बुधवार, १ मे, २०१९

‘सटाणा तालुका बागलाण’


 
-    डॉ. सुधीर रा. देवरे

     सटाणा हे विंचूर - प्रकाशा महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक 17 वर वसलेलं असून 2011 च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 37,716 इतकी आहे. महाराष्ट्र राज्यातल्या नाशिक जिल्ह्यातील (नाशिकपासून 90 किमी ईशान्य दिशेला) बागलाण तालुका म्हणजेच सटाणा तालुका. सटाणा हे तालुक्याचं गाव. सटाण्यापासून वायव्य दिशेला गुजराथ राज्यातील डांग भागाची सीमा फक्‍त 40 किमी अंतरावर आहे. गावाजवळून वायव्य- आग्नेय या दिशेने आरम नावाची लहान नदी वाहते. (म्हणजे पूर्वी वहात होती. आता खूप पाऊस झाला तर पावसाळ्यात तात्पुरती वहाते.) सटाण्यापासून दहा किमी पुढे गिरणा नावाच्या नदीशी आरमचा संगम होतो. गावाच्या आसपासची जमीन काळी कसदार असून शेतीला अतिशय उपयुक्‍त अशी आहे. बाजरी, गहू, हरभरा, ऊस, कपाशी, मका, कांदा, कडधान्य (कठान) ही पारंपरिक खरीप- रब्बी पिकं असून अलीकडे द्राक्ष आणि डाळींबची मोठ्या प्रमाणात व्यावसायिक लागवड होऊ लागली.
     बागूल राजाच्या नावावरून या प्रांताचं नाव बागलाण आहे. बागूल या राठोडवंशीय राजांची वंशावळ इ.स. 1300 पासून सापडते. बागूल राजघराण्यातील चौपन्न राजांची नामावलीही आज उपलब्ध आहे. बागुलांकडून बागलाण पेशव्यांकडे गेले आणि पेशव्यांकडून इंग्रजांकडे. वाघांचं रान म्हणजे बाघांचं रान. बाघरानचा अपभ्रंश बागलाण झाल्याचीही व्युत्पती सांगितली जाते.
     बागलाण प्रांताचे राजे बागूल यांनी सहा ठाणे वसवले होते असे म्हटले जाते. हा (सहा ठाणे वसवण्याचा) काळ दंतकथातून इंग्रजांच्या काळापर्यंत पुढे सरकत राहतो. चौदाव्या पंधराव्या शतकापासून आजच्या सटाण्याच्या आजूबाजूला जी सहा ठाणे वसली. त्या ठाण्यांच्या मध्यवर्ती स्थानी सटाणा शहर वसले. सहा ठाण्यांचा अपभ्रंश म्हणजे सटाणा झाले असावे, अशी एक व्युत्पत्ती सांगितली जाते. सटाण्याच्या जागी शहाचे ठाणे वसले होते. शहा ठाण्याचा अपभ्रंश सटाणा झाले असेही सांगितले जाते. सटाण्याचे पूर्वीचे नाव सत्य नगरी वा सत्यायन होते, अशा सटाणा नावाच्या काही पारंपरिक दंतकथा रूढ आहेत.
     बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक साल्हेर- मुल्हेरचे किल्ले संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहेत. सुरत लुटीतून परतताना साल्हेर किल्ल्यावर शिवाजी महाराज थांबले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आजही अनेक पर्यटक व गिर्यारोहक साल्हेर किल्ल्याला भेट द्यायला येत असतात. महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे उंच शिखर कळसूबाईचे शिखर असून दुसर्‍या क्रमांकाचा उंच किल्ला हा साल्हेर किल्ला आहे. या किल्ल्यांवर पूर्वी प्रचंड जंगल होते. मात्र आज हे किल्ले पूर्णपणे उघडे बोडके झालेत. पूर्वीच्या बागलाण प्रांतात संपूर्ण खानदेश सामावलेला होता, इतका लांबी रूंदीने विस्तृत होता. बागलाण म्हणजे गिरणा, तापी, नर्मदा या नद्यांचा प्रदेश. दुर्गम आणि डोंगराळ भाग. उत्तरोत्तर या प्रांताचे आकुंचन होत गेले आणि तो आज एका तालुक्यापुरता उरला. सटाणा आणि परिसर म्हणजेच बागलाण परिसराची संस्कृती ही ग्रामसंस्कृती आहे. ‍भाषिकदृष्ट्या अहिराणी भाषिक संस्कृती आहे. आणि शेती ही तर या भागाची मूळ लोकसंस्कृती आहे.
     सटाण्याला पूर्वी मामलेदार हे पद नव्हते. सटाणा मालेगावच्या अखत्यारीत येत होते. १८६९ ला यशवंत भोसेकरांच्या नियुक्‍‍तीने बागलाणला पहिले मामलेदार मिळाले. ब्रिटीश सरकारने बागलाण तालुक्यासाठी सटाण्याला मामलेदार कचेरी स्थापन केली. ८ मे १८६९ रोजी सटाणा येथे पहिले मामलेदार म्हणून यशवंत भोसेकर रूजू झाले. ते १८७३ पर्यंत बागलाणात मामलेदार होते. देवध्यानी, धार्मिक आणि परोपकारी वृत्तीचे ते होते. 1872 साली या परिसरात ओला दुष्काळ पडला. लोक भुकेने मरत असलेले पाहून मामलेदार अस्वस्थ झाले आणि त्यांनी सरकारी खजिना लोकांना वाटून टाकला. इंग्रज सरकारने त्यांना बरखास्त केले तरी ते लोकांचे देव झाले. म्हणून देवमामलेदार. त्यांच्या मृत्यूनंतर सटाण्यात त्यांचे भव्य मंदिर बांधण्यात आले. दरवर्षी भव्य रथ निघतो. पंधरा दिवस मोठी यात्रा भरते. देवमामलेदार हे सटाण्याचे लोकदैवत झालेत. गावाजवळच्या आरम नदीकाठी देवमामलेदार यांच्या मंदिरात दर्शन घ्यायला आजूबाजूच्या खेड्यांवरील लोक कायम येत असतात. गावात कोणाकडे येणारे पाहुणे या गावदेवतेचे मुद्दाम दर्शन घेतात.
        1873 साली आजचे मुल्हेर म्हणजे त्यावेळच्या मयुर नगरीतल्या तळ्यात सापडलेल्या दोन मूर्तींपैकी नारायणाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मुल्हेर येथील उध्दव महाराजांच्या मंदिराजवळ केली, तर दुसरी मुर्ती- महालक्ष्मीची होती. ती मामलेदार भोसेकर यांनी सटाण्याला आणून तिची प्राणप्रतिष्ठा आरम नदीच्या काठी केली. तिथे नंतर छोटेसे मंदिरही बांधण्यात आले. ते आजतागायत आहे. हे दैवतही सटाण्याचे वैभव आहे. बागलाणात अनेक विभूती, मंदिरे, तिर्थक्षेत्रे आणि पर्यटन क्षेत्रे आहेत. यात उपासनी महाराज, उध्दव स्वामी, पद्‍मनाभ स्वामी, नयन महाराज, दावल मलीक आदी विभूती आणि मांगीतुंगी, आलियाबाद, देवळाणे, कपालेश्वर, दोधेश्वर येथील मंदिरे व साल्हेर-मुल्हेर किल्ले यांचा समावेश करावा लागेल.
       उपासनी महाराज म्हणजे सटाण्याचे काशिनाथ गोविंद उपासनी. त्यांचा जन्म १५ जून १८७० ला सटाणा येथे झाला. मध्येच संसार सोडून त्यांनी तिर्थयात्रा सुरू केली. ते साईबाबांचे शिष्य होते. साईबाबांनी त्यांच्याकडून स्मशानात तपश्चर्या करवून घेतली. शिर्डीला साईबाबांच्या सानिध्यात चार वर्षे राहून नंतर साईबाबांच्या उपदेशानुसार शिर्डीजवळच्या साकोरीला ते मठ स्थापन करून राहिले. तिथे त्यांनी कन्याकुमारी संस्था स्थापन केली. या धर्मपीठाची जबाबदारी सती गोदावरी मातेने पार पाडली. उपासनी महाराजांनी स्त्री धर्माला महत्व दिले आणि कुमारी पूजनाचा संप्रदाय चालवला. इसवी सन १९२८ मध्ये उपासनी बाबा सटाण्याला आले आणि त्यांनी अनेक लोकांना दीक्षा देऊन गोरगरीबांसाठी भंडारा घातला. वयाच्या ७१ व्या वर्षी २४ डिसेंबर १९४१ रोजी साकोरी येथे ते स्वर्गवासी झाले. त्यांच्या मृत्यूनंतर सटाण्यात त्यांच्या भक्‍तांनी भव्य मंदिर बांधले आहे. हे मंदिरही स्थापत्य कलेचा उत्तम ठेवा आहे.
     उध्दव महाराज हे काशीचे शिवबा नावाचे तपस्वी होते. तिर्थक्षेत्रे फिरत असताना मुल्हेरला आले. तिथे रमल्याने ते कायमस्वरूपी मुल्हेरलाच थांबले. का‍शीराज महाराजांकडून त्यांनी दीक्षा घेतली. मृत्यूनंतर त्यांचे मंदिर बांधण्यात आले. मुल्हेर गावास उध्दव महाराजांच्या समाधीमुळे विशेष प्रसिध्दी मिळाली. मंदिरात दर कोजागिरी- आश्विन शुध्द पौर्णिमेला अजूनही रासक्रीडा खेळली जाते.
     मंदिरात चौदा हात व्यास असलेले व चौदा आर्‍या असलेले एक चक्र असून त्याला अठ्ठावीस वेळूचे बांबू लावून दोरांनी जाळे विणले जाते. चक्र केळींच्या पानांनी झाकून संध्याकाळी चौदा हात उंच खांबावर चढवले जाते. खांब व चक्र फळाफुलांनी सजविले जातात. रात्री सुरू होणारा हा उत्सव सकाळपर्यंत सुरू असतो. यावेळी अनेक भाषांमधील परंपरागत पदे म्हटली जातात आणि लहान मुलांना गोपींचे रूप साज देऊन तिथे फुगड्यांचा खेळही खेळला जातो. ही रासक्रीडा पाहण्यासाठी दूरवरून लोक येतात. उध्दवस्वामी संप्रदाय म्हणून त्यांचे मुल्हेरशिवाय इतरत्र मठ वा मंदिरे नाहीत. 
      तालुक्यातील विरगावला कान्हेरी न‍दीच्या थडीवर पद्मनाभ स्वामींची समाधी बांधली आहे. ह्या समाधीला श्यामदेऊळही म्हणतात. लहानपणापासून मी ती समाधी पहात आलो. पद्मनाभ स्वामी हे मुल्हेरच्या उध्दव स्वामीचे शिष्य होते. विरगावला ज्या ठिकाणी आज त्यांची समाधी आहे तिथे ते कुटी बांधून राहात. पद्मनाभ स्वामींचा पूर्वेतिहास आज विरगावात कोणालाही ज्ञात नाही. ते कुठून आले वगैरेही माहीत नाही. त्यांनी संजीवनी समाधी घेतली असे परंपरेने सांगितले जाते. त्यांचा कालही अज्ञात आहे. त्याकाळी विरगावातील लोकांनी त्यांची प्रशस्त समाधी बांधली. दरवर्षी आषाढ महिन्यात आषाढ वद्य सप्तमी ते चतुर्दशीपर्यंत श्रीमद्‍भागवत ग्रंथाचे वाचन करण्यात येते. आषाढ वद्य चतुर्दशी या पद्मनाभ स्वामींच्या पुण्यतिथीला समाधीला अभिषेक केला जातो व याच दिवशी श्रीमद्‍भागवत ग्रंथवाचन समाप्तीचा कार्यक्रम होतो. ग्रंथ वाचन समाप्तीनंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे आषाढ अमावस्येला दरवर्षी यात्रा भरते. गावकलाकारांकडून समाधीजवळ लळित सादर होते.
      इसवी सन १६८० ते १७५० या काळात अंतापूर येथे कमलनयन उर्फ नयनमहाराज होऊन गेले. मुल्हेरचे श्री उध्दवमहाराज यांचे ते पट्टशिष्य होते. त्यांनी बरेच काव्य केले असले तरी ते आज नामशेष झाले आहे. मात्र त्यांचे अभंगावली नावाचे हस्तलिखित काव्य आजही उपलब्ध आहे. या पुस्तकात संस्कृत, मराठी सोबत ‍अहिराणी भाषेतही काव्य आहे. आज त्यांच्या फक्त पंधराशे ओव्या उपलब्ध आहेत.
सटाण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर मांगीतुंगी नावाचे जैन लोकांचे तिर्थक्षेत्र आहे. इथे संपूर्ण भारतातून श्रध्देने जैन धार्मिक लोक येतात. काही पर्यटक म्हणून भेट द्यायला येतात. मांगीतुंगी मंदिरापासून डोंगराचा पायथा दोन किलोमीटर अंतरावर आहे. मांगीतुंगी हे जैन ‍धर्मियांचे पवित्र क्षेत्र समजले जाते. तिथल्या डोंगराला मांगी व तुंगी या नावाची दोन शिखरे आहेत. या शिखरांच्या नावावरून या तिर्थक्षेत्राला व त्या गावालाही मांगीतुंगी नाव पडले. डोंगराच्या पायथ्याजवळच्या गावाचे जुने नाव भिलवाड होते, परंतु आज ते मांगीतुंगी या नावानेच ओळखले जाते. डोंगरात महावीरांचे भव्य 108 फूट उंचीचे शिल्प कोरून आताच पूर्ण झाले. मांगीतुंगीलाही दरवर्षी यात्रा भरते.
     सटाणा तालुक्यातील अंतापूर जवळच दावल मलिक यांचे एक ठिकाण आहे. दावलशा यांचे मंदिर डोंगरावर असून डोंगराच्या पायथ्याला एक दर्गा आहे. अनेक गावाहून कंदोरी नावाचा विधी करण्यासाठी भक्‍त इथं येतात. दर्ग्याला मांसाहाराचा नैवेद्य दिला जातो तर वर मंदिरात गुळ काल्याचा नैवेद्य दाखवतात. हे धार्मिक स्थान हिंदू व मुस्लीम दोन्ही धर्माचे भक्त आपले श्रध्दास्थान मानतात. मुसलमान संत परंपरेत दावल मलिक हे नाव आढळते. दावल मलिक हे गुजराथ काठेवाड भागातील शाह दावल मलिक आहेत. तरीही त्यांचा दर्गा इथे अंतापूर जवळच्या डोंगरावर आहे. हजरत शाह आलम या सूफी पंथीय आवलियाचे ते शिष्य समजले जातात.
     मुल्हेर जवळच्या आलियाबाद गावाला एक प्राचीन शिव मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी असून संपूर्ण मंदिर कोरीव पाषाणात असल्याने त्याचे सौष्ठव पहाण्यासारखे आहे. मंदिराकडे पुरातत्व खाते लक्ष देत नसल्याने पडझडीतून त्याचे अस्तित्व आज धोक्यात आले आहे. देवळाणे या गावातही एक प्राचीन शिवाचे शिल्प मंदिर आहे. मंदिरावर कामशास्त्रातील अनेक शिल्प कोरली आहेत. हे मंदिर म्हणजे खजुराहो येथील मंदिराचे प्रतिरूप असल्याचे समजले जाते. मात्र स्थानिक अज्ञानामुळे अनेक शिल्पांवर दगडांनी प्रहार करून ते जाणून बुजून फोडल्याचे लक्षात येते.
     सटाण्यापासून पंचवीस किलोमीटर पश्चिमेला कपालेश्वर नावाचे तिर्थक्षेत्र आहे. हे तिर्थक्षेत्र हत्ती नदीच्या काठावर असून पूर्वी ही नदी वर्षभर वहायची. मंदिराजवळ नदीच्या काठाला घनदाट केवड्याचे बन होते. त्यातून आलेले झिळांचे पाणी गायमुखातून एका तलावात पडत असे. या तलावात भक्‍त स्नान करीत असत. पण आज तिथे केवड्याचे बन उरले नाही आणि नदीला पाणीही नाही. म्हणून हा मंदिराचा परिसर भकास वाटतो.
     दोधेश्वर हे तिर्थक्षेत्र सटाण्यापासून अवघ्या नऊ किलोमीटरवर उत्तरेला डोंगरांच्या कुशीत वसलेलं आहे. हे तिर्थक्षेत्रही पूर्वी हिरव्यागार निसर्गाने नटलेलं असायचं. चहूबाजूने असलेल्या डोंगरांवर हिरवेगार जंगल होतं. मंदिर परिसरात तलाव, विहीर आजही असले तरी स्नान करण्याचा तलाव आज कोरडा झाला आहे.
     खुद्द सटाणा शहरात कोणतीही ऐतिहासिक वास्तू नसली तरी तालुक्यात अशा ऐतिहासिक- पुरातत्वीय बाबी आहेत. सटाणा गावातून अवजड वाहणांचं दळणवळण होत असल्याने वेळोवेळी अपघात होत राहतात. त्यासाठी नागरिकांकडून वळण रस्त्याची मागणी होत आहे. मात्र रस्ता अजून होत नाही. सटाण्यात प्रत्येक उन्हाळ्यात पाणी टंचाई असते. 2018-19 या वर्षात तर वर्षभर भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. नगरपालिकेने दिलेल्या घरातल्या नळ जोडणीला ऐकेक महिना पाणी येत नाही. वेळोवेळी शासकीय पातळीवर पाणी योजनांना तात्विक मंजूरी मिळते. पण धरणांच्या आजूबाजूच्या स्थानिक जनतेच्या विरोधामुळे कोणतीच पाणी योजना पूर्णत्वास जात नाही.
     सटाणा तालुक्यात एकशेसहासष्ट (166) गावं आहेत. म्हणून सटाणा हे 165 खेड्यांचं केंद्र समजलं जातं. गावात शनिवारी मोठा आठवडी बाजार भरतो. आजूबाजूच्या अनेक खेड्यापाड्यांचे लोक सटाण्याला बाजारासाठी येतात.
     सारांश, सटाणा आणि बागलाण तालुका हा प्रदेश साध्या भोळ्या माणसांचा, परंपरागत शेती व्यवसाय करणार्‍यांचा, व्यापारी पेठेचा, कष्टकरी माणसांचा, बाराबलुतेदारांचा अशा रूढी पाळत जगणारा आहे. त्यात सटाणा हे छोटसं निमशहरी तालुक्याचं गाव आहे.
     संदर्भ: माणूस जेव्हा देव होतो’, लेखक: डॉ. सुधीर रा. देवरे (वैचारिक ग्रंथ) 
     (दिनांक 14-4-2019 च्या थिंक महाराष्ट्र डॉट कॉमवर प्र‍काशित झालेला लेख. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा