- डॉ. सुधीर रा. देवरे
भाषेसंदर्भात एका चुकीच्या अवतरणावर नाईलाजानं मला व्यक्त व्हावं लागलं. पण त्या अवतरणाची बाजू घेऊन (केवळ) प्रमाणभाषा प्रेमी असलेली आणि ते अवतरण प्रसारीत करणारी एक व्यक्ती माझ्याशी वाद घालू लागली. तो सर्व विसंवाद मुद्दाम साक्षेपी खाली देत आहे. मला न कळत माझी अचानक घेतलेली ही उध्दट मुलाखतही म्हणता येईल :
२७ फेब्रुवारी २०२३ ला कोणाचंही नाव नसलेलं खालील एक अवतरण समाज माध्यमांवर फिरू लागलं. तेच अवतरण एका बऱ्या वाचक व्हॉटसअप ग्रुपवर पुण्याच्या एका प्रमाणभाषा समर्थक वाचकानं टाकलं. ते मूळ अवतरण असं :
‘‘न आणि ण,
श आणि ष,
ळ आणि ड,
चांदणीमधील च आणि चंद्रमधील च
जहाजमधील ज आणि जीवनमधील ज
यांच्या उच्चारातील
फरक कळणाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
बाकीच्यांणा मराठी भाशा दिणाच्या मणापासूण षुभेच्छा!!!’’
या फॉरवर्डेड पोस्टवर न राहवून मला लिहावं लागलं : ‘मला वाटतं सोनाली कुलकर्णी (ज्युनिअर) यांनी फेसबुकवर अशी पोस्ट टाकली होती. (चुकभूल देणं- घेणं.) ज्यानं कोणी असा मूळ (अ)विचार मांडला त्याचा हा तथाकथित शहाणपणा आहे. फक्त प्रमाणभाषा शुध्द आणि बहुजनांच्या बाकी भाषा- बोलीभाषा अशुद्ध. असा शुध्द- अशुध्दपणा अधोरेखित करण्याचा हा अतिशहाणा खोडसाळ प्रयत्न आहे. महाराष्ट्रात अंदाजे १०० बोलीभाषा बोलल्या जातात आणि त्यांत वरीलप्रमाणेच बरेचशे उच्चार होतात. म्हणजे वरचं अवतरण लिहिणाऱ्यानं असे उच्चार करणाऱ्या ग्रामीण लोकांचा उपहास केला आहे. असेच पण थोड्याफार बदलाचे उच्चार महाराष्ट्रातील सर्व बोलीभाषक आपल्या सहज नैसर्गिक भाषेत करत असतात. आपल्या मातृभाषेतले असे उच्चार करण्यात त्यांना अजिबात कमीपणा वाटायला नको म्हणून हा निरसन प्रपंच. वरील अवतरण वाचून तमाम बोलीभाषक बंधुंनी आपल्या मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता आपण आपली बोली जशी वापरतो, जशी बोलतो, तशीच ती मायबोली सहज बोलत रहावी. आपण तसं केलं तरच ही प्रमाणभाषा म्हणजे मराठी भाषा टिकेल आणि ती पुढं अधिक कसदार- बळकट- प्रवाही होत राहील...’
असं मी व्यक्त होताच ग्रुपवर फॉरवर्ड करणाऱ्या व्यक्तीनं पुन्हा युक्तीवाद केला. त्या व्यक्तीनं तात्काळ माझ्या विरोधात लिहिलं : ‘‘बोलीभाषांना बोली म्हणूनच प्रेम मिळेल- प्रमाण भाषा ही अचूक संप्रेषणासाठी आवश्यक आहे. हा तथाकथित नव्हे- खरोखरचा शहाणपणा आहे. खानदेशीत कोणी 'मन वढाळ वढाळ' लिहिलं तर तुम्ही तिला खानदेशी म्हणाल का? असो. हे वाद पुरातन आहेत- आज कशाला उकरून काढायचे?’’
माझं उत्तर : ‘बोलीभाषांना बोली म्हणूनच प्रेम मिळेल म्हणजे काय? असं प्रेम देऊन वा सहानुभूती दाखवून कोणी तथाकथित प्रमाणभाषक बोलींवर उपकार करणार आहेत का? सगळ्या बोलीसुध्दा अचूक संप्रेषणच करतात- अचूक संवाद साधतात. म्हणून तर त्या आदिम काळापासून जिवंत आहेत. ‘मन वढाय वढाय’च म्हटलं पाहिजे हे तुम्ही कबूल करता. म्हणजेच बोली महत्वाच्या ठरतात आणि त्यांचे उच्चारही त्यांच्या नैसर्गिक हेलसह जसे आहेत तसेच ठेवले पाहिजेत. मराठी प्रमाणभाषा (वा कोणतीही प्रमाणभाषा) ही बोलींच्या पायावर उभी असते. (प्रमाणभाषा ही आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या अनेक बोलींच्या शब्द बळावर तयार झालेली कृत्रिम पण रूळलेली भाषा असते.) आपण म्हणता तसं आजही भाषेत सोवळंओवळं पाळलं- बोलींना हलक्यात घेतलं तर मराठीही संस्कृतसारखी लवकरच मृत भाषा होईल.’
ग्रुपवर पोस्ट फॉरवर्ड करणारी व्यक्ती : ‘‘बरं! मग काय म्हणू? मरण टाळण्यासाठी काहीही! विद्वान सर्वत्र ० ते!’’
मी : ‘ही टिपणी अशोभनीय आहे. पण मी आपल्याला तशाच वाईट भाषेत उत्तर देणार नाही. शेतकऱ्यांना ग्रामीण भागात उच्चार शिकवायला तथाकथित उच्च भाषा बोलणारे लोक येतील का? आणि आले तरी त्यांनी ती का शिकावी? अथवा आपण ग्रामीण भागात जन्माला आला असता तर आपली हीच भूमिका असती का? ह्या संदर्भात उलट उत्तर असेही देता येईल... तथाकथित विव्दान फक्त पुण्यात ० ते!’
तिसरी व्यक्ती : ‘‘सर, महाराष्ट्रातील लोकांकरता हा वाद ठीक. पण परकियांना जेव्हा मराठी शिकायची असते तेव्हा ती प्रमाण असायला हवी. आपण प्रमाण इंग्रजी शिकतो. इंग्लडमध्ये प्रांतवार भाषा नसेल का? बोली भाषा प्रमाण भाषेला समृद्ध करते. वरील वाद न संपणारा आहे. मी खेड्यातून आलोय.’’
मी : ‘आपलं म्हणणं विशिष्ट संदर्भात बरोबर आहे. पण वर दिलेल्या त्या विशिष्ट टिपणीत बोलीभाषा बोलणाऱ्यांची स्पष्ट हेटाळणी केलेली आहे. म्हणून मी केवळ मराठी भाषेसाठी प्रतिक्रिया दिली. सामायिक भाषा बोलीकांनी बोलींकडं उदार दृष्टीनं पहायला शिकावं.’
ग्रुपवर पोस्ट फॉरवर्ड करणारी व्यक्ती : ‘‘का बरं? अशुद्ध सर्वच चालवून घ्यावं लागेल! असे अनर्थ तुम्हाला मान्यच झाले पाहिजेत. माझा मुद्दा आपोआप सिद्ध झाला बघा! तेवढाच मुद्दा होता! होय- शिकायला कष्ट का करू नयेत? बोलींची गोष्ट वेगळी. पण तुमच्या भूमिकेवरून चाललो तर मराठी मरणाआधीच मरेल! ज्ञानभाषा तर होणारच नाही- कारण तिला नेमकेपणाच नसेल.’’
मी : ‘काय सिध्द झालं आणि कसं? मुळी भाषेत शुध्द अशुध्द असं काही नसतंच. मराठी ही ज्ञानभाषा आजच आहे... बोलीच्या बोलीकांनी प्रमाणभाषा का शिकावी? त्यांची बोली ही त्या त्या ठिकाणी प्रमाणभाषाच आहे! तुम्ही बोली का शिकत नाहीत मग? कारण तुम्हाला त्याची आवश्यकता वाटत नाही. ग्रामीणांनाही म्हणूनच प्रमाणभाषा शिकायची गरज नाही. ग्रामीण लोक बोलतात ती बोली, त्या त्या लोकजीवनाची- लोकसंस्कृतीची- परिवेशातली नैसर्गिक भाषा असते. बोलींच्या पायावर प्रमाणभाषा उभ्या राहतात. बोली आहेत म्हणून प्रमाणभाषा आहे. बोली वगळल्या तर प्रमाण मराठी मरायला वेळ लागणार नाही.’
ग्रुपवर पोस्ट फॉरवर्ड करणारी व्यक्ती : ‘‘पुणे / मुंबई वगैरेचा प्रश्न नाही. मी संपादक आहे. नियतकालिक दोन्ही शहरातून चालवलं. शुद्धलेखनासाठी अपार कष्ट घेतले. इतर अनेक नियतकालिकांनीही. इथं अशुद्ध छापून येऊ देत का तुमचे लेख? तुम्हाला चालेल- वाचकांना चालणार नाही. बोली भाषेतले शब्दही नेमकेच लिहावे लागतील हा मुद्दा नाही पटला का? नियतकालिकामधे ग्रामीण लेखकांचे बोलीशब्द तसेच ठेवतो. लई ब्येसचं फार चांगलं करत नाही. पण ते काय लिहिलंय ते कळायला तर हवं ना? ‘ळफी केस’ लिहून काय कळणार केस काय आहे ती!’’
मी : ‘ळफी केस म्हणजे काय? आपल्याला नक्की काय म्हणायचं ते नीट कळलं नाही. पण तरीही मुद्दा स्पष्ट करतो. समजा मी माझ्या अहिराणी भाषेतल्या लेखात वाक्य लिहिलं, ‘पानी पी घिदं आनि बसनू मंग घरमा जरासा.’ हे वाक्य आपण जसंच्या तसं छापलं तरच ते योग्य राहील. पण तुम्ही शुध्द करण्याच्या तथाकथित प्रयत्नात (प्रुफ रिडींग करताना) हे वाक्य जर पुढील प्रमाणं दुरूस्त केलं, ‘पाणी पी घिदं आणि बसनू मंग घरमा जरासा.’ तर हे तुम्ही दुरूस्त केलेलं वाक्य चुकीचं होईल. कारण अहिराणीत ‘ण’ नाहीच, ‘न’ वापरतात. मराठीत ‘ण’ वापरतात, म्हणून अहिराणीतही वापरावा असा आपला आग्रह दिसतो. हिंदी भाषेत जसा ‘ण’ नाही तसा अहिराणीतही ‘ण’ नाही. तीच बाब ‘ष’ ची. म्हणून अहिराणीत ‘भाषा’ हा शब्द लिहिताना ‘भाशा’ असं लिहिलं तर ते अहिराणीत (तुमच्या म्हणण्याप्रमाणे) शुध्द राहणार आहे. वरील ज्या टिपणीवर आपली चर्चा सुरू आहे, त्या टिपणीत हा मुख्य घोळ आहे. त्या टिपणीत- टिपणी लिहिणाऱ्यानं तथाकथित सुशिक्षितपणा दाखवण्यासाठी भाषाशास्त्रच निकालात काढलं आहे. (भाषेत शुध्द- अशुध्द संकल्पना नाहीत, पण आपण तो शब्द पुन्हा पुन्हा वापरत आहात, त्या स्पष्टीकरणासाठी मला आपल्या ‘शुध्द-अशुध्द’ संकल्पनेत हे लिहावं लागलं.)’
ग्रुपवर पोस्ट फॉरवर्ड करणारी व्यक्ती : ‘‘मग ज्ञानभाषेत भोंगळ शब्दकळा चालणारच नाही. शैली या शब्दाला काही अर्थच राहणार नाही, वाटेल तसं लिहिलं तर. भाषेच्या सौंदर्याला का मुकायचं अशुद्धाच्या हव्यासापायी? हाही एक उपहासच- नव्हे, विटंबना जाणूनबुजून केलेली. माझी टिपणी तुम्हाला खटकली, तिथेच प्रमाणभाषा जिंकली! असो. जो जे वांच्छील तो ते लिहो... पण जो जसे लिहील तसे सर्वांनी चालवून घ्यावे ही मात्र अनर्थकारक भूमिका आहे.’’
मी : ‘भोंगळ शब्दकळा वेगळी आणि बोलीभाषा वेगळी. बोली भाषेलाही स्वयंभू शैली आहे- स्वयंभू शब्द आहेत. वाटेल तसं लिहिणं म्हणजे चांगलं लिहिणं असं कोणी आणि केव्हा सांगितलं? कोणत्याच बोली भाषेत वाटेल तसं बोलणं वा लिहिणं नाहीच मुळी. भाषेच्या सौंदर्याला मुकायचं नसेल तर कोणत्याही भाषेकडं डोळसपणे आणि उदार दृष्टीनं पाहिलं पाहिजे. तिरस्कृत पध्दतीनं व्यक्त होऊन नाही. पुज्यतेला आपण शून्यात गणलं म्हणून खटकलं. प्रमाणभाषेच्या विरूध्द मी केव्हाच लिहिलं नाही. माझी मराठी- प्रमाणभाषा तर जिंकलीच पाहिजे. प्रमाणभाषा हरावी असं माझं म्हणणं आहे हे तुम्ही कसं काय ठरवता? (मराठीच नव्हे तर इंग्रजी, हिंदी आणि उर्दुही जिंकावी. कोणत्याही भाषेचा व्देष नको.) पण माझ्या प्रमाणभाषेतल्या अनेक नैसर्गिक बोलींवर जर कोणी हेटाळणीनं बोलेल, तर ते मी मुकाट्यानं खपवून घेणार नाही. जगातल्या कोणत्याच भाषेवरची टीका मी सहन करू शकत नाही. जगातल्या सगळ्याच बोलींचा- भाषांचा आपण आदर केला पाहिजे व त्यांच्यातलं सौंदर्य समजून घेतलं पाहिजे. आजच्या सर्व बोली या भाषाच आहेत, असं आजचं जागतिक भाषाशास्र सांगतं.’
ग्रुपवर पोस्ट फॉरवर्ड करणारी व्यक्ती : ‘‘मी खेड्यात गेले तर बोलताना त्यांना समजेलशा शब्दांतच बोलते- त्यांचा हेल काढून बोलते. तामिळनाडूत इंग्रजी बोलताना त्यांचे उच्चार / हेल वापरते. कारण कम्युनिकेशनसाठी ते आवश्यक आहे. त्यात हसण्यासारखं काही नाही.’’
मी : ‘बरोबर. आपल्या या भूमिकेचं स्वागत करतो. देवेगौडा पंतप्रधान होते, तेव्हा ते संसदेत कन्नड टोनमध्ये इंग्रजी बोलायचे. माझ्या इंग्रजी वा मराठी बोलण्यातही अहिराणी टोन असतो. आणि हे सर्व साहजिक असल्याचं आजचं भाषाशास्त्र सांगतं. टोन बदलला म्हणजेच भाषेचे उच्चार बदलतात. लेखाच्या सुरूवातीला दिलेलं ते विशिष्ट अवतरण म्हणजे आपण स्वत: उच्च आणि इतरांना कमी समजण्याची मानसिकता आहे. आज जातीवरून कोणाला उघडपणं चिडवता येत नाही, म्हणून काही लोक आता भाषेवरून चिडवू लागलीत की काय, अशी या अवतरणावरून शंका येते.’
या नंतर सदर व्यक्तीचे युक्तीवाद आले नाहीत.
भाषा कोणतीही असो, ती माणसाला जोडण्यासाठी आहे. संवादासाठी असते. तसेच कोणाला कळू नये म्हणून ती कृत्रिमपणे तयार होत नाही. आपल्या लोकसंस्कृतीचा परिवेश ती अनायासे उपयोजित करत असते. (आपल्या वर्तृळातच समजाव्या म्हणून काही मानवी गटात कृत्रिम भाषाही तयार केल्या जातात. पण अशा भाषा या भाषा नसतात आणि बोलीही नसतात.)
एका गावापासून तर चार- चार जिल्ह्यात पाय पसरून बोलली जाते, ती त्या परिवेशाची बोली. एका गावात आणि एकच भाषा बोलणारे लोकसुद्धा आपापली खास भाषा बोलत असतात. एक म्हणतो, माझी भाषा शुद्ध आहे, दुसरा म्हणतो, माझी भाषा शुद्ध. असं म्हणणारे आपलं स्वत:चं अशुध्दपण जगजाहीर करत असतात.
खरं तर भाषा ही भाषा असते. भाषेत शुद्ध आणि अशुद्ध असं काही नसतं. आपल्या दृष्टीनं कोणी चुकीची भाषा बोलत असेल तर ती भाषा ‘चुकीची’ नसून त्या व्यक्तीची ती ‘खास’ भाषा असते. म्हणूनच भाषेबाबत ‘अस्सल’ आणि ‘कम-अस्सल’ असं काही नसतं. कोणाच्याही भाषेला शरण जात आपण स्वत:च वेळोवेळी स्वत:ला शुद्ध करून घ्यावं. म्हणजे कोणाच्या भाषेला ‘नावं ठेवणं’ व आपल्या भाषेला आपणच ‘शुद्ध म्हणणं’ आपल्या वाणीतून त्याज्य ठरेल. दोन व्यक्तीत वा दोन भिन्न भाषांत मैत्रीपूर्ण संवाद पूर्ण झाला की भाषा जिवंत होत जातात
ताजा कलम : वरील साक्षेपी निरसन लिहून झाल्यानंतर विविध भाषणात उल्लेखित प्रेमानंद गज्वी व भालचंद्र नेमाडे यांचे उद्गार समाजमाध्यमातून उपलब्ध झाले, ते इथं पुष्टी- संदर्भ म्हणून मुद्दाम देत आहे :
‘‘मराठी भाषा... बोलीभाषांच्या जिवावरच उभी आहे... पण ते विसरून प्रमाणभाषा स्वयंभू आहे असं... ‘ण’… वाल्यांना वाटत आहे! या प्रमाणभाषेलाच... अभिजात मराठी भाषा... मानण्याचा सुप्त डाव... ‘ण’... वाल्यांच्या मनात आहे की काय अशी शंका वाटते!...’’ - प्रेमानंद गज्वी.
२. ‘‘सुदैवानं आपल्याकडं ५० टक्के निरक्षर लोक आहेत, त्यामुळं ५० टक्के मराठीला धोका नाही. निरक्षर लोक आपली भाषा वाचवतील. पण साक्षर व सुशिक्षित सो कॉल्ड विव्दान यांच्यापासून मराठीला धोका आहे.’’ - भालचंद्र नेमाडे.
(‘सर्वधारा’, एप्रिल- मे- जून २०२६ च्या नियतकालिकात प्रकाशित झालेला लेख. इतरत्र प्रकाशित करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर राजाराम देवरे
ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा