामाची गाथा सुध्दा समकालीन जीवन जाणिवांसह कालातीत आहे.
      सद्यकालीन वा समकालीन स्थिती म्हणजे केवळ प्रासंगिक घटना नव्हेत, हे ही इथे नमूद करावेसे वाटते.
      ज्या काळात कलेसाठी कला की जीवनासाठी कला अशी फक्त चर्चाच महाराष्ट्रात रंगली होती, त्या वेळी कोणत्याही बाजूने उभे नसलेले साहित्यिक विश्राम बेडेकर यांनी रणांगण नावाची कादंबरी लिहून कला आणि जीवन यांचा समन्वय एकाच कलाकृतीतून आविष्कृत करून दाखवला. थेट दुसर्या जागतिक महायुध्दाची पार्श्वभूमी असलेली ही कादंबरी कलामूल्यांनी तितकीच कसदार होती.
      साहित्यिकांवर अशी काही तत्कालीन जीवन जाणिवा अनुसरण्याची जबाबदारी टाकता येईल का? वा तशा जीवन जाणिवांच्या चौकटीतच लिहिण्याची सक्ती करता येईल का? असे प्रश्नही इथे ऊपस्थित होऊ शकतात. या प्रश्नांचे उत्तर मात्र आपल्याला नाही ह्या शब्दातच द्यावे लागणार आहे. सद्यस्थितीची जाण साहित्यिकाच्या कलाकृतीतून दिसावी अशी आपण अपेक्षा करू शकतो. पण साहित्यिकांवर तशी सक्ती करता येणार नाही.
      कारण कलाविष्कारात उपयोगिता शिरली तर कलात्मकतेत बाधा येऊ शकते. कलावंताने काय आविष्कृत करावे हे जर समाज व शासन ठरवू लागले तर आविष्काराला कलाकृती म्हणता येणार नाही. त्या कारागिराकडून तयार करून घेतलेल्या वस्तू ठरतील. म्हणून कलावंताने काय आविष्कृत करायचे ते कलावंतानेच ठरवलेले योग्य. मग तो कलावंत सद्यस्थितीला डोळसपणे भिडत असो वा नसो.

- डॉ सुधीर रा. देवरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा