शनिवार, १४ जुलै, २०१२

लज्जास्पद...घृणास्पद...- डॉ सुधीर रा. देवरे


आसामची राजधानी गोहत्ती. एका राज्याची राजधानी म्हणजे मोठे शहर. या शहरात चार दिवसापूर्वी एक अकरावीतली मुलगी रात्री दहा वाजता आपल्या मैत्रीणीच्या वाढदिवसाची पार्टी संपवून रस्त्याने घरी परतत होती. काही मुलांनी तिला रस्त्यात अडवले. त्या मुलांना अजून काही मुले येऊन मिळालीत. त्या सर्वांनी तिला घेरून मारले. स्पर्श केला. कपडेही फाडले. ती मुलगी ओरडत होती. रडत होती. आणि हे 15 ते 20 जणांचे टोळके तिला खेचत खिदळत होते. आजूबाजूला शंभरेक लोकांचा जमाव गम्मत बघत होता. पैकी या अनाचाराला कोणीही विरोध केला नाही.  
या वेळी दिप्या बार्दोलोई नावाचे पत्रकार रस्त्याने जात होते. त्यांनी पोलिसांना फोन केल्यावर तिथे अर्ध्या तासाने पोलिस आले. पण त्यांच्या हाती काही लागले नाही. पोलिसांचा सुगावा लागताच जमाव पळून गेला. त्या पत्रकारानेच ही घटना कॅमेर्यात शुट केली. एनडीटीव्ही इंडिया या चॅनलवरून ही चित्रफित प्रसारीत झाल्यावर पोलिसांनी आतापर्यंत त्यातील फक्त चार जणांना ताब्यात घेतले.
ही जशीच्या तशी घटना वर लिहिली. अकरावीतील म्हणजे फक्त 15 वर्षाची मुलगी. तिच्याशी असा अमानवी अत्याचार भररस्त्यात सर्वांसमक्ष होत होता, आणि तो थांबवायला पुढे कोणी येत नव्हते. या घटनेच्या पाठोपाठ महाराष्ट्रातील चंद्रपूरात अल्पवयीन मुलीवर सामुदायिक बलात्कार झाला. आणि उस्मानाबाद मध्ये मुलांनी छेडछाड केल्यामुळे एका चौदा वर्षिय मुलीने स्वत:ला जाळून घेतले.
आपण नेमक्या कोणत्या देशात राहतो. या देशात असे तालिबानी वेळोवेळी कसे निर्माण होतात? इतका राक्षसीपणा या लोकांमध्ये कुठून येतो? या टोळक्यातील एखादाही मुलगा त्या मुलीच्या बाजूने का लढला नाही? कोणी एकानेही असे करू नका असे आवाहन बाकीच्यांना का केले नाही? जमावातील लोक सुध्दा अशा वेळी फक्त बघे कसे होतात? आपण नक्की कुठे आहोत आणि कुठे चाललोत? प्राण्यांतील नर सुध्दा मादीचा अनुनय करत तिला वश करतात आणि मग तिच्याशी समागम करतात. या नरांना पशू म्हणणे सुध्दा पशूंचा अपमान ठरेल इतके हे कृत्य नीच पातळीचे आहे.

- डॉ सुधीर रा. देवरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा