रविवार, ११ जानेवारी, २०२६

मराठी आणि महाराष्ट्र धर्म! (मुंबई-ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने)

 

 

  - डॉ. सुधीर रा. देवरे

                     हिंदीशिवाय दुसरी कोणतीही बोली मराठी भाषेची जागा घेऊ शकत नाही. म्हणूनच महाराष्ट्रात मराठीला हिंदीपासूनच जास्त धोका आहे! शब्दांचे आदान प्रदान होत भाषा प्रवाहित होतात, पण हिंदी माणसांसहीत हिंदी भाषा मराठीत एकतर्फी आदानच होत आहे, मराठीचे प्रदान कधी होणार? बाहेरची कोणतीही भाषा स्थानिक जनतेत प्रचलित असलेल्या एखाद्या भाषेला मारु शकत नाही, पण सत्तेतल्या वेगळ्या भाषिक प्रेमाच्या लोकांनी ठरवले तर ते कामकाजात जवळची भाषा बदलून (हिंदी- मराठी साम्य) स्थानिक बहुजनांची भाषा ठरवून मारू शकतात! महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांची मातृभाषा मराठी आहे की हिंदी आहे? त्यांची मातृभाषा मराठी असेल तर या सत्तेला एवढा हिंदीज्वर येण्याचे कारण काय? मराठी सत्तेत ज्यांचे हिंदीचे प्रेम उतू जात असेल, त्यांचे मराठी राज्यात काय काम आहे? त्यांनी महाराष्ट्रातून चंबुगबाळे आवरून दिल्लीत वा उत्तर भारतात सत्ताकारण करावे. आधी मराठी भाषा, महाराष्ट्र धर्म, सार्वभौम संयुक्त महाराष्ट्र प्रांत, नंतर काय ते! मराठी माणूस जसा न शिकता ऐकून हिंदी बोलू शकतो, तसा हिंदी भाषिक माणूसही ऐकून मराठी बोलू शकतो. पण तशी त्यांची इच्छाशक्ती नाही! जो इथे राहून मराठी जन्मभूमी- कर्मभूमीला होत नाही, तो दुसऱ्या प्रदेशाला वा भारताला कसा होईल? म्हणून महाराष्ट्रातील भाजपसह सर्व राजकीय पक्षांनी मराठीसाठी एक होत मराठी व महाराष्ट्र विरोधी लोकांचा सत्तेतून कडेलोट करायला हवा!  

                    आज मराठीची झाली तशी हिंदी प्रातांत हिंदी भाषेची केविलवाणी अस्था झाली असती तर मी हिंदीच्या बाजूने असेच लिहिले असते! भाषा कोणतीही असो तिचा व्देष करता कामा नये आणि एखादी भाषा मारण्याचे प्रयत्न तर खूप असमंजसपणाचे ठरतात! महाराष्ट्र म्हणजे फक्त भूगोल नाही. (परप्रांतीय लोक इथल्या जमिनी विकत घेऊन इथला भूगोलही बदलणार आहेत.) महाराष्ट्राचा इतिहास, लोकजीवन, लोकसंस्कृती आणि इथल्या अनेक घटकबोलींसह मराठी भाषा वजा केली तर शिल्लक शून्य राहील! मुंबईत मराठी भाषेत बोलायचे नाही, मग काय युपी बिहारात मराठी बोलाल का? लोकहो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य कारकिर्दीपासून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आठवा, वाचा, अभ्यास करा. १०६ लोकांनी मराठी मुंबईसाठी हौतात्म्य पत्करले ते आठवा.   

                    एका चॅनलवर मुंबईच्या बाजारात निवडून निवडून अनेक परप्रांतीय लोकांची मुलाखत एवढ्यात पाहण्यात आली. अलीकडच्या काळात त्यांची बोलण्याची मग्रुरी, उध्दटपणा, उद्दामपणा, निलाजरेपणा लगेच लक्षात येत आहे. आम्हाला मराठी शिकायची गरज नसून यापुढेही शिकणार, बोलणार नाही असे सहज हिंदीत सांगतात. मुंबईतले वातावरण यापूर्वी इतके कधीच गढूळ झालेले नव्हते. काही परप्रांतीय लोक आतापर्यंत मराठी लोकसंस्कृतीत मिसळत नसले तरी याआधी स्थानिकांवर कुरघोडी करण्याइतके निर्ढावले नव्हते, आपण परराज्यात उपरे आहोत याची जाणीव त्यांना होती. आता मात्र ते मराठी माणसाला भाषेसह सगळ्याच क्षेत्रात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. मुंबईतल्या काही भागात मराठी लोकांना घरे विकत घेता येत नाहीत, भाड्याने मिळत नाहीत, काही आस्थापनात मराठी तरूणांना नोकऱ्या दिल्या जात नाहीत. राजरोस ‘मराठी तरुण नको’ अशा जाहिरातीही प्रकाशित होतात. परप्रांतीय लोक आम्ही भारतीय आहोत असे सांगत मुंबईत हक्काने राहू शकतात, पण आपल्याच प्रांतात मराठी लोक- तरूण परप्रांतीयांच्या कॉलनीत राहू शकत नाहीत, त्यांच्या आस्थापनात नोकऱ्या करू शकत नाहीत! या लोकांचा असा नेमका कोणता भारत आहे? कोणत्या राज्यघटनेनुसार हे सुरू आहे? मराठी माणसाच्या विरोधात त्यांच्या संघटना बांधल्या जात आहेत. महापालिका निवडणुकीत अमराठी लोक मोठ्या प्रमाणात उमेदवार असून एका राष्ट्रीय पक्षाने ४४ अमराठी उमेदवार उभे केले आहेत. मुंबई ताब्यात घेण्याच्या गोष्टी ते राजरोस करत आहेत. कोणाच्या वरदहस्ताने हे होत आहे? मराठी प्रांतीय म्हणून निवडून आलेले आपले सरकार आपल्यासोबत नसेल तर असेच होत राहील. मराठी लोकांच्या अस्मितेच्या स्वतंत्र प्रांतिक मान्यता मिळालेल्या महाराष्ट्र राज्यातल्या मराठी लोकांनी निवडून दिलेले सरकार स्थानिकांच्या बाजूने नाही?

                    मराठी भाषा, मराठी लोकसंस्कृती आणि स्थानिक अस्मितेच्या जतनासाठी महाराष्ट्राला सक्षम प्रादेशिक राजकीय पक्षाची गरज भासू लागली आहे का? मुंबईत महाराष्ट्र धर्म जिवंत ठेवायचा असेल तर अमराठी उमेदवाराला (तो माणूस तुम्हाला आवडणाऱ्या पक्षातला असला तरी) मतदान करू नका! महाराष्ट्रातले धार्मिक सत्ताधारी लोक मराठी माणसाला हिंदू समजत नाहीत का? मग सरकारी पातळीवरून मराठी- हिंदी भाषिक झुंज लावण्याचे कारण काय? स्वार्थासाठी खेळलेली ही खेळी महाराष्ट्राच्या मुळावर येऊ शकते! लोकसभा- विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही हिंदू असता, मग मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठी भाषिक हिंदूलोक शत्रू कसे होतात? लोकहो, डाव ओळखा आणि हाणून पाडा! मराठी सत्तेतला हिंदी टक्का जसा वाढत जाईल तसा हा मराठी प्रांत नामशेष होत जाईल! आणि ज्यांना हे मराठी स्वतंत्र अस्मितेचे प्रांतिक राज्य मान्य नसेल, त्यांना महाराष्ट्राच्या सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. कारण राज्याचा मूळ पायाच मराठी प्रांत असा आहे. तसे नसते तर एखाद्या हिंदी प्रदेशाला वा केंद्राला हे राज्य जोडले गेले असते.

                    आपली भाषा मारणारे, आपल्या भाषेतल्या शाळा बंद करणारे, मराठी शाळेच्या वास्तू उध्वस्त करणारे, पहिलीपासून त्रिभाषा सूत्राच्या नावाने हिंदी लादू पाहणारे, अमराठी लोकांना सर्व दरवाजे उघडे करुन देणारे, आपल्या लोकांना जगवणारी झाडे तोडणारे, आपणच निवडून दिलेले सरकार आपले का नाही, हा जनतेच्या मनातला प्रश्न आहे! सरकार उत्तरदेही आहे की नाही? लोकसभेला हिंदू- मुसलमान करून, विधानसभेला मराठा- ओबीसी लढवून आणि आता मुंबई महापालिकेसाठी मराठी- हिंदी भाषा वाद उकरून निवडणूक जिंकण्याचा बेत जे कोणी करत असतात, ते लोक सामाजिक बांधिलकी पाळणारे नसतात, फक्त सत्तापिपासू ठरतात. म्हणून आज मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र, हेच सत्य! बाकी सगळे असत्य! मराठी भाषा आणि मुंबई वाचवा. मुंबईत एकही परप्रांतीय निवडून यायला नको. परप्रांतियांचे, परराज्याचे लांगुलचालन करणारे आणि केंद्रात महत्वाचे पद मिळवण्यासाठी हिंदी भाषेला कुरवाळणारेही निवडून यायला नकोत. मग ते मराठी भाषिक असोत, परभाषिक असोत की कोणत्याही पक्षाचे! आपला धर्म- महाराष्ट्र धर्म! आपली अस्मिता, भाषा, लोकसंस्कृती मराठी! मुंबईत फक्त मराठी बोला!

                    संपूर्ण महाराष्ट्रातील आपापल्या गावात- शहरात (आपापल्या मातृभाषा बोलीसह) मराठी भाषा बोलली जाते. आपल्या गावातले काही नागरिक आपल्या कुटुंबात हिंदी सदृश्य भाषा बोलत असले तरी ती हिंदी नसते, त्यांची पारंपरिक बोली असते, पण हे नागरिक बाहेर आपल्याशी मराठी बोलतात, कारण ते मराठीच लोक आहेत. म्हणून त्यांच्याशी आपण हिंदीत न बोलता मराठीतच बोलावे. कोणत्याही दुकानात, हॉटेलीत, व्यवहारात, प्रवासात, फोनवर मराठीतच बोलावे. दुसऱ्या राज्यात गेल्यावर, दुसऱ्या राज्यातल्या व्यक्तीशी फोनवर अथवा काही दिवसांसाठी पर राज्यातून आलेल्या पाहुण्यांशी हिंदी बोलायला हरकत नाही.

                    आपली मुले, नातवं, पाल्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असतील तर त्यांनी इंग्रजीत बोलायला हरकत नाही, पण आपली स्थानिक मायबोली आणि मराठीही त्यांना चांगल्या प्रकारे बोलता यायला हवी याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुले मराठी भाषिक असतात, शिक्षकसुध्दा मराठी भाषिक असतात, पण संवादाची भाषा मुद्दाम हिंदी वापरली जाते. असे का? पालकांनी जागरूकपणे हे शाळेला विचारले पाहिजे. एकतर शाळेत तुम्ही इंग्रजीतच बोला, इंग्रजी व्यतिरिक्त अन्य भाषेत संवाद करायचा असेल तर तो संवाद मराठीत व्हायला हवा, हिंदीत नाही. इंग्रजी बोलता येत नाही म्हणून आपल्याच भाषेचा व्देष करत हिंदी का बोलता? तुम्ही पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले आहे, हिंदी माध्यमाच्या नव्हे, हे लक्षात ठेवा.

                    मुंबई- ठाणेकरांनो आताच जागे व्हा, तुम्ही स्वत: अडचणीत सापडाल अथवा हा वणवा तुमच्या घरापर्यंत पोचेल तेव्हा तुम्हाला भविष्यात कधीतरी जाग येईल, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. म्हणून मग्रूर परप्रांतियांना आणि त्यांना पायघड्या अंथरणाऱ्यांनाही पाडा. हिंदूचे राज्य म्हणून नव्हे, मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचे महाराष्ट्र राज्य १ मे १९६० ला अस्तित्वात आले आहे, याचे (संविधानानुसार) भान ठेवा. महाराष्ट्र धर्म वाचवा.

                    (अप्रकाशित लेख. मुंबई-ठाण्यातील लोकांना पाठवा. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

दिनांक : 11-1-2026

*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा