शनिवार, ३१ मार्च, २०१८

ग्रामीण पेहराव




- डॉ. सुधीर रा. देवरे

          तीस ते चाळीस वर्षांपूर्वी ग्रामीण वासियांचा पेहराव इकडे सर्वत्र एकसारखा दिसत असे. उत्तर महाराष्ट्र पट्ट्यात पांढरा रंगाचा सदरा, पांढरे धोतर आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी असा पुरूषांचा पेहराव दिसायचा. वयाने तरूण आणि शाळा- महाविद्यालयात शिकत असलेल्या मुलांत पांढर्‍या सदर्‍यासोबत पांढरा पायजमा असायचा आणि अशाच पेहरावात सर्रासपणे तरूण मुले कॉलेजलाही जात असत. महाविद्यालयात सुध्दा ड्रेसकोड नावाची भानगड त्यावेळी नव्हती.
          आम्ही माध्यमिक शाळेत जायचो तेव्हा आमच्या गावच्या माध्यमिक शाळेचा गणवेश पांढरा सदरा आणि खाकी आखूड चड्डी असा होता. अंगातल्या सदर्‍याला पचरटी गुंड्या (बटणं) असायच्या. मुलींचा गणवेश पांढरे झंपर आणि निळ्या रंगाचा स्कर्ट होता. असा ड्रेसकोड सक्‍तीचा होता असेही नाही. या व्यतिरिक्‍त कोणी रंगीबेरंगी कपडे घालून शाळेत येऊ शकत होतं. त्या काळी बहुतांशी वापरले जाणारे कपडेच शाळेचा गणवेश असायचा. याचा अर्थ शाळेत न जाण्याच्या दिवशी सुध्दा ग्रामीण मुलांच्या अंगावर हेच कपडे असत.
          उत्तर महाराष्ट्र पट्ट्यातली ग्रामीण महिला बहुतकरून नऊवारी साडीत दिसायची. पण या साडीला तेव्हा नऊवारी न म्हणता काष्टी पातळ वा काष्टी लुगडे म्हणायचे. (काष्टी लुगडे नेसणार्‍या गरीब घरातल्या स्त्रिया लुगडं दांडे करून नेसायच्या. एक लुगडं फाटल्यावर ते टाकून देण्यापेक्षा दुसर्‍या एखाद्या फाटक्या लुगड्याचा चांगला राहिलेला भाग या लुगड्याला जोडणे म्हणजे दांडे करणे. दांडे केलेले अर्धे लुगडे वेगळ्या रंगांचे असे.) सहा वारी साडीला गोल साडी म्हटलं जायचं. म्हणजे काष्टा न घेता नेसली जाणारी आणि शरीराभोवती गोल गुंडाळलेली दिसते म्हणून ती गोल साडी. शाळेत जाणारी मुलगी असो व शाळेत न जाणारी असो स्कर्ट वा लेंगा झंपर- पोलक्यात असायची. वयात आलेली मुलगी गोल साडी नेसायची. गोल साडी नेसणारी मुलगी विवाहीत झाली की ती लगेच काष्टी लुगड्यात दिसू लागायची.
          खेड्यापाड्यातून असणार्‍या कापडांच्या दुकानातही तेव्हा पांढरे हरक, मळकट पांढरे सैन- मांजरपाट, खाकी कापड, काष्टी लुगडे आणि गोल साड्या अशा कपड्यांचेच गठ्ठे असायचे. आयते कपडे शहरात मिळतात असं ग्रामीण भागात त्या वेळी ऐकून माहीत असलं तरी मिटरने कापड मोजून शिंप्याकडे माप देऊन कपडे शिऊन घ्यायचा तो काळ होता. वडीलधार्‍या दाद्या माणसांच्या अंगात सदर्‍याखाली सैनची बंडी वा कोपरी असायची. बंडी- कोपरीची जागा आता बनियनने घेतली.
          उत्तर महाराष्ट्रातील पश्चिम ग्रामीण भागातील विशिष्ट पट्ट्यात राहणार्‍या कोकणी लोकांचा पेहराव यापेक्षा थोडा वेगळा असायचा. पुरूषाचे गुडघ्यापर्यंतचे आखूड धोतर, सैनच्या कापडाचा सदरा आणि महिलांच्या अंगावर असणारी फिकट लाल रंगाची फडकी, खाली कंबरेपासून तर गुडघ्यापर्यंत दांडे केलेल्या वेगळ्या रंगाच्या लुगड्याचा एक तृतीयांश भाग, हा फरक स्पष्ट दिसायचा. आता लुगडं नेसणार्‍या महिला शोधून काढाव्या लागतात तर धोतर नेसणारे लोकही लुप्त झाले आहेत. लेंगापँटीही आता नामशेष झाल्या आहेत. गांधी टोप्या फक्‍त लग्न समारंभापुरत्या उरल्यात. आमच्याकडच्या ज्यांना कोकणी म्हटलं जातं अशा बायांची फडकीही आता कालबाह्य ठरली आहे.
          स्थित्यंतर होता होता पांढर्‍या पायजम्याची सुटपँट झाली, पांढर्‍या हरक कापडाच्या सदर्‍याचा रंगीबेरंगी डिझा‍यनींचे पॉलिस्टर ते आतापर्यंतचे सर्व बदल पचवलले शर्ट झाले. ऋतू कोणताही असो तेव्हा आर्थिक ओढाताणीमुळे बाराही महीने एकच पेहराव असायचा. आता ऋतू प्रमाणे कपडे बदलू लागले. विविध प्रकारचे स्वेटर हिवाळ्यात दिसू लागले. उन्हाळ्यात तरूणाईच्या अंगावर टी शर्ट चमकू लागले. पावसाळ्यात डोक्यावर छत्र्या दिसू लागल्या. पूर्वीच्या ग्रामीण भागात भर पावसात गोणपाटाच्या घोंगड्या डोक्यापासून कंबरेपर्यंत पांघरून घराबाहेर पडलेले लोक वाकून चालताना‍ दिसत.
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा