सोमवार, १४ मार्च, २०१६

एक कविता : भाषेची




- डॉ. सुधीर रा. देवरे

           डॉ. गणेश देवी स्थापितभाषा संशोधन केंद्राच्या स्थापनेपासून म्हणजे 1997 पासून मी जोडला गेलो, तेव्हापासून माझे नेहमीच बडोद्याला जाणे होत राहते. मध्यंतरी अहिराणीढोलच्या संपादनामुळे बडोद्याला जाणे नित्याचेच झाले होते. माझी मातृभाषा अहिराणी, शैक्षणिक भाषा मराठी, आणि प्रसंगी कामचलाऊ असे हिंदी, इंग्रजीचे ज्ञान. या व्यतिरिक्‍तच्या बाकी भाषा म्हणजे मलाकाळे अक्षर म्हैस बरबरअशा अगम्य.
            ढोलच्या एका अंकाच्या फायनल प्रुफ रीडिंगसाठी बडोद्याला गेलो असताना,
कॉम्प्युटरशेजारी बसून स्क्रिनवर महिला ऑपरेटरकडून मी दुरुस्त्या करून घेत होतो. दोघांना समान कळणारी भाषा म्हणून आम्ही आपसात हिंदी बोलत होतो. हिंदीच्या मला ज्या मर्यादा होत्या तशा ऑपरेट करणार्‍या महिलेलाही होत्या. माझी मातृभाषा अहिरानी- मराठी तर ‍त्यांची गुजराथी. ेवढ्यात या कामाच्या संदर्भातच त्या माझ्याशी केव्हा गुजराथी बोलू लागल्या ते त्यानांही कळल नाही. (आपण बेसावध असलेल्या क्षणी आपली नैसर्गिक भाषा आपण आपल्या नकळत बोलायला लागतो हे ही इथे लक्षात घेतले पाहिजे.) त्या आपल्या मनाशी बोलताहेत की काय म्हणून मी गप्प. माझ्याकडून त्या महिलेला प्रतिसाद मिळत नाही अस ध्यानात आल्यावर त्यांनी माझ्याकड पाहिल. मी म्हणालो, ‘‘आप क्या बोल रही है, मेरी समझ में नहीं आ रहा। ’’
            माझे हिंदी वाक्य ऐकताच त्यांनी तोंडातून जीभ बाहेर काढत कपाळावर हात मारून घेतला आणि जिभेवरची गुजराथी भाषा गुंडाळून त्या माझ्याशी पुन्हा हिंदी बोलू लागल्या.
            ही छोटीशी आणि कोणालाही कायम परिचित असलेली घटना. पण बडोद्याहून परतीच्या बस प्रवासात हा प्रसंग माझ्या चिंतनाचा विषय झाला होता. भाषा आपल्याला किती केविलवाण करून टाकते पहा! आपली मातृभाषा जशी नैसर्गिकपणे आपल्याकडून बोलली जाते तशी नंतर शिकलेली- कमावलेली एखादी भाषा तिची जागा क्वचितच घेऊ शकते. मागे 1997 सालीसाहित्य अकादमीआयोजितलोककलां- लोकसंस्कृतीवरील चर्चासत्रासाठी मिदनापूर- लकत्त्याला गेलो होत. तेव्हाही थोडीफार येणारी इंग्रजी आणि हिंदीच्या मदतीने मी संभाषणात वेळ मारून नेत होतो. पण अजिबात न कळणार्‍या बंगाली भाषेच्या संदर्भात मी अंतर्मुख झालो होतो. (दिल्ली आणि भोपाळला अशाच कृतीसत्रात पण तिथल्या स्थानिक बोलीभाषा हिंदी मुळे अस प्रकर्षान जाणवल नव्हत. चित्रपट मात्र सबटाइटल्स मुळे आपण कोणत्याही भाषेत पाहू शकतो आणि दृक हावभावातही अर्धे अधिक समजत राहतो.)
            मिदनापूर नंतर हीच घटना 2003 साली म्हैसूरला आवृत्त होत होती. जानेवारी-फेब्रुवारी दोन हजार तीन मध्ये कर्नाटकातील म्हैसूर येथीलकेंद्रीय भाषा संस्थानात पंधरा दिवसांसाठी कृतिसत्रात उपस्थित होतो. दिवसभर सेमिनारमधील चर्चांचा आस्वाद घेऊन रात्री आम्ही विविध नाटकांना जायचो. नाटकांना जाताना भाषेची निवड दुय्यम ठरत होती. ज्या भाषेत उपलब्ध होईल ते पहायचं. यात यक्षगान अंतर्भूत असलेली नाटकं, जास्त करून कन्नड तर एक हिन्दी नाटकही बघायला मिळालं. एक जेनु कुरुबाह्या स्थानिक आदिवासी जमातीवरील त्यांच्याच बोलीतील डॉ. केकरीं नारायण लिखित व डॉ. एम. एस. सत्यू दिग्दर्शित नाटक पाहिलं. आदिवासी युवकांकडूनच (आदिवासींमधील तीस कलाकार घेऊन) बसवून घेतलेल्या या नाटकाचा आस्वादही (भाषा येत नसल्याने) केवळ सादरी करणाच्या गुणवत्तेमुळ कायम लक्षात राहील, असा मनपटलावर कोरला गेला. दैनंदिन कामाच्या संवादात तर समोरून येणारे उत्तर बहुतकरून कानडीत मिळत असे.
            म्हैसूरयेथील पंधरा दिवसांच्या निवासात ह्या दैनंदिन गोष्टींमुळे चिंतनातून
काही निरीक्षणही नोंदवली जात होती. त्यात भाषेचा मुद्दा अग्रक्रमाने येत होता. इंग्रजी ही परकीय देशातील भाषा आपण वाचू शकतो, लिहू शकतो, ऐकून तात्पर्य समजू शकतो. रंतु भारतातीलच मात्र परप्रांतीय भाषा - कानडी - आपण कामचलावू म्हणून सुद्धा समजून घेऊ शकत नाही, ते कोणत्या मानसिकतेमुळ? (खरं तर भाषेच्या अज्ञानामुळं. मानसिकतेमुळं नव्हे!) असा विचार मनात थैमान घालत खूप वेदना देऊ लागला. ही बोच काही केल्या मनातून जात नव्हती. बडोदा आणि कलकत्ता येथील घुसमटीप्रमाणेच म्हैसूरलाही भाषेची ही जीवघेणी घुसळण सुरू झाली होती.
            या अनुभवांचा इजा, बिजा, तिजा आता पूर्ण होत होता. जिथ जिथसंवादाआड भाषा येऊ लागली तिथ तिथ माझी शैक्षणिक अर्हता मला सतावू लागली होती. भाषा आली नाही तर आपलं उच्च शिक्षण आपल्या कामास येत नाही, हे लक्षात येऊ लागलं. कामकाज आटोपल्याच्या म्हैसूर मुक्कामीच एका संध्याकाळी या चिंतनाच्या घुसळीतून माझ्या तोंडातून मला न कळत उत्स्फूर्तपणे तीन ओळी आल्या:

मी मराठीतला पीएच डी
आणि अजून कानडीत
बालवाडीतही जात नाही!

            ...अरे ही तर कविता आहे! अगदी आतून आलेली. मी ताबडतोब सापडेल त्या कागदावर या तीन ओळी उतरून घेतल्या. ह्या तीन ओळी अजून लांबवून कविता मोठी करण्याची मला त्या वेळीही गरज वाटली नाही आणि आजही मी तसं करण्याचा प्रयत्न करत नाही. या तीन ओळी एकदम स्वयंभू वाटल्यात मला. कारण बडोदा ते म्हैसूर व्हाया कलकत्त्याचे प्रसंग. म्हैसूरला पंधरा दिवस भाषेसाठी माझी जी उलघाल होत होती, त्या जाणिवेला शब्दांच कोंदण मिळून नेमकी अभिव्यक्‍ती आविष्कृत झाली होती. क्‍तकानडीच्या ठिकाणी आपल्याला हवी ती भाषा घातली की हा अनुभव कोणासाठीही सार्वत्रिक होत होता.
            (नुकताच महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार मिळालेल्या व पुण्याच्या पद्मगंधा प्रका‍शनाने प्रकाशित केलेल्या ‘अहिराणीच्या निमित्ताने : भाषा’ या माझ्या पुस्तकातील एक छोटेसे प्रकरण.)

डॉ. सुधीर रा. देवरे
  इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा