गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७

बाबा-बुवांचे सामाजिक काम


-         डॉ. सुधीर रा. देवरे

     भारतात बाबा-बुवांचे साम्राज्य प्रचंड वाढले आहे. अलिकडे खाजगीत एक चावळ सुरू झालीय की म्हणे हिंदु धर्माच्या बुवांनाच टारगेट केलं जातं. म्हणून इथं एक गोष्ट मुद्दाम नमुद करावी लागेल की हे बुवा सगळ्याच धर्मात आहेत आणि आपली स्वार्थिक बजबजपुरी त्यांनी आपापल्या धर्मात प्रचारून आपली दुकाने यथास्थित सुरू ठेवलीत. पण समजा हिंदू धर्मातले बुवा टारगेट केले जातात असं घटकाभर मान्य केलं तरी ज्याअर्थी हिंदू चोरांची बाजू आपण घेत नाही, ज्याअर्थी हिंदू खुन्यांची बाजू आपण घेत नाही त्याअर्थी केवळ हिंदू धर्मातले आहेत म्हणून बलात्कारी बाबांची बाजू आपण का घ्यावी?
     बर्‍याच भाबड्या लोकांचं असंही मत आहे की जे सापडलेत ते बलात्कारी आणि गुन्हेगारी बाबा होते. पण मी ज्या बाबाच्या भजनी लागलोय तो बाबा सर्वगुणसंपन्न संतशिरोमणी असल्यानेच अजून कायद्याच्या कचाट्यात सापडला नाही.
     बाबा-बुवांचे विविध आश्रम भारतभर कुठे कुठे हजारो एकर जमिनीवर उभारलेले असतात. (अशा जमिनी शासनाकडून मिळवलेल्या असतात आणि आसपासच्या बळकावलेल्याही.) भारताबाहेरही त्यांचे साम्राज्य फैलावलेले असते. आधी अंधश्रध्दाळू लोक बाबांच्या नादी लागतात. नंतर सर्वदूर पसरलेल्या अनेक भ्रष्ट लोकांना आतून जाणवत असतं की आपलं काम पापाचं आहे. आपण कमवतो ते सरळमार्गी नाही. आपण समाजाची लुबाडणूक करतो. असे लोक पापक्षालणार्थ आपल्या पापाच्या काळ्या कमाइचा काही हिस्सा या आश्रमात ओतत असतात आणि पाप धुतलं गेलं असं समजत राहतात. अशा पध्दतीने आश्रमात प्रचंड मोठ्या प्रमाणात देणग्या येत असतात. मागितल्या जातात. वरून या धार्मिक दिसणार्‍या वावटळीत अनेक खंगलेले, पिचलेले, पापभिरू, देवभोळे लोकही नंतर सापडतात आणि ते आपला कष्टाचा पैसा इथे उधळतात. आपल्या जीवनाचे योग्य चीज व्हावं असं त्यांना देवभोळेपणामुळे वाटत असतं. बाबांभोवती जोडल्या गेलेल्या प्रचंड भक्‍तगणांत राजकारणी लोकांना मतदार‍ दिसू लागतात. या मतदारांकडून एकगठ्ठा मतदान करून घेण्यासाठी राजकारणीही अशा बाबांच्या चरणी लीन होऊ लागतात. (धार्मिक आणि राजकीय यांची सत्तापिपासू साठ-गाठ झाली नसती तर आज इतकी भयानक परिस्थिती उद्‍भवली नसती.)
          बरेच बाबा आणि त्यांचे भक्‍तगण असा प्रचार करतात की ते खूप मोठे सामाजिक कामे सुध्दा करतात. आश्रमात येणार्‍या लोकांसाठी दहा रूपयात जेवण देणे, दहा रूपयात प्रसाद देणे, मेडिकल कॉलेज चालवणे, आणि या कॉलेज अंतर्गत कमी पैशात रूग्णसेवा करणे, रक्‍तदान शिबीरे घेणे, नेत्रदान, अवयव दान करणे, विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण देणे, गावांत छोटे छोटे तलाव बांधणे, आश्रमात गरीबांना मजुरीला लावणे आदी बाबींना बाबांचे समाजकार्य म्हटले जाते.
     कोणत्याही धर्मातला आश्रम, कोणताही बुवा कधीही इनकमटॅक्स भरत नाही. पण वर्षाला तीन लाख कमावणार्‍या कर्मचार्‍याने इनकम टॅक्स भरला पाहिजे. तसा फॉर्मही भरला पाहिजे ही सक्‍ती. इनकम टॅक्स पूर्णपणे माफ होण्यासाठी बाबा आपले प्रचंड सामाजिक काम दाखवत असतात. (धार्मिक कामांचा ट्रस्ट म्हणून टॅक्स माफी असतेच.) मात्र या सामाजिक कामातूनही बाबांचा पैसा खर्च होण्याऐवजी वाढत जातो. तलाव गावागावातल्या भक्‍त मंडळीकडून श्रमदानाने केला जातो. स्थानिक देणगीदारांच्या खर्चातून केला जातो. पण आश्रम त्यासाठी खर्च झालेला दाखवतो. मेडीकल कॉलेज मधून‍ शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांकडून प्रचंड मोठ्या देणग्या घेतल्या जातात. मात्र आश्रम हा शैक्षणिक खर्च दाखवतो. भक्‍तांच्या लंगर साठी रोज फुकट जेवण द्यायला हरकत नाही. पण प्रत्येक जेवणाचे दहा रूपये घेतले जातात. हा नफा. जेवण आणि प्रसादावर खर्च दाखवला जातो. ‍रूग्णांवर जे कमी पैशात वा फुकट इलाज केले जातात, तो ही पैसे जिरवायचा एक चोर मार्ग आहे. ही समाजसेवा म्हटली जाते. पण यातून प्रचंड पैसा झाकण्याचा प्रयत्न होतो. काळा पैसा पांढरा केला जातो. रक्‍तदान, नेत्रदान, अवयवदान यातूनही काळाबाजार होतो.
     आपण फक्‍त पाच वर्षांसाठी सरकार निवडून देतो. निवडणूकीत‍ नेत्यांनी दिलेली आश्वासने पाळावीत म्हणून आपण त्यांच्यावर दबाव आणतो. पण हे बाबा तर कोणत्याही निवडणूकीशिवाय स्वयंभू तहहयात आपले धार्मिक लोकप्रतिनिधी होऊन आपल्याला लुटत असतात. त्यांच्या एवढ्याश्या कामांचंही आपण किती कौतुक करतो. अशा बाबांच्या आश्रमातून धार्मिक कामं होतात असं आपण समजतो. (हे बाबा समाजाला उत्तरदायित्व नसतात.  समाजाला वा शासनाला त्यांना ऑडीट द्यायचे नसते. आपल्या आश्रमात ते  हुकुमशाही राजवट चालवणारे सत्ताधीश असतात.)
     सारांश, आजच्या शैक्षणिक संस्था चालवणारे लोक जसे शिक्षण महर्षी नाहीत, तसे हे बाबाही संतशिरोमणी नाहीत. सर्वच धर्मातल्या अशा बाबा- बुवांचा अध्यात्माशी काडीचा संबंध नसतो. धार्मिकतेशीही संबंध नसतो. यांची तुलनाच करायची झाली तर धर्माच्या- देवभोळेपणाच्या अंधश्रध्देवर चालणारे हे मॉल असतात!   
      (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह  ब्लॉगचा  संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा