- डॉ. सुधीर रा. देवरे
माझी अप्रकाशित ‘जीवदान’ कादंबरीची पीडिएफ फाईल नोव्हेंबर २०२३ ला ईमेलने राजहंस प्रकाशनाकडे छापण्यासाठी विचारार्थ पाठवली होती. अचानक २३-०२-२०२४ ला राजहंस प्रकाशनाकडून फोन आला की, ‘आपली कादंबरी आम्ही प्रकाशनासाठी स्वीकारली आहे. अभिप्रायासाठी डॉ. विनया खडपेकर यांच्याकडे आपली कादंबरी पाठवली होती, कादंबरी छापण्यासाठी स्वीकारावी असे त्यांनी कळवले आहे. कादंबरीची ओपन वर्ड फाईल ईमेल करा. करारपत्र तयार करण्यासाठी आपली काही माहिती हवी आहे. तसा ईमेल पाठवला आहे. तो फॉर्म भरून आणि इतर माहितीही पाठवा. ती माहिती मिळाली की करारपत्र तयार होईल आणि पुस्तक लगेच प्रकाशित होईल.’
ऐकून साहजिकच आनंद झाला. ‘राजहंस प्रकाशना’तर्फे अजून माझे एकही पुस्तक प्रकाशित झाले नव्हते. ईमेल पाहिला. करारासाठी हव्या असलेल्या माहितीचा विहित नमुन्यातील फॉर्म भरून त्याच दिवशी तात्काळ ईमेलने पाठवला. (लेखकाचा तपशिल, बँक तपशिल, कॅन्सल चेक, फोटो इत्यादी). तसेच ‘जीवदान’ कादंबरी (संपूर्ण word open unicode file) व पीडिएफ ईमेलने त्याच दिवशी पाठवली.
दोन तीन महिन्यांनी शिरीष शेवाळकर यांचा फोन आला. म्हणाले, ‘करारपत्र पाठवले आहे, वाचून सही करुन पाठवा.’ पाठवले. नंतर १९ जुलै २०२४ ला राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे यांचा फोन आला, ‘आधीचे कामे साचल्यामुळे कादंबरी ऑक्टोबर २०२५ ला प्रकाशित होईल, चालेल ना आपल्याला?’ कादंबरी स्वीकृत झाल्यापासून २० महिन्यात प्रकाशित होणार होती तरीही ‘चालेल, काही घाई नाही’ म्हणालो.
ऑक्टोबर २०२५ महिना उजाडला तरी पुस्तकाविषयी काही कळेना. म्हणून मी नोव्हेंबरला डॉ. सदानंद बोरसेंना फोन केला. ते म्हणाले, एक महिना उशीर होतोय पुस्तकाला, पण येईल एवढ्या दहा पंधरा दिवसात.’ दहा पंधरा दिवसाचा उल्लेख ऐकून मी चकीत होत म्हणालो, ‘मला फायनल तपासणीला पाठवताहेत ना पुस्तक? कारण कादंबरीतला बराच भाग अहिराणी भाषेत आहे, तो नीट तपासला पाहिजे. मुखपृष्ठही पाठवा पहायला.’ ते म्हणाले, ‘तशी काहीच आवश्यकता नाही. चांगली तपासणी झाली आहे. आणि मुखपृष्ठ हे आमच्याकडून लेखकाला सरप्राइज असते, म्हणून आपण लेखकाला आधी पाठवत नाही.’ हे ऐकूनही चकीत झालो.
नंतर काही दिवसांनी अचानक लेखकाच्या पुस्तक प्रतींचे पार्सल आले. न पाहिलेल्या मुखपृष्ठाबद्दल उत्सुकता होती. मुखपृष्ठात ढोबळ कल्पना असली तरी ठीक आहे, आवडले. लेखकाच्या पुस्तक प्रती, संपादकांचे पत्र, मानधनाचा धनादेश आणि सोबत पेढ्यांचा पुडासुध्दा होता. याआधी काही प्रकाशकांकडून पुस्तकांसोबत मानधनाचा धनादेश मिळाला होता, पण पुस्तकांसोबत मिठाई पहिल्यांदा मिळाली होती.
पुस्तकांसोबतचे संपादकांचे पत्र लगेच वाचले,
‘प्रिय डॉ. सुधीर राजाराम देवरे,
सस्नेह नमस्कार.
‘जीवदान’ ही तुमची अत्यंत अनवट कादंबरी तुमच्या हाती सोपवत आहे.
पौगंडावस्थेतील एका मुलाच्या आयुष्यात घडलेल्या भीषण घटना, घडत्या वयात सामोरे आलेले विलक्षण प्रसंग, आईवडिलांचे संरक्षक छत्रच उद्ध्वस्त करणारी त्याच्या वाट्याला आलेली परिस्थिती या सार्यांनी त्याच्या आयुष्याचा चोळामोळा करून टाकलेला.
भावनिक आंदोलने आणि मनोव्यापार यांची धक्कादायक कहाणी साकारणारी ही शोकांत कादंबरी वाचकाला चटका लावणारी ठरेल, अशी मला आशा आहे.
या कादंबरीमध्ये हृदयावर चरे पाडणारी प्रत्यक्ष आणि प्रच्छन्न हिंसा वाचकाच्या नजरेसमोर उभी करणारे मुखपृष्ठ ‘राजहंसी’ कलाकार तृप्ती देशपांडे यांनी साकारले आहे. ते तुम्हालाही भावेल, याची मला खात्री आहे.
या कादंबरीचे वेगळेपण अधोरेखित करणारी श्री. शशिकांत सावंत यांची प्रस्तावना कादंबरीला मूल्यवृध्दी देणारा वेगळा आयाम ठरते.
आपल्या दोघांच्या समान उदिष्टामुळे - कादंबरी योग्य प्रकारे प्रकाशित व्हावी - या अडचणींवर मात करता आली.
फोनवर आपल्याशी बोलणे झाले असता प्रकृतीच्या काही मर्यादांमुळे तुम्हाला सटाणा सोडणे शक्य होत नसल्याचा उल्लेख तुम्ही केला होता. नाशिकला येणे झाल्यास तुमच्याशी संपर्क साधेन. शक्य असल्यास सटाण्याला तुमची भेट घेण्याचा प्रयत्न करीन.
तुमच्या कुटुंबीयांना आणि सुहृदांना सस्नेह नमस्कार.’
- डॉ. सदानंद बोरसे, संपादक, राजहंस प्रकाशन, पुणे.
पुस्तक प्रकाशित होताना प्रकाशनाने लेखकाला कसा सुखद धक्का दिला याबद्दलचे वरील सर्व कथन आहे. पण कादंबरीत नक्की काय आहे, तिचे कलात्मक मूल्य काय, मराठी सारस्वतात तिचे स्थान काय, याबद्दल शशिकांत सावंत प्रस्तावनेत म्हणतात,
‘‘जीवदान’ ही कादंबरी गोष्ट सांगण्याच्या प्रोसेसची गोष्ट आहे. तिचं कथासूत्र टोकदार ग्रामीण जाणिवांचं आहे. कादंबरीतला बराच भाग अहिराणी भाषेत असल्यामुळं भाषेबरोबर येणारे वाक्प्रचार, म्हणी आणि वेगळ्या शब्दांमुळं ती समृद्ध झालेली आहे. तिच्यामध्ये क्रौर्य आहे, काळा विनोद आहे, चरचरीत व्यक्तिरेखा आहेत आणि खान्देशच्या परिसरातल्या माणसांच्या स्वभावाच्या गोष्टी आहेत... नायकाच्या स्वतःच्या आणि वडिलांच्या आयुष्यातल्या कितीतरी लहान-सहान मार्मिक गोष्टींमुळं मुख्य कथानकाला प्रवाहीपणा येऊन कादंबरी कलात्मक होत जाते... या कादंबरीतील अहिराणी भाषेतील अनेक शब्द, म्हणी, वाक्प्रचार, वाक्यप्रयोग हे आपल्याला वेगळं काही देऊन जातात... या कादंबरीचे सिक्वेल होतील असे अनेक बीजं तिच्या उपकथानकांत दडले आहेत... कुठल्याही कादंबरीला जीवनदृष्टी हवी, तिनं मानवी व्यवहाराचं काहीतरी ज्ञान आपल्याला द्यायला हवं, कुणाच्या तरी जगण्यात आपण डोकावतो आहोत, हे भान द्यायला हवं. हे सगळं या कादंबरीत आहे... प्रसिद्ध कादंबरीकार आणि संपादक विल्यम मॅक्सवेल म्हणाला होता की, कथा एकावेळी एकच गोष्ट सांगत असते, कादंबरी एकावेळी अनेक गोष्टी सांगू पाहते. सुधीर देवरे यांच्या कादंबरीत अशा अनेक गोष्टी आहेत. चित्रमयता हा तिचा एक गुण आहे... यात वडील आणि मुलाचं जे नातं आलेलं आहे, ते मराठी साहित्यात कुठंच आलेलं नाही. अनेकदा ग्रामीण म्हणून म्हटल्या जाणाऱ्या कादंबरीत मानसिक आंदोलन किंवा मनोव्यापार यांचा अभाव आढळतो. इथं मात्र तसं होत नाही. मोजक्या शब्दांत व्यक्तिरेखा, प्रसंग आणि प्रदेश उभा करण्याची ताकद या लेखनात असल्यामुळं कादंबरी वाचता वाचता, कधी संपली हेच कळत नाही. कादंबरीच्या या नव्या प्रयोगानं मराठी साहित्यात मौलिक भर घातली आहे एवढं मात्र निश्चित!’’
‘राजहंस प्रकाशना’साठी कादंबरी स्वीकृत करताना संपादिका डॉ. विनया खडपेकर म्हणतात, ‘‘सुधीर देवरे यांची 'जीवदान' ही लघुकादंबरी वाचली. ग्रामीण भागातील अल्पशिक्षित समाजातील मुलगा. वडिलांचा खून करणारा हा अल्पवयीन मुलगा रिमांड होममधून आत्मकथन करतो आहे, अशी कल्पना. वडिलांनी आईला छळले, तिचा खून केला, म्हणून या मुलाने सूड उगवला. मुलाच्या वयाला झेपेलशा शैलीतले हे कथन आहे. त्यात लेखकाचा कोणत्याही प्रकारचा आवेश नाही. न्यायअन्यायावर पोपटपंची नाही. ग्रामीण भागातील कुटुंब-चित्र, गाव-चित्र कादंबरीत प्रभावीपणे उमटले आहे. जाताजाता वास्तव चित्र आणि काल्पनिक कथा यातील भेदही लेखक दाखवून जातो.’’
पुस्तकात खूप मोठ्या प्रमाणात अहिराणी भाषा उपयोजित झाली असल्याने काही चुका राहून गेल्यात की काय म्हणून मी तात्काळ प्रकाशित झालेली कादंबरी पूर्ण वाचली. कादंबरीभर दोन चार किरकोळ चुका वगळता पुस्तक तपासणी चांगली झाली आहे. राजहंस प्रकाशनाने स्वीकारल्यापासून पुस्तक फक्त २१ महिन्यात प्रकाशित केले, हासुध्दा माझ्यासाठी एकूण छान आणि सुखद अनुभव होता. पुस्तक स्वीकृतीसाठी राजहंस प्रकाशनाने संपादक नेमले असले तरी कादंबरीच्या नावासह माझ्या संहितेत एका शब्दानेही त्यांनी बदल सुचवला नाही आणि परस्पर तसे काही संपादन केले नाही हेही खूप महत्वाचे वाटले.
शशिकांत सावंत यांनी कादंबरीला अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. श्री. दिलीप माजगावकर, डॉ. विनया खडपेकर, डॉ. सदानंद बोरसे, शिरीष शेवाळकर, तृप्ती देशपांडे (मुखपृष्ठ) आणि राजहंस प्रकाशनातील सर्वांनी ह्या पुस्तकासाठी मेहनत घेतली. खूप खूप धन्यवाद.
पुस्तकाविषयी माहिती :
पुस्तक : जीवदान (कादंबरी)
लेखक : सुधीर राजाराम देवरे
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे
पृष्ठ : १२५, किंमत : २०० रुपये
(अप्रकाशित लेख. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर राजाराम देवरे
ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा