बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

बोलीभाषेतून साहित्यनिर्मिती होण्याची गरज

                                                                  - डॉ. सुधीर रा. देवरे   

                    महाराष्ट्रात साधारणपणे पासष्ट बोलीभाषा बोलल्या जातात. अधिकतम म्हणजे चार जिल्ह्यांच्या मोठ्या भौगौलिक क्षेत्रात अहिराणी बोलली जाते. (अहिराणी ही भाषा आहे. कोणतीही बोली ही भाषाच असते. बोली आणि भाषा असा भेद आजचं भाषाशास्त्र मानत नाही.) मालवणी- कोकणी भाषेला राष्ट्रीय पातळीवर, राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात प्रमाण भाषा म्हणून मान्यता आहे. इतर बोलीभाषांना मात्र अशी मान्यता नाही. जवळपास दीड कोटी नागरिक अहिराणी बोलतात.  बोलीभाषा  दिवसेंदिवस नामशेष होत चालल्या आहेत. त्यातले प्रवाहीपण साचल्यासारख झाल आहे. दर पंधरा दिवसाला जागतिक पातळीवर एक बोलीभाषा मरते.

          बोलीभाषेत लेखन करणाऱ्यांची कमतरता आहे. सर्व वाचक बोलीभाषेतली पुस्तकं वाचत नाहीत हे ह्यामागचं कारण आहे. अहिराणी भाषा बोलत असूनही अनेक प्रथितयश अहिराणी लेखक प्रमाण भाषेतच लिखाण करतात. हेच चित्र इतर बोलीभाषांमध्ये पहायला मिळतं.  सर्वदूरच्या प्रदेशांमध्ये विखुरलेला मराठी वाचक डोळ्यांसमोर ठेवून लेखकाला प्रमाण भाषेत लेखन करावं लागतं. म्हणून बोलीभाषेला ठरावीक असा वाचक वा प्रेक्षक उरलेला नाही.

          (प्रस्तुत लेखक संपादीत) ढोलसारखं अहिराणी भाषेतलं नियतकालिक पुणे- मुंबईसारख्या शहरांमध्ये उत्सुकतेनं वाचलं गेलं, पण धुळे- जळगावसारख्या अहिराणी भागातही दुर्लक्षिलं जातं. हा विरोधाभास सगळ्याच बोलीभाषांच्या बाबतीत दिसतो. शासकीय नियमानुसार दहा लाख लोकांपेक्षा अधिक लोक बोलीभाषा बोलतात तेव्हा त्या भाषेला प्रमाण भाषेचा दर्जा देण्यात येतो. असा दर्जा मिळाला म्हणजे बोलीभाषेत साहित्यनिर्मिती व्हायला परिस्थिती पूरक ठरते. मात्र, जनगणनेत लोक आपली बोलीभाषा ही मातृभाषा म्हणून सांगत नाहीत अशीही एकीकडे स्थिती आहे, आपली शैक्षणिक भाषा मातृभाषा म्हणून सांगतात. आणि जे नागरिक आपली मातृभाषा अहिराणी सांगतात, ते कागदावर लिहिलंच जातं असं नाही. हे सर्व सर्वे करणाऱ्या कर्मचार्‍यांवर अवलंबून. (म्हणून प्रत्यक्षात अहिराणी दीड- दोन कोटी लोक बोलत असूनही जनगणनेत ती दहा लाखांपेक्षा कमी दिसते.) बोलीभाषेतून साहित्यनिर्मितीबरोबरच दैनंदिन व्यवहारदेखील होणं अपेक्षित आहे. अलीकडे प्रमाणभाषेतून (साहित्यातूनही) बोलीभाषा उपयोजित होताना दिसत असली तरी बोलीभाषेतून समग्र चांगल्या कलाकृतीचं- साहित्यकृतींचं लिखाण होताना दिसत नाही. (अशा साहित्यकृतींचं प्रमाण खूप कमी आहे.) बोलीभाषांवर संशोधन त्रोटकपणे केलं जातं, पण संकलन मोठ्या प्रमाणात होतं, ते पारंपरिक लोकवाड्‍.मयाचं असतं. त्या त्या बोलीभाषेतून विनोद, गपशप, किस्से सोडल्यास ललित, गंभीर लेखन, कथा, कादंबरी गांभीर्यानं होताना दिसत नाही.

          सर्वच बोलीभाषांना लिपीचा प्रश्न असतो. कारण बोलीभाषा अजूनही मौखिक स्वरूपातच अस्तित्वात आहेत. त्यामुळे जवळच्या प्रमाणभाषेचा- महाराष्ट्रात देवनागरी (मराठी) लिपीचा आधार बोलीभाषेत लिहिताना घेतला जातो, ज्यात अनेक अडचणी येतात हे देखील बोलीभाषेत साहित्यलेखन न होण्याचं कारण आहे. वाचकवर्ग मर्यादित लाभत असल्यानं अशी पुस्तकं छापायला प्रकाशकही पुढं येत नाहीत. म्हणून लेखक प्रमाण भाषेचाच आधार घेत लिहिताना दिसतात. हे अत्यंत साहजिक असलं तरी बोलीभाषेतून लेखन होणं बोलीभाषा टिकवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि जी भाषा आपली मातृभाषा आहे तिच्यात लिहिणं नैसर्गिक ठरतं.

          प्रमाण भाषेत बोलीभाषेतील शब्द वारंवार वापरण्याचं प्रमाण काही लेखकांच्या लेखनात दिसून येतं, ही त्यातल्या त्यात एक चांगली आणि जमेची बाजू. त्यामुळं त्या त्या बोलीभाषेबरोबरच प्रमाण भाषादेखील समृद्ध होते. असे काही चांगले प्रयत्न वगळता बोलीभाषांमध्ये नैसर्गिक प्रेरणेने ठरवून लेखन होत नाही.  बोलीभाषेच्या वापरामुळं त्या त्या ठिकाणची लोकसंस्कृती साहित्यात खोलवर रुजण्यास मदत होते. त्यामुळं बोलीभाषा साहित्यात मुद्दाम, अगदी ठरवून वापरली जाणं आवश्यक आहे.

                  (दै. दिव्य मराठी, अक्षरा पुरवणीत दिनांक 18 जुलै 2012 रोजी, प्रियंका डहाळे यांनी घेतलेली माझी मुलाखत प्रकाशित. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

  © डॉ. सुधीर रा. देवरे

     ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

२ टिप्पण्या: