शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

बोली टिकल्या तर टिकेल मराठी

  - डॉ. सुधीर रा.  देवरे


                    बोलीभाषा जिवंत राहिल्या, तर प्रमाण मराठी जिवंत राहील आणि बोलींशी युती केल्यानंच ती प्रवाही होईल. तंत्रबंधात अडकल्यानं भारताची पारंपरिक ज्ञानभाषा असलेल्या संस्कृतप्रमाणं तिला मृत भाषा होऊ द्यायचं की तिचं प्रवाहीपण टिकवायचं? मराठीला टिकवायचं- जगवायचं तर तिच्यात बोलीभाषांचं प्रभावी उपयोजन होणं गरजेचं आहे.
                    मराठी भाषा ही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही मोठ्या प्रमाणात बोलली जात असल्यानं तिच्या अस्तित्वाचा प्रश्न मुळीच उद्‍भवत नाही, असंही काही भाषिक कार्यकर्ते म्हणू शकतात. असा निष्कर्ष काढणं काही ठराविक मर्यादेपर्यंत ठीक असलं, तरी मराठी यापुढं महाराष्ट्रात कशा पद्धतीनं अस्तित्वात राहू शकेल हा मात्र चिंतेचा विषय ठरावा अशी परिस्थिती भोवताली आहे. मराठी कसदारपणे संवर्धित होण्यासाठी तिच्यात महाराष्ट्रातील बोलीभाषांचं प्रभावी उपयोजन होणं आज आवश्यक आहे. साहित्यातून हे काम प्रभावीपणं करता येतं आणि ते तसं करणं अवघड नाही.
                    महाराष्ट्रात लहान- मोठ्या परिसरात बोलल्या जाणार्‍या जवळपास पासष्ट बोली आढळतात. बोलीतले शब्द साहित्यात उपयोजित करताना ते शब्द कोणत्या बोलीतले आहेत हे त्या- त्या पुस्तकात वा तळटीपेत नोंदवण्याची मुळीच आवश्यकता नाही. लेखकाच्या निवासातून, त्याच्या क्षेत्रीय परिचयातून त्या बोलीभाषेचा परिचय आपोआप स्पष्ट होत जातो. उदाहरणार्थ, 'टहाळबन', 'चावळणं', फोत्र’, झोर्‍या’, फुईअसे काही शब्द फिक्शनात वापरले तर ते शब्द अहिराणीतले आहेत हे स्वतंत्रपणे तिथं नमूद करण्याची आवश्यकता भासू नये. काही काळ तळटीपेत त्यांचा अर्थ सांगितला तरी पुरे. कालांतरानं तशीही आवश्यकता भासणार नाही.
                    एका बोलीतले काही शब्द जसेच्या तसे दुसर्‍या काही बोलींमध्ये आढळतात, म्हणून ते शब्द अमूक बोलीतूनच इतर बोलींमध्ये आले असं आपल्याला ठामपणे मांडता येणार नाही. मात्र तरीही हे शब्द विविध बोलीभाषक लेखक प्रमाणभाषेत साहित्यात - फिक्शनात बहुतांशपणे वापरत नाहीत. उदा. उलसा (लहान), जाम (पेरू), घुगरी (उस्सळ), कुद (पळ), दप (लप), व्हता (होता) असे काही शब्द फक्‍त विशिष्ट एका बोलीतच अस्तित्वात आहेत असं नाही, तर ते अनेक बोलींमध्ये वापरले जातात हे लक्षात येतं. म्हणजेच हे शब्द बोलीतले असूनही मराठी प्रमाणभाषेत सर्वदूर परिचयाचे आहेत. असे शब्द मराठी साहित्यात रुळायला हवेत.
                    इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मराठी विषयांच्या पुस्तकात बोलीभाषांचा विस्तृत परिचय द्यायला हवा. महाराष्ट्रात पासष्ट बोलीभाषा बोलल्या जातात. म्हणून पाचवी ते बारावी या आठ इयत्तांमध्ये एकेक वर्गात आठ- आठ बोलीभाषांचा परिचय थोडक्यात विद्यार्थ्यांना करून देता येऊ शकतो. मात्र पाठ्यपुस्तकं तयार करणार्‍या मंडळाचं हे काम असून अशा मंडळावर योग्य व्यक्‍तींची निवड होणं गरजेचं आहे. अभ्यास मंडळ आणि पाठ्यपुस्तक मंडळातून जबाबदारीनं असं काम झालं पाहिजे आणि त्यासाठी योग्य व्यक्‍ती तिथं पाठवल्या गेल्या पाहिजेत.
                    नागर भाषा म्हणजेच प्रमाणभाषेचं महत्त्व अतोनात वाढवणं ही मराठीचं प्रवाहीपण कमी करण्याची चाल असू शकते. संस्कृत भाषेचा मारा करून प्रवाही मराठी वाक्यरचनेपासून सर्वसामान्यांना दूर लोटण्याचा प्रयत्न होतो. अशा प्रवृत्तींपासूनही सावध राहणं आवश्यक. या गोष्टींकडं लक्ष पुरवलं, तरच आपल्याला बोली बोलणार्‍यांचा न्यूनगंड दूर करता येऊ शकतो. अन्यथा बोली आणि प्रमाण मराठी यांच्यातली दरी यापुढंही वाढत जाऊ शकते.
                    सारांश, बोलीभाषा जिवंत राहिल्या, तर प्रमाण मराठी जिवंत राहील आणि बोलींशी युती केल्यानंच ती प्रवाही होईल. प्रवाही असणं हेच जिवंतपणाचं लक्षण आहे. तंत्रबंधात अडकल्यानं भारताची पारंपरिक ज्ञानभाषा असलेल्या आणि जिच्यात विपुल दर्जेदार वाड्‍.मय लिहिलं गेलं, अशा संस्कृत भाषेचं आज काय झालं हे सर्वज्ञात आहे. म्हणून आज मराठीचं प्रवाहीपण टिकवायचं की, संस्कृतप्रमाणं तिला मृत भाषा होऊ द्यायचं हे आपल्याला गंभीरपणे ठरवावं लागेल. मराठी भाषेतून व साहित्यातून अगदी नियोजनबद्ध उपयोजन करतच आज बोलीभाषांचं दस्तावेजीकरण सुलभ होऊ शकेल.
                    हे खरं आहे की, संवादाची कामचलाऊ मराठी भाषा कधीच मरणार नाही. मात्र तिचं क्षेत्र दिवसेंदिवस संकुचित होऊन ती फक्‍त ग्रामीण आणि झोपडपट्टीतल्या व्यवहारात पाहायला मिळेल. अशा पद्धतीनं तिचं महत्त्व कमी होत जाणार असल्यामुळंच हा चिंतेचा विषय ठरतो. आजच महाराष्ट्रात मराठी हा विषय शिक्षणात अजिबात नसला वा क्वचित असला तरी मराठीत गप्पा मारत कोणत्याही शाखेचा पदवीधर होता येतं, ही परिस्थिती बदलली पाहिजे. म्हणजे केवळ मराठी हा विषयच नव्हे तर एखाद्या विद्यार्थ्याला मराठी माध्यमातून बी. एससी. व्हायचं असेल तर किमान पदवीपर्यंतची सायन्सची पुस्तकं त्याला मराठीत उपलब्ध व्हायला हवीत. पूर्णपणे मराठीत शिक्षण घेण्याचा (आणि मराठीत परीक्षा देण्याचाही) हक्क त्याला मिळायला हवा. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्रांसह सर्व शास्त्रांची पु्स्तकं त्याला मराठीतून उपलब्ध झाली पाहिजेत. अशी परिस्थिती आज अजिबात नाही. आज अनेक ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थी शास्त्राच्या ज्ञानात चमकतात; परंतु इंग्रजी माध्यमाच्या अडसरामुळं मागं पडतात.
                    शास्त्रांच्या पुस्तकांप्रमाणेच संगणकाची- काँप्युटरची भाषाही मराठी झाली पाहिजे. आज काँप्युटरची संपूर्ण भाषा मराठी होण्याची गरज असताना महाराष्ट्रातील काँप्युटर विक्रेत्यांना मराठी फॉन्टसबद्दलसुध्दा काही सांगता येत नाही. मराठी फॉन्टस् हवे असतील तर आपल्याला त्यातील तज्ज्ञांची भेट घ्यावी लागते आणि ते त्यांच्या सल्ल्यानं आपल्या काँप्युटरमध्ये अपलोड करून घ्यावे लागतात. विशेषत: ग्रामीण भागात अशा समस्या जास्त प्रमाणात आहेत. अशी फॉन्टची दारूण परिस्थिती आजही आपल्या महाराष्ट्रात आहे. या पार्श्वभूमीवर काँप्युटरमधील संपूर्ण आज्ञावली व विंडोज सॉफ्टवेअर मराठीत आणणं ही कदाचित आपली कवीकल्पनाच ठरण्याची शक्यता अधिक आहे.
                    मराठी भाषा मोठ्या भौगोलिक क्षेत्रात बोलली जाते म्हणून तिला धोका नाही असं म्हणणं धारिष्ट्याचं ठरेल. मराठीची व्यावहारिक पीछेहाट कमी प्रमाणात असून शैक्षणिक व ज्ञानक्षेत्रातील पीछेहाट मात्र चिंताजनक आहे हे कबूल करावंच लागेल. अशा पद्धतीनं भाषा विकसित करायची जबाबदारी कुणा एकाचीच वा काही विशिष्ट संस्थांचीच नसून ही सामूहिक जबाबदारी ठरते. यासाठी आपण सगळ्यांनीच सजग होणं आवश्यक आहे.

                    (महाराष्ट्र टाइम्स- पूर्वप्रसिध्दी. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

          © डॉ. सुधीर रा. देवरे

           ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

१३ टिप्पण्या:

  1. संस्कृत मृत्यूपंथाची पांथस्थ का झाली? ती ज्ञानभाषा आहे/होती हे विधान सरसकट कसे मानता येईल? ज्या क्षणी ज्ञान ही विशिष्ट ज्ञाती विशेषाची मक्तेदारी, जन्मजात आरक्षित अधिकाराची आणि ज्ञातीबाह्य घटकांसाठी देव धर्माधिष्टित बंदी हुकमाची बाब ठरली/ठरवली गेली त्या क्षणालाच तिचा मृत्यूपंथ निश्चित झाला. एकाच कुटुंबात बाप्या संस्कृत बोलतो आणि बाई प्राकृत बोलते तेव्हा ती तथाकथित (सु)संस्कृत (की संकरित?) भाषा कालौघात लयास जात असेल तर शोकाकुल होण्याची गरजच नाही.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद. आपले नाव कळवा. प्रतिक्रिया प्रकाशित करता येईल.

      हटवा
    2. हि काय भानगड... दोन्ही चालू राहतील कि .. युती कसली? नसलेला वाद काढू नका
      हिंदी आणि इंग्रजीची नको असलेली घुसड हि दोन्ही कडे चालू आहे .. त्यावर काम करा हवे तर

      हटवा
  2. डॉ. सुधीर जी, आपण बोली भाषेविषयी प्रभावीपणे विचार मांडले आहेत. आपले दिड कोटी खान्देशी लोक अहिराणी भाषा बोलतात. आपल्या बोलीभाषेचे संवर्धन झालेच पाहिजे.

    उत्तर द्याहटवा