शनिवार, १ जून, २०१९

आरश्यातल्या आरश्यात : एक आस्वाद



- डॉ. सुधीर रा. देवरे
आरश्यातल्या आरश्यात वारले बेवारशी...
                        - मनोहर ओक
                        (आयत्या कविता मधून)

     मनोहर ओक यांच्या आयत्या कविता या कविता संग्रहातील ही पहिली कविता. एका ओळीची.
     या एका ओळीच्या कवितेतील शेवटचा बेवारशी हा शब्द ओळीत पहिला असता तर ते केवळ एक वाक्‍य झाले असते:
     बेवारशी आरश्यातल्या आरश्यात वारले! असे ते वाक्य झाले असते. पण बेवारशी हा शब्द ओळीच्या शेवटी गेल्याने या वाक्याला एक लय प्राप्त झाली आहे. मात्र केवळ हा शब्द शेवटी गेल्यानेच लय निर्माण झाली असे मात्र नव्हे. तर या एवढ्याश्या ओळीतच नाद लयीचे सुंदर मिश्रण आहे. म्हणून ही एकच एक ओळ संपूर्ण कवितेची अट पूर्ण करते. ती कशी हे पुढील विवेचनावरून ‍अधिक स्पष्ट होईल:
आरश्यातल्या           आरश्यात               वारले        बेवारशी
। ।                  । ।                   । ।           । ।
                                                       -  आ ची लय
                                                       
                                                            -  र चा नाद
चार शब्दांपैकी तीन शब्दात श ची लय आहेच पुन्हा.
लय + नाद  = नादलय  ~  काव्य  ~ कविता.
     एका आंग्ल कवीने (नाव आठवत नाही) म्हटलं आहे की, कविता धूसर राहील इतकी लहान असू नये आणि रसिकाची एकतानता राहणार नाही इतकी मोठीही असू नये.
     आपण पुष्कळ छोट्या छोट्या कविता वाचलेल्या असतात. आठ ओळींच्या, सहा ओळींच्या, चार ओळींच्याही. शंकर रामाणी यांची एक कविता दोन ओळींची आहे:
स्वच्‍छ एकटेच तळे
विसावले चांदण्यात.
     शब्द कमी जास्त आणि इकडे तिकडे झाले असतील तर चुकभूल देणेघेणे.
पण एक ओळ लिहून ती एक संपूर्ण कविता आहे असं म्हणणारे आणि इतरांनाही म्हणायला भाग पाडणारे मराठीतले मनोहर ओक हे पहिलेच कवी असावेत. (एका ओळीची, तीन ओळीची एक संपूर्ण कथा वा नाटक असल्याचा दावा काही पाश्चात्य लेखकांनी या आधी केले आहेतच!)
     आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते एका ओळीत पकडलं गेलं आहे आणि म्हणूनच यापुढे काही लिहिणं म्हणजे कवितेचं भ्रष्टीकरण तर होणार नाही ना, अशी शंका येऊन एकाच ओळीवर कविता संपवणं हा या कवीचा संयम आदर्शभूत ठरावा.
     आता प्रत्यक्ष कवितेतील शब्दांकडे वळू या:
आरसा आपले प्रतिबिंब दाखवणारा.
        आपल्यासारखीच पण आभासात्मक आकृती दाखवणारी वस्तू.
वारले -  लौकीक जगतातून विलय.
बेवारशी- पूर्वजांशिवायचा.
        वारसा सांगणारे कोणीही नसलेले.
        लावारीस. उपरा.
     आपण आरश्यात पाहिल्यावर आपल्याला दिसणार फक्‍त आपलंच प्रतिबिंब. प्रतिबिंब दिसल्यावर आपण गप्प बसत नाही. केस पिंजारतो. नाहीतर विंचरतो. चेहरा पाहतो. निरखतो. आपण कसे दिसतो? कसे आहोत? इतरांना आपण कसे दिसत असू? आपलाच विचार करतो तो आरसा. आपले रूप दाखवतो तो आरसा. आपले नखरे खपवून घेतो तो आरसा. आरसा म्हणजे अहम. इगो. स्वत:च्याच प्रतिबिंबाला स्वत:च कुरवाळणारा. स्वत:लाच स्वत: शाबासकी देणारा. स्वत:वरून स्वत:च आरती ओवाळणारा. सतत आपल्यातच मग्न असणारा. इत्यादी इत्यादी.
     अशा आरश्यात जे जे कोणी सदैव पहात राहतात. आत्मसंतुष्ट होत स्वत:लाच कुरवाळत राहतात अशांच्या अस्तित्वाला इतरांच्या दृष्टीने काय किंमत? जे आपल्या नैसर्गिक लौकीक जीवनाशी आपली नाळ तोडून केवळ आपल्याच विश्वात दंग असतील. येन केन प्रकारे प्रसिध्दी मिळवून आपल्यातच घोकत असतील. वृत्तपत्रात आपलं नाव आपणच छापवून आपणच वाचत बसत असतील, तर ते लौकीक दृष्टीने जीवंत असूनही लोकांसाठी वारल्यातच जमा असणार नाहीत का?
     अशा बेवारश्यांना आरश्यांशिवाय दुसरा पर्याय नाही. ते आरश्यांशिवाय जगू शकणार नाहीत. अशांना आरश्याची इतकी नशा चढलेली असते, की ते जगतात, फक्‍त आपल्या विश्वातील दिखाऊ आदर्शांच्या दिवास्वप्नात रममाण होण्यासाठी. म्हणजेच आरश्यात पहात. म्हणून ते जीवंत काय नि वारले काय इतरांच्या दृष्टीने काहीही फरक पडणार नसेल, तर ते आरश्यातल्या आरश्यात वारल्यासारखे बेवारशीच ना!...
     (‘कवितारती’ जानेवारी- फेब्रुवारी 2019 च्या अंकात प्रकाशित. लिखाण दिनांक 19-09–1990. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
  डॉ. सुधीर रा. देवरे
   ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

1 टिप्पणी: