रविवार, १ नोव्हेंबर, २०२६

‘समीक्षा : साहित्य, कला आणि जीवन’ ग्रंथाबद्दल

 

 

 



- डॉ. सुधीर रा. देवरे

 

               ‘समीक्षा : साहित्य, कला आणि जीवन’ हा समीक्षा ग्रंथ ‘शब्दालय प्रकाशना’ने १७ मार्च २०२६ ला प्रकाशित केला, त्याबद्दल काही सांगायचं आहे...

                    निखळ समीक्षेचं म्हणता येईल असं हे माझं चौथं पुस्तक. ‘कला आणि संस्कृती : एक समन्वय’ (जुलै २००३), ‘आस्वाद : भावलेल्या कवितांचा’ (मार्च २०२०), ‘साहित्य : जाणिवा, मीमांसा आणि समीक्षा’ (२५ जून २०२४) या नंतर आताच प्रकाशित झालेला ‘समीक्षा : साहित्य, कला आणि जीवन’ (१७ मार्च २०२६) हा समीक्षा ग्रंथ.

                    ‘साहित्य : जाणिवा, मीमांसा आणि समीक्षा’ या पुस्तकात १९८३ पासूनची आतापर्यंत सर्वच समीक्षा पृष्ठ संख्या वाढत असल्यानं (प्रकाशकाच्या विनंतीमुळं) घेता आली नव्हती. काही लेख ऐनवेळी बाजूला काढावे लागलेत. ते बाजूला काढलेले लेख आणि त्यानंतरची विविध नियतकालिकांत प्रकाशित झालेली समीक्षा, ‘समीक्षा : साहित्य, कला आणि जीवन’ या पुस्तकात ग्रथीत केलेली आहे. (म्हणून हे लेखही १९८३ ते २०२६ याच कालखंडातले आहेत.) या आधीचे आणि दरम्यानचेही काही समीक्षा लेख खूप शोध घेऊनही अजून हाताला लागले नाहीत, (उदा. अनुराधा पाटील यांच्या ‘तरीही’ कवितासंग्रहावरील टिपण.) म्हणून ते लेख या पुस्तकातही समाविष्ट करता आले नाहीत.

                    हे समीक्षा लेख प्रस्तुत अभ्यासकाला आतूनच लिहावेसे वाटले म्हणून त्या त्या वेळी लिहिले आहेत. कोणी सांगितलं वा एखाद्या लेखकानं आग्रह केला म्हणून मुद्दाम लिहिलेले नाहीत. कोणीतरी लादल्यानं लिहिले असे हे लेख नाहीत. जी पुस्तकं वाचण्यात आली, त्यांच्यावर त्यांच्या बाजूनं वा टीकात्मक लिहावं असं आतूनच सुचत गेल्यानं त्या त्या वेळी ही समीक्षा तटस्थपणे झाली आहे. म्हणूनच ‘मराठीत तटस्थपणे लिहिल्या गेलेल्या सर्व समीक्षेला...’ हे पुस्तक अर्पण केलं असून ‘समीक्षेच्या चिंतनातून समीक्षक आपले कला आणि जीवनविषयक आकलन अजमावीत असतो!’ असं अवतरणही ग्रंथाला जोडलं आहे.             

                    ‘समीक्षा : साहित्य, कला आणि जीवन’ या समीक्षा ग्रंथात समीक्षेची समीक्षाही आहे. काही मार्क्सवादी समीक्षक, चित्रकला, शिल्पकला, चित्रपट आणि साहित्य यांची समीक्षा आहे. माणसाच्या वेदनेच्या मीमांसेसहीत साहित्यविचार आहे. यात द. बोनाल्ड, वाय. ल्यूकीन, डेव्हिड फोरगाच, ल्यूसिये गोल्डमान, इप्पोलित तेन, अर्न्स्ट फिशर, प्लेटो, अॅरिस्टॉटल यांचे सिध्दान्त द. ग. गोडसे यांच्या कलामीमांसेशी पडताळून पाहण्यात आले आहेत. याशिवाय धर्मचिकित्सक संत तुकाराम, अहिराणी ग्रामीण लोकदैवत कानबाईच्या आरतीविषयी, साहित्यातील ग्रामीणता आणि पुन्हा गोडसेंसहीत भालचंद्र नेमाडे, मीनाक्षी पाटील, अशोक नायगावकर यांच्या पुस्तकांवरील समीक्षा- काव्यकृतींसहीत इतर महत्वाची, वेगळे भाष्य असलेली माझ्या दृष्टीकोनातून केवळ समीक्षाच नाही, तर जीवनमीमांसाही या ग्रंथात उपयोजित झाली आहे.

                    ‘समीक्षा : साहित्य, कला आणि जीवन’ या ग्रंथातील विविध साहित्यकृतींवरच्या या मीमांसेत काळ, समाज, परिवेश, जीवन जाणिवा, निष्कर्ष, अनुमाने काढत विश्लेषणातून संश्लेषणापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे. मराठीतील समग्र कलाविष्कारांना हे परिमाण लाभावं म्हणून ही थोडीशी धडपड. कारण इथं विशिष्ट ग्रंथ वा ग्रंथलेखक म्हणून निवड केलेली नाही तर त्या ग्रंथावर व्यक्त होण्याची गरज म्हणून लिखाण झाले आहे.

                    ह्या पुस्तकातील समीक्षा विचार, साहित्याच्या अभ्यासकांना भावेल- रूचेल आणि मराठीतील साहित्यातील समीक्षक- संशोधकांसहीत पीएच. डी. करणाऱ्या अभ्यासकांना माझ्या इतर पुस्तकांप्रमाणे हे पुस्तकही संदर्भ ग्रंथ म्हणून वाटाड्याचं काम करेल, अशी अपेक्षा बाळगतो..

                   

ग्रंथाचे नाव - ‘समीक्षा : साहित्य, कला आणि जीवन’ (समीक्षा ग्रंथ)

समीक्षक - डॉ. सुधीर रा. देवरे

प्रकाशक - शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर.

मुखपृष्ठ : सरदार जाधव.

पृ. संख्या : १७०, किंमत : ३०० रु.

                    (अप्रकाशित लेख. इतरत्र प्रकाशित करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती. ‘‘समीक्षा : साहित्य, कला आणि जीवन’’ पुस्तकाच्या मागणीसाठी- शब्दालय प्रकाशन, मोबाईल : 9822525444)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा