शनिवार, ३० एप्रिल, २०१६

ब्लॉग लिखाणाला चार वर्ष पूर्ण

-         डॉ. सुधीर रा. देवरे

         बरोबर चार वर्षांपूर्वी दिनांक 29 एप्रिल 2012 पासून मी दर शनिवारी साप्ताहीक ब्लॉग लिहायला सुरूवात केली होती. 27 एप्रिल 2014 पर्यंत दोन वर्ष  एकही शनिवार ब्लॉगशिवाय टळला नाही. म्हणजेच एकाही आठवड्याचा खंड पडू न देता आणि शनिवार सायंकाळ ही वेळही न टाळता नियमितपणे ब्लॉग लिहीत होतो. मात्र प्रत्येक आठ दिवसांनी ब्लॉग लेखनाने माझ्या अन्य लिखाणावर प्र‍तिकूल परिणाम होतो असे लक्षात आल्याने दोन वर्षापासून- एप्रिल 2014 पासून प्रत्येक महिण्याच्या 1 आणि 15 तारखेला ब्लॉग लिहीत असतो. प्रत्येक पंधरा दिवसाला एक ब्लॉग. या चार वर्षात एकही खंड जाऊ दिला नाही. खूप लांबलचक लेख लिहिण्यापेक्षा विचारांची थोडक्यात व संपृक्‍त मांडणी करायची शिस्त स्वत:ला लावून घेतली आणि ती शिस्त आजपर्यंत पाळत आलो. 
         या सर्व छोटेखानी लेखांत साहित्यिक, सांस्कृतिक, भाषिक, कला, लोकजीवन, सामाजिक, धर्मकारण, राजकारण, शैक्षणिक, सुधारक, प्रबोधनात्मक, पर्यावरण, वैश्वीक, आंतकविरोध, शेती, पाणी, चरित्र, व्यक्‍तीविशेष, बोलीभाषा, अहिराणी भाषा, विविध पडसाद आदी विषय येत गेले. काही लेख देशात (वा विदेशात) त्या त्या वेळेला घडलेल्या घटनांवर ‍प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया वा भाष्य अशा स्वरूपाचे असलेत तरी असे लेख केवळ प्रा‍संगिक आहेत असे म्हणता येणार नाही. हे लेख केव्हाही वाचताना विशिष्ट संदर्भात कालाय ठरावेत असा दृष्टीकोन ठेऊन मी लिहीत गेलो. म्हणजे घटना विशिष्ट काळातली असली तरी तिचा परिप्रेक्ष आजच्या अन्य घटना- प्रसंगांकडे नक्कीच निर्देश करेल याचा विचार लिखाण होताना केला आहे. चार वर्षातील लेखांवरून नजर फिरवली तर त्यातल्या विषयांची विविधता लक्षात येईल. एखादा विषय पुन्हा चर्चेला आला तरी त्याचा आशय पूर्णपणे वेगळा असतो.
         या ब्लॉगचे आंतरजालावर स्वतंत्र संकेतस्थळ तर आहेच पण हेच ब्लॉग मी तात्काळ त्या त्या दिवशीच ग्लोबल मराठी, व्टिटर, मिसळपाव या संकेतस्थळासह फेसबुकवरही टाकतो. फेसबुकच्या भिंतीसोबतच जवळ जवळ पन्नास गटांवर हे लेख मी टाकत असतो. आता (1 नोव्हेंबर 2014 पासून) व्हॉटस् अॅपवरही माय ब्लॉग्स् नावाचा ग्रुप सुरू केला. अनेक लोक ब्लॉग आवडला म्हणून परस्पर इतरांना फॉरवर्ड करत असतात. त्यामुळे आंतरजालावरील ब्लॉग साइट, ग्लोबल मराठी, व्टिटर, मिसळपाव, फेसबुक आणि व्हॉटस् अॅप या सर्वांवर प्रत्येक लेख जवळपास साडेतीन हजार ते चार हजार वाचक वाचतात हे वाचक खुणांवरून लक्षात येते. तरीही या ब्लॉगला प्रायोजक मिळविण्याच्या खटाटोपात मी अजूनही पडलो नाही. काहीतरी आतून सांगायचे असते. भारताच्या संविधानाने दिलेल्या अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याला अनुसरून व्यक्‍त होणे आणि अप्रत्यक्षपणे झालेच तर प्रबोधन एवढ्याच ध्येयाने प्रेरित होऊन हे लिखाण मी करतो. प्रपंचासाठी करावी लागणारी नोकरी सांभाळत, (नोकरीत सर्वात जास्त वेळ खर्च होतो.) माझे इतर लेखन आणि ब्लॉग लिहिणे यासाठी वेळ सांभाळणे खूप कठीण जाते. ब्लॉगमुळे माझ्या इतर लिखाणावरही विपरीत परिणाम होतो, हे ही लक्षात आलंय. पण ब्लॉग लिखाण सातत्यातून मला जो आनंद मिळतो त्याचे वर्णन मी इथे शब्दात मांडू शकत नाही.
         चार वर्षातील या छोट्या लेखांची जवळपास जाणारी संख्याच सांगायची झाली तर ती 160 (एकशे साठ) इतकी झाली आहे. पैकी काही निखळ प्रासंगिक स्वरूपाचे लेख वगळून या ब्लॉगचे पुस्तक प्रकाशित व्हावे असे मला वाटते. बघूया. या पुढेही मी ब्लॉग लिहीत राहीन. दर महिण्याच्या एक आणि पंधरा तारखेला ब्लॉग देण्याचा दिवस कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न करीन. कला, साहित्य, भाषा, लोकसंस्कृती, लोकजीवन, वैचारिक ‍लेखन अशा स्वतंत्र लेखनाबरोबरच माझे इतरत्र प्रकाशित झालेले लिखानही ब्लॉग मधून देत असतो- देत राहील. माझ्या ब्लॉग लिखाणाला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जर आपण माझे याआधीचे इतर ब्लॉग वाचून त्यांच्या संदर्भातही काही सुचना केल्या वा प्रतिक्रिया दिल्या तर मला आनंद वाटेल. आधीचे ब्लॉग वाचण्यासाठी या ब्लॉगच्या शेवटी लिंक दिली आहे, त्या लिंकवर आतापर्यंतचे माझे सर्व लेख वाचता येतील. आपल्या सर्वांच्या ‍अभिप्रायांमुळे, प्रतिक्रियांमुळे, टिपण्यांमुळे आणि विशेषत: आपल्या प्रेमामुळे मला लिखाण करण्याची ऊर्जा मिळत गेली, म्हणून ब्लॉगचे लेखन सातत्य मी आतापर्यंत तरी टिकवून आहे. ब्लॉगच्या लेखांवरील आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया (प्रतिकूल प्रतिक्रिया सुध्दा) वाचून मला खूप आनंद मिळतो. हा आनंद आपण सर्व मिळून यापुढेही घेत रहायचा का? या ब्लॉग्सवरील लेखांमधून आपल्याला काही नवीन माहिती वा नवीन ज्ञान मिळते का? प्रबोधन होते का? वा तसे होत नसेल तर किमान सांस्कृतिक- सामाजिक उजळणी तरी होते का? अशा प्रश्नांचे मंथन जरूर व्हावे ही विनंती. यापुढेही सर्व वाचकांचे असेच प्रेम मिळत राहील अशी आशा बाळगतो. धन्यवाद.

   - डॉ. सुधीर रा. देवरे            
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा