सोमवार, ३१ ऑगस्ट, २०१५

फाशीचा वैचारिक फास




-         डॉ. सुधीर रा. देवरे

      (30 जुलै 2015 ला भारताच्या एका देशद्रोही गुन्हेगाराला फाशी झाली. परंतु काही लोकांकडून चुकीच्या पध्दतीने चर्चा झाल्यामुळे वातावरण काही प्रमाणात दुषित झाले होते. त्यात अजून भर नको म्हणून हा लेख त्यावेळी प्रकाशित केला नव्हता. कोणताही विषय कधी जुना होत नाही. पण प्रासंगिक विषयांवरच लिहिण्यावाचण्याची सवय आपल्याला वृत्तपत्रांनी लावून दिली. ती चुकीची आहे.)  
      भारताच्या कायद्यात फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. ज्या ज्या वेळी भारतात एखाद्या गुन्हेगाराला फाशी दिली जाते त्या त्या वेळी फाशीच्या शिक्षेवर सर्वत्र उलटसुलट चर्चा होते. कोणत्याही विषयावर साधकबाधक चर्चा होणे हे जीवंत लोकशाहीचे सुसंस्कृत लक्षण आहेच. पण...  
      या पंधरा वर्षाच्या काळात न्यायालयांनी जवळ जवळ साडेतीनशेच्यावर गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठावली असली तरी फाशीची प्रत्यक्ष अमंलबजावणी फक्‍त चार कट्टर गुन्हेगारांवर झाली. पैकी एक पाशवी बलात्कारी तर तीन दहशतवादी होते. (या तिघांपैकी एक मूळ पाकिस्तानी तर दोन रस्ता चुकलेले उच्चशिक्षित भारतीय परंतु पाकिस्तानचे काम करणारे होते.) भारताचा कायदाच असा आहे की दहा गुन्हेगार शिक्षेशिवाय मोकाट सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध माणसाला शिक्षा होऊ नये. त्यात दुर्मिळातल्या दुर्मिळ आणि अपवादात्मक अशा क्रूर गु्न्ह्यांसाठी आपली न्यायालये फाशीची शिक्षा ठोठावतात. बाकी अनेक खुन्यांनाही जन्मठेप होत असते. पैकी प्रत्यक्ष फाशी देतांना सरकारही फक्‍त अपवादात्मक क्रूरातल्या क्रूर कर्म्यांवरच ती लादतात. बाकी गुन्हेगार शिक्षा फाशीची झाली असली तरी जन्मठेप झाल्यासारखे तुरूंगात वावरत असतात.
      जगात चाळीस देश असे आहेत की त्या देशांत फाशीची शिक्षा दिली जात नाही. फाशी देणे हे मानवतेविरूध्द आहे असा एक मत प्रवाह आहे. आणि भारतानेही या चाळीस देशांच्या बाजूने जाऊन फाशीची शिक्षा रद्द करावी असे भारतातल्या काही विचारवंतांचे म्हणणे आहे. हा विचार वाईट नाही. मानवतेच्या दृष्टीने हे बरोबर असले तरी नेहमी दहशतवादाच्या छायेत वावरणार्‍या भारतात असा कायदा करणे हे देशहिताचे आहे की नाही हा सारासार विचार मात्र आपण करायलाच हवा.
      भारतात घडलेल्या दोन घटनांचा उल्लेख इथे केला की हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल: एकोणावीसशे एकोणनव्वद साली व्ही पी सिंग सरकार मंत्रीमंडळातील केंद्रिय गृह मंत्री मुफ्ती मोहम्मद सईद   यांची मुलगी डॉ रूबीनाचे काश्मीरमधून अपहरण करण्यात आले होते. त्या अपहृत मुलीच्या बदल्यात जीवंत पकडलेले पाकिस्तानी दहशतवादी आपल्याला सोडून द्यावे लागले. दुसरी घटना, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना एकोणावीसशे नव्याण्णवला
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारताचे विमान अपहरण करून कंधारला नेले. आपल्या तुरूंगातले चार पाकिस्तानी कट्टर दहशतवादी आपल्याला विमान प्रवाश्यांच्या जीवांच्या बदल्यात पुन्हा सोडून द्यावे लागलेत. नंतर त्याच दहशदवाद्यांच्या पाठबळाने मुंबईवर हल्ला झाला होता.
      या दोन घटना पाहता कट्टर दहशतवाद्यांना आपल्याला अशा पध्दतीने वेळोवेळी नामुष्कीने सोडून द्यावे लागणार असेल तर  न्यायालयाने फाशीची शिक्षा फर्मावताच देश सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना वेळीच फाशी देणे इष्ट ठरू शकते. एकट्या दुकट्या दहशतवाद्यांच्या जीवाचा मानवतावादी विचार करताना त्यांचा ज्यांना (संख्येने प्रंचड असलेल्या निरपराध माणसांना) उपद्रव होतो, अशा माणसांच्या बाबतीत मानवतावादी दृष्टीकोन ठेवणेही अधिक रास्त असू शकते.
      मुंबई बाँब स्फोटातील मुख्य सक्रीय गुन्हेगार असलेल्या याकूबला फाशी दिल्याने फाशीच्या शिक्षेबाबत अशीच उलटसुलट चर्चा झाली. पण ही चर्चा पूर्वग्रहदूषित होती. मतांचे ध्रुवीकरण करत राजकारण करणार्‍या ओवेसी नावाच्या एका जातीयवादी धर्मांधळ्या नेत्याने या फाशीला धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न केला. (याकूबच्या गुन्ह्याची तुलना दिल्ली दंगल, गुजराथ दंगल, मुंबई दंगल, इंदिरा गांधी हत्याकांड, श्रीकृष्ण आयोग, बाबरी मशीद प्रकरण आदींशी करण्याचा प्रयत्न झाला. पण तारतम्य बाळगले तर ही तुलना होऊच शकत नाही. हे सर्व युक्‍तीवाद हास्यास्पद होते. देशांतर्गत संघर्ष होणे वेगळे आणि शत्रू राष्ट्राच्या सहकार्याने देशाविरूध्द युध्द पुकारणे वेगळे.) त्यामुळे याकूबला आतून सहानुभूती असलेल्या काही धर्मांधळ्या माणसांनी उत्तेजीत होऊन या फाशी विरूध्द उघड उघड नाराजी व्यक्‍त केली. दहशतवादाला भुमीगत सहानुभूती असलेले लोक मात्र या घटनेने सपशेल उघडे पडलेत. दहशतवादाला कोणताच धर्म नसतो, हे विसरल्याने काही लोकांचे असे हसे झाले.
      या सर्व गदारोळात फाशीच्या शि‍क्षेला (ती कोणालाही असो) तात्विक विरोध असणारे लोकही या जातीय ध्रुवीकरणात विनाकारण ओढले गेलेत. म्हणजे कोणत्याच गुन्हेगाराला फाशी देऊ नये असे म्हणणारे मानवतावादी लोक आणि फक्‍त याकूबला फाशी देऊ नये असे म्हणणारे धर्मांधळे लोक हे एकाच माळेचे मणी आहेत असे चित्र निर्माण झाले.
      दाऊद, टायगर आणि याकूब हे मुंबई बाँबस्फोटाचे मुख्य गुन्हेगार आहेत. इथले बेरोजगार गरीब तरूण पाकिस्तानात नेऊन त्यांना ट्रेनिंग देणे, स्फोटासाठी आरडीएक्स सारख्या अतिघातक रसायनाचा वापर करणे, देशाच्या आर्थिक व्यवस्थेला हादरे देणार्‍या अशा अनाधिकृत हवाला धंद्यातून बाँबस्फोटासाठी पैसे उपलब्ध करून देणे, आपल्या घरातून सर्व सूत्रे हलवणे, घरात स्फोटकांचा साठा करणे आणि या स्फोटांचे किती गंभीर परिणाम होणार आहेत याचे त्यांना ज्ञान असणे. उच्चशिक्षित असल्याने आपण नक्की काय करत आहोत याचे पुरेपुर भान या माणसाला होते. तरीही थंड डोक्याने आराखडा तयार करून आणि पाकिस्तानच्या सहकार्याने बाँब स्फोट घडवून पाकिस्तानात पळून जाणे अशा देश विघातक गुन्ह्यांना आपण पाठीशी कसे घालू शकतो? अशी भयावह पार्श्वभूमी असूनही इतक्या भारतीय लोकांची सहानुभूती या गुन्हेगाराला कशी मिळू शकते याचे आश्चर्य वाटले. याकूबवरची चर्चा ऐकून मला भीती वाटत होती, की हा याकूब आता दाभोळकर आणि पानसरे यांच्या पंक्‍तीत जाऊन बसतो की काय!   
      खरे तर प्रत्येक गोष्टीकडे अशा जाती धर्माच्या चष्म्याने आपण पाहू लागलोत तर ज्या देशाच्या प्रायोजक‍त्वाने या देशात दहशतवाद पसरवला जातो त्या पाकिस्तानला आपण काय संदेश देत आहोत याचे तारतम्य या फाशीच्या चर्चेवेळी कोणालाच दिसून आले नाही, ही फार दुर्दैवी गोष्ट घडली. अशा फालतू आणि दिशाहिन चर्चेमुळे काही धर्मांधळ्या लोकांनी उचल खाल्ली आणि ते न्यायाधिशांना निनावी धमकी देण्यापर्यंत पुढे गेलेत.
      पुरोगामी म्हणवणार्‍या एका संपादकाने आपल्या संपा‍दकीय अग्रलेखात अजून तेल ओतण्याचे काम केले. काहींनी मुंबई दंगलीची प्रतिक्रिया म्हणून बाँबस्फोट घडवले गेलेत असे युक्‍तीवाद केलेत. मुंबई दंगलीचा बाँब स्फोट घडवून सूड घेण्याचा अधिकार या तिघांना कोणी दिला? म्हणजे ज्यांनी दंगल केली, बरोबर तेच 257 लोक या बाँबस्फोटात मारले गेले, त्यातलेच शेकडो अपंग झाले आणि त्यांचेच करोडो रूपयांचे नुकसान झाले, असे त्यांचे तर्कट आहे की काय, समजायला मार्ग नाही. मुंबई दंगलीचा बदला म्हणून असा बाँबस्फोट घडवायचा जणू दाऊद- मेमनचा मूलभूत हक्कच आहे, असा कोणाचा समज व्हावा, अशा पध्दतीचे हे उथळ युक्‍तीवाद होते. भारतात लोकशाही आहे आणि अभिव्यक्‍ती स्वातं‍त्र्य आहे म्हणून आपल्या सोयीची कशीही चर्चा केली तरी चालेल असे काही वैचारिक गोंधळ घालणार्‍या लोकांना वाटत असावे. फाशीच्या शिक्षेच्या या वैचारिक फासाचे वातावरण भयावहच म्हणावे लागेल.     
      (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
  
      - डॉ. सुधीर रा. देवरे            
        इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा