शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०१५

कुंभ मेळा




- डॉ. सुधीर रा. देवरे

      नाशिक कुंभ मेळ्याचे नारे वाजू लागलेत. एकोणा‍वीस ऑगष्ट 2015 पासून मुख्य सिंहस्थ पर्वण्या सुरू होतील आणि त्या सप्टेंबर अखेर असतील. विविध आखाड्यातले साधू, त्यांच्यातले शैव वैष्णव वैमनश्य, भगव्या कपड्यांपासून अंगावर अजिबात कपडे नसलेल्या दिगंबर साधूंसह नाशकात प्रचंड प्रमाणात साधूंचे आगमन झालेले आहे. काही साधू एसी रूममध्ये राहून फेसबुक व्हॉटसअॅप वर अपडेट आहेत तर काही पत्र्यांच्या शेडमध्येही राहतात. पैकी हिमालय बाबा नावाचे साधू एका मंत्र्याच्या आशीर्वादाने(?) अलिशान आश्रमरूपी महालात राहतात. या एकाच आश्रमासाठी दहा कोटी रूपये खर्च झाले असून सदैव दिवा प्रज्वलीत ठेवण्यासाठी बनवलेली नुसती वातच एक कोटी रूपयाची आहे. बाकी एसी पासून सर्व प्रकारच्या सुविधा या आश्रमात आहेतच. अशा अनेक थोर आणि थाटामाटात राहणार्‍या साधूंचे दुर्लभ दर्शन भाविकांना होईल. भाविकही अशा साधूंच्या दर्शनासाठी उतावीळ झालेले असतात.  
      साधूंच्या अलिशान ग्रामांसाठी हजारो एकर जमीन अधिग्रहण करण्यात आली. अनेक डोंगर कापण्यात आले. असंख्य वृक्षांना बळी देण्यात आले. अशा पर्यावरणाच्या नाशासह शहर- रस्ते सुधारणांच्या नावाखाली प्रचंड मोठा निधी मंजूर होऊन तितकाच मोठा भ्रष्टाचारही होतो. या कुंभमेळ्यासाठी शासनाचे दहाहजार कोटी रूपये खर्च झाल्याचे ऐकले. एकीकडे हा श्रध्देचा प्रश्न म्हणावा, धार्मिक अध्या‍त्मिक बाब समजण्यात यावी तर अशा पवित्र स्थानी भेट देणार्‍या भाविकांकडून का साधू महंतांकडून चोवीस लाख कंडोमची मागणी कशी वाढते हा प्रश्न सतावणारा आहे.
      नाशिकच्या मागच्या कुंभ मेळ्यात- दिनांक 27 ऑगष्ट 2003 च्या महापर्वणीत एका साधूने हवेत चांदीची नाणी उधळली आणि ती नाणी मिळवण्यासाठी उडालेल्या भाविकांच्या झुंबडीतल्या चेंगराचेंगरीत तेहतीस लोकांना आपला प्राण गमवावा लागला. भाविकांचा हा कोणत्या प्रकारचा हव्यास असतो? देशभरातून नाशकात आलेल्या अनेक भाविकांनी अगदी जाणून बुजून आपल्या म्हातार्‍या आईबापांना 2003 च्या कुंभ मेळ्यात मोकळे सोडून ते आपल्या गावाला निघून गेले. भाविकांची ही कोणत्या प्रकारची भक्‍ती आहे? साधूंनी केलेल्या प्रदुषित पाण्यात अंघोळ करून आणि तेच पाणी तिर्थ म्हणून पिऊन पाप धुणार्‍या भक्‍तांची नक्की कोणती इयत्ता आहे?
      वारकरी संप्रदायातील सर्व संतांसहीत भारतातल्या अनेक थोर संतांनी कुंभ मेळ्यातील साधूंच्या अपप्रवृंत्तीवर घणाघाती टिका केली आहे. भांग, गांजा, चरस, अफू, चिलीम यांच्या नशेने कोणी साधू-संत कसा होऊ शकतो. साधू एकमेकांशी भांडतात. शैव- वैष्णव असा भेद करतात. आपल्याजवळ हत्यारे बाळगतात. शस्त्रांनी एकमेकांवर हल्ले करतात. पर्वणीतल्या अंघोळींवर बहिष्कार घालतात. अलिशान सोयीसुविधांसाठी रूसून बसतात. साध्वींचा विनयभंग करतात. महिला साध्वींना कुंभमेळ्यात स्थान नाही असे जाहीर करतात. साधूंमध्ये श्रेष्ठ कनिष्ठतेच्या अनेक पायर्‍या आहेत. म्हणजेच हे साधू उचनीचता पाळतात. साधूंमध्ये पदे असतात. श्रेण्या असतात. त्या मिळवण्यासाठी खरेदी विक्री- लाचलुचपत असते. महामंडलेश्वर हे पद मिळवण्यासाठी केवळ साधूच स्पर्धेत असतात असे नाही तर बेअरबार चालवणारे धनवान- आजचे सचिदानंद बाबाही असतात. यापूर्वी राधे माँनेही हा सन्मान विकत घेतला आहे. विविध आखाडे आणि त्यांचे राजकारण राजकारण्यांनाही लाजवेल असे आहे. साधूंना अशा सर्वसामान्य लोकांसारखे षड्रीपूंनी घेरलेले असूनही भाविक आणि सरकार अशा साधूंपुढे का झुकतात ते समजत नाही. समाधानाची बाब इतकीच की राजकारण्यांसारखे आता एकेक बाबाही उघडे पडायला लागलेत.
      महाराष्ट्र पुरोगामी राज्य समजले जात होते. आता या राज्याला पुरोगामी म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. महाराष्ट्राने शिवाजी राजे, महात्मा फुले, शाहू, आगरकर, कर्वे, भावराव पाटील, आंबेडकर या सर्वांचा पराभव केला आहे. दाभोळकर, पानसरे आज रस्त्यांवर मारले जातात आणि मारणारे कोण ते आपल्याला वर्ष उलटूनही कळत नाही. केवळ सुधारणावादी महान द्रष्ट्यांनाच महाराष्ट्राने संपवले असे नाही तर नामदेव ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ गाडगेबाबा, तुकडोजी आदी संतांनाही महाराष्ट्राने संपवून टाकले.
      आजच्या सर्व सुधारकांनो, ध्यान देऊन ऐका, साधूंच्या वाट्याला जाऊ नका. साधूंचा भविष्यकाळ उज्वल आहे. इतका उज्वल आहे की, कदाचित उद्याचा भारताचा पंतप्रधान सुध्दा एखादा साधूच असेल! म्हणून तर आपल्या देशाचे नेते निवडून देणारे लाखो मतदार साधूंनी शाहीस्नान करून पवित्र केलेल्या गोदावरीत स्नान करण्यासाठी आपला जीव ओवाळून टाकतात. साधू या नावाला भारतात या पुढे खूप स्कोप आहे. सुधारणावाद्यांना नाही. पुन्हा एकदा लक्षात घ्या. वाद न घालता अंघोळ करून मोकळे व्हा.
      आतापर्यंतच्या सर्वच महान संतांनी कुंभ मेळ्यातील भोंदू पणावर कोरडे ओढले आहेत. मात्र नाशिकला लहानपणापासून पहात आलेल्या कुंभमेळ्यांचे दर्शन कविवर्य कुसुमाग्रजांनाही कसे वाटले ते मुळातून वाचण्यासारखे आहे. म्हणून त्यांच्या 'प्रवासीपक्षी'  काव्यसंग्रहातील "सिंहस्थ" या कवितेने या लेखाचा शेवट करणे सयुक्‍तीक ठरेल:
व्यर्थ गेला तुका | व्यर्थ ज्ञानेश्वर ।
संताचे पुकार | वांझ झाले ||
रस्तोरस्ती साठे बैराग्यांचा ढीग ।
दंभ शिगोशीग तुडुंबला ||
बँड वाजविती सैंयापिया धून ।
गजाचे आसन महंतासी ||
भाले खड्ग हाती नाचती गोसावी ।
म्हणे वाट यांस पुसावी अध्यात्माची ||
कोणी एक उभा एका पायावरी ।
कोणास पथारी कंटकांची ||
असे जपीतपी प्रेक्षकांची आस ।
रूपयांची रास पडे पुढे ||
जटा कौपिनांची क्रीडा आहे जळ ।
त्यात हो तुंबळ भाविकांची ||
क्रमांकात होता गफलत काही |
जुंपते लढाई गोसाव्यांची ||
येथे येती ट्रक तुपा-साखरेचे ।
टँकर दुधाचे रिक्‍त तेथे ||
यांच्या लंगोटीला झालर मोत्याची ।
चिलीम सोन्याची त्यांच्यापाशी ||
येथे शंभराला लाभतो प्रवेश |
तेथे लक्षाधीश क्‍त जातो ||
अशी झाली सारी कौतुकाची मात
गांजाची आयात टनावारी ||
तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद ।
त्यापाशी गोविंद नाही नाही ||
     (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा