शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

मौन धारण करू या!




-         डॉ. सुधीर रा. देवरे

     संत साक्षात परमेश्वर रामरहीम बाबांना साक्षात्काराने आधीच समजून चुकलं होतं की कोर्ट आपल्याला दोषी ठरवणार. आपल्या दैवी लिला कितीही परमार्थिक- अध्यात्मिक असल्या तरी तथाकथित मानवी कायद्यातील तरतुदींनुसार आपल्या लिलांकडे विकृत दृष्टीने पाहिलं जाईल आणि नको ती शिक्षा कोर्टाकडून आपल्याला ठोठावली जाईल, हे बाबा दिव्य दृष्टीने पाहू शकत होते. म्हणूनच अशा पामरांकडून होणारे हे पाप टाळण्यासाठी बाबांनी आधीच खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या कोट्यावधी शिष्यांपैकी फक्‍त दीड लाख भक्‍तांना सिरसाहून पंचकुलाकडे पदयात्रा करत रवाना केलं. आपल्या अध्यात्मिक भाषेचा या कायदेशीर नास्तिक लोकांच्या ठायी कवडी इतकाही उपयोग होणार नाही, हे ओळखून बाबांनी इहवाद्यांना समजेल अशा आपल्या खाजगी भाषेत अनुयायांना बोलायला भाग पाडलं. पोपट भाषेतून शिष्य चॅनल्सना खुलेआम सांगत होते, बाबांना हात लावाल तर रक्‍ताच्या नद्या वाहतील. प्रेतांचा खच पडेल. संपूर्ण देश आगीच्या भक्षस्थानी पडेल. खबरदार! आणि भक्‍तांसोबत असलेल्या लाठ्या, काठ्या, पेट्रोल बाटल्या याची साक्ष देत होत्या. या भक्‍तांत सुशिक्षित समजली जाणारी तरूणाईही दिसत होती. म्हणजे या अध्यात्मिक साधनेत आजचे आधुनिक तरूणही आपले कामधंदे सोडून सामील आहेत हे या देशाचे थोर भाग्य.
     साक्षात संत परमेश्वरावर आलेलं संकट आणि त्यांच्या परम भक्‍तांनी उच्चारलेले श्याप यात राजा हवालदिल झाला. स्वत:च बाबांच्या दीक्षेने पावन झालेले आणि आपल्या डोक्यावरच्या राजमुकुटासाठी खारीचा नव्हे, हत्तीचा वाटा उचललेल्या संतांच्याच विरूध्द जाणे म्हणजे गुरूद्रोहच. प्रजेच्या बाजूने उभं राहवं का गुरूच्या? राजा‍ विचारात पडला. आपलेच महत्वाचे असतात शेवटी. सिंहासनाच्या शपथेप्रमाणे वागलो आणि सिंहासनच खेचलं गेलं तर! राजाने ठरवलं, आपण धृतराष्ट्र होऊ या. अंध होऊन थोडा वेळ गंमत पाहू या. गुरूद्रोह करण्यापेक्षा नंतरची सारवासारव करणं सोपं. दोन ओळींचं एक ट्वीट केलं की नव्वद टक्के कर्तव्य संपतं. उरला प्रश्न ठार झालेल्या, जखमी झालेल्या लोकांचा आणि जाळपोळ- तोडफोडीतल्या नुकसानीचा. प्रजेकडून घेतलेल्या पैशातूनच अशा वेळी प्रजेला काही भाग परत करता येतो. मग बाकी काही उरतच नाही. निर्णय पक्का झाला.
     कायद्याच्या बाजूने, संत परमेश्वराच्या बाजूने, राजाच्या बाजूने ज्याने त्याने ठरल्याप्रमाणे आपापल्या भूमिका बरोबर निभावल्या. दोष प्रजेचा होता. जो कर्तव्यासाठी कामावर गेला तो मेला. जो प्रपंचासाठी बाहेर पडला तो जखमी झाला. ज्यांच्या गाड्या जाळल्या गेल्या त्यांनीच लाठ्या खाल्या. संत कृपेने सव्वाशे कोटींपैकी फक्‍त सदतीस लोक मेले आणि तिनेकशे जखमी झाले. संत परमेश्वराला घ्यायला विमान आलं.
     या सर्व घटनांमागील कार्यकारणभाव भाबड्या लोकांना आणि कायद्याला कळत नाही म्हणून निरूपण करण्यासाठी शेवटी साक्षात महाराजांना अवतरावं लागलं. साक्षात महाराज हे उच्च दर्जाचे अध्यात्मिक गुरू असले तरी त्यांनी आता कायद्याचीही शपथ घेतली आहे. पण निरूपण करताना त्यांनी थोर अध्यात्मिक सत्यच सांगितलं. कायद्यापेक्षा कोट्यावधी लोकांच्या भावना श्रेष्ठ आहेत. त्या लक्षात घेऊन अजूनही संत परमेश्वरांना निरपराध घोषित करता येऊ शकतं!
     आता आपण मौन धारण करू या! दुसरं आपल्याला काय करता येतं? खरं तर हा विषय संपून आजच सात दिवस झालेत. आणि आपल्याला तर रोज नवीन विषय हवा. कालचा विसरून. नवा बाबा उजेडात आला की हा बाबा पुन्हा थोडा फार आठवेल.

      (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा