गुरुवार, १४ एप्रिल, २०१६

साथ : एक आकलन

- डॉ. सुधीर रा. देवरे

   साथ
           
हा रस्त्यावरचा
      दीप क्षीण तेजात
तेवतो एकटा
      भीषण काळोखात
- तिष्ठते कुणि तरी
      समोरच्या खिडकीत ;
केव्हढी तयाची
      सोबत आणिक साथ.
              - इंदिरा संत

      साथ! श्रीमती इंदिरा संत यांची ही कविता. फक्‍त आठ ओळींची आणि दोन कडव्यांची आहे. या कवितेतला प्रत्येक शब्द महत्वाचा असून कविता आस्वादण्यापूर्वी तिच्या शब्दांचा म्हणजेच तिचा भाषिक पसारा पाहू :
हा          - कोणताही दीप नव्हे. विशिष्ट दीप. म्हणून हा.
रस्त्यावरचा   - पोरका, तुटलेला, फेकलेला, वाळीत टाकलेला, तोडलेला,
             एकाकी.
दीप         - जिवंतपणाचे प्रतीक.
क्षीण तेजात तेवतो तेवतो : जिवंततेचे लक्षण. मात्र तो क्षीण तेजात तेवतो. दीप तेवतो त्या अर्थी त्याची स्वाभाविक तेजात तेवण्याची क्षमता- प्रकृती आहेच. पण त्याला स्वाभाविकपणे तेवण्यास वीज पुरवठा कमी होत असला पाहिजे. म्हणून क्षीण तेजात तेवतो.
एकटा        - एकाकी, लोन्लीनेस.
भीषण काळोख- निराश, अपयश, दु:खात बुडालेला, दुर्दैव, वैफल्यग्रस्त, शापित.
तिष्ठते       - प्रतिक्षा.
कुणि तरी    - सचेतन- सजीव संज्ञा. आपल्या अतिजवळच्या प्रिय व्यक्‍तीचा उल्लेख कुणि तरी म्हणून होतो. प्रियकर.
खिडकी - म्हणजे दार नव्हे. खिडकी: जिच्यातून बाहेर जाता येत नाही. स्वप्न, इच्छा, आकांक्षा आणि मर्यादांचेही प्रतीक.
केव्हढी - परिमाण. पण इथे अनंतता. केव्हढी या शब्दाने परिमाणाची फूटपट्टी अपूर्ण पडत असल्याचे सूचित होते.
सोबत       - सोबत असणे.
साथ         - मैत्री

      कवितेच्या या भाषिक अर्थांच्या साहाय्याने आता कविता आस्वादू:
हा रस्त्यावरचा दीप म्हणजे अभिप्रेत असलेला विशिष्ट दीप, जो रहदारींच्या रस्त्यालगत एकाकी आहे. एकाकी असला तरी तो स्वयंपूर्णतेने तेवणाराही आहे. मात्र लौकीक दृष्टीने हा दीप क्षीण तेजात तेवतो आहे. किंबहुना अडगळीतल्या वस्तुवत अचेतन आहे. कारण सदरहू दीपाच्या या विशिष्ट तेजाचे आकलन व्हायला सभोवतालच्या अंधाराला कलात्मक आत्मिक आनंदाचे सहावे इंद्रियच नाही. (सहावे सुख ही चिनी संकल्पना आहे. ज्या गोष्टींमुळे माणसाला निखळ आत्मिक आनंद मिळतो, ते सहावे सुख. आणि ज्याला ते प्राप्त होते, त्याला सहावे इंद्रिय आहे असा समज.) या अंधाराला माहीत आहे फक्‍त रस्त्यावरचे रहदारीचे नियम. रूढी- परंपरेचे ओझे सावरत रस्त्याने चालणे. म्हणून या अंधाराच्या सनातन परंपरेने या दीपाभोवती एका अपघाताने भीषण काळोखाचे कडे करून ठेवले कुंपण करून ठेवले आहे.
      पहिल्या कडव्यात झाले दीपाच्या एकाकीपणाच्या वस्तुस्थितीचे वर्णन.
      दुसर्‍या कडव्याला सुरूवात होते, ती ओळीच्या सुरूवातीच्या - अशा एका आडव्या रेषेने. ही रेषा पहिल्या कडव्याला दिलेली कलाटणी सूचित करते. म्हणून ही रेषा तरीही, पण, मात्र या अर्थाची वाटते.
      पण या क्षीण तेजाच्या प्रतिक्षेतही कुणि तरी समोरच्या खिडकीत तिष्ठते. आता मात्र हे तेज क्षीण रहात नाही. या क्षीण तेजातही सहावे इंद्रिय लाभलेला एक रसिक समोरच्या खिडकीत उजाळून निघतो, कुणि तरी ही प्रेमळ संज्ञा घेऊन. ही अंतर्मुख अस्पर्शित प्रीत दीपाला केव्हढा दिलासा देणारी! हा दिलासा परिमाणाची फूटपट्टी थिटी पाडणारा आहे. केव्हढी हा परिमाणवाचक नेमका शब्द इथे प्रभावीपणे काम बजावतो. विशेष परिणामकारक ठरतो. केवढी या शब्दाने परिमाणात न बसणारा दिलासा अगदी सहज व्यक्‍त होतो. म्हणूनच या भोवतालच्या भीषण काळोखात ही सोबत परिमाणात मोजता न येणारी सोबत ठरते. भीषण काळोखाच्या पार्श्वभूमीवर तर ही सोबत सात जन्माच्या परिमाणाहूनही प्रभावी ठरते.
      शेवटचे कडवे- म्हणजे दुसरेच कडवे अजून एकदा नीट काळजीपूर्वक वाचले की त्यातून आणखी एक निराळाच अर्थ डोकावू लागतो. त्यातून दीपाला बोचणारी खंत दृगोचर होऊ लागते. ती खंत म्हणजे ही सोबत नुसती सोबतच आहे. ती साथ ह्या अर्थाची सोबत नाही. कुणि तरी चे दीपाशी मिलन शक्यच नाही, पण संवाद होणेही शक्य नाही. कारण कुणि तरी  खिडकीत आहे. खिडकीतून कुणि तरी बाहेर पडू शकणार नाही आणि दीपाला आपला अचेतन खांब सोडता येणार नाही. दोघांना वस्तुस्थितीचे जडत्व पुन्हा जाणवू लागते. भीषण वस्तुस्थितीची दोघांना चांगल्यापैकी जाणीव आहे. म्हणूनच त्यांची साथ या अर्थाची खरी सोबत नाही, तर नियतीने त्यांना केवळ समोरासमोर आणून जखडून टाकले आहे- एकाला खिडकीच्या चौकटीत तर दुसर्‍याला कराल खांबावर. इथे दोघांचे फक्‍त एकमेकांसाठीचे असणे जाणवते. शेवटी हताशपणे दोघांना वस्तुस्थितीला सामोरे जाऊन, आहे त्याच परिस्थितीत समाधान मानणे इष्ट वाटते. तीच ही एकमेकांना एकमेकांची सोबत आणि साथ. (सदर आस्वाद कविता-रती 1989 च्या इंदिरा संत विशेषांकात प्रसिध्द झाला आहे. लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा