शुक्रवार, १ ऑगस्ट, २०१४

लोकश्रध्देचा सेतू 
-        डॉ. सुधीर रा. देवरे

(पद्मगंधा प्रकाशन, पुणे तर्फे दिनांक 13 एप्रिल 2014 ला प्रकाशित झालेल्या अहिरानी लोकसंस्कृती या माझ्या पुस्तकातील एक संपादित लेख.)

            आधीच अस्तित्वात असलेल्या वस्तू, वास्तू, गावे, नद्या, विशिष्ट भौगोलिक परिसर, नामे आदी गोष्टी महाकाव्य, काव्य, कलाकृती यांच्यातून उपयोजित होत असतात. कलाकृतीत काही बाबी नव्याने जन्म घेत असल्या तरी उपरनिर्दिष्ट बाबी आपल्या अंगभूत परिवेशासह अपरिहार्यपणे उदृत होत असतात. कला या सामाजिक जाणिवांचे प्रतिबिंब असल्याने कोणत्याही कलाकृतीत तत्कालीन जीवन जाणिवा, सांस्कृतिकता भौगोलिक वैशिष्ट्ये ठळकपणे उपयोजित होतात.
            परंपरेने चालत आलेल्या लोककथांमध्ये तर अशा जीवन जाणिवा अगदी ठसठशीतपणे प्रतिबिंबीत होताना दिसतात. निसर्गातील आयत्याच वस्तू-वास्तूंवर लोककथा आल्हाद जाऊन बसतात. अशा कित्येक दंतकथा, आख्यायिका, लोककथा आज जगात अस्तित्वात आहेत की निसर्गातील कुठल्यातरी वस्तूवर वा ऐतिहासिक वास्तूंवर त्या आपला हक्क सांगतात. लोकश्रध्दा अशा पध्दतीने वाढत राहतात. मात्र अशा वस्तू वा वास्तूंचे चिकित्सात्मक संशोधन झाले तर अशा दंतकथेचा आणि त्या वस्तू-वास्तुंचा कोणताही परस्पर संबंध आढळून येत नाही, हे वेळोवेळी सिध्द झाले आहे.
            आमच्या विरगाव नावाच्या गावी रामशेर नावाचा एक नैसर्गिक तलाव नदीच्या पात्रात तयार झाला आहे. त्याच्या काळ्या खडकांच्या चौथर्‍यावर चिखलात बैलगाडीची चकारी दिसावी तशी निशाणी दिसते, हत्तीच्या पावलांसारख्या काही निशाण्याही खडकांवर दिसतात. ह्या चकार्‍या म्हणजे रामाच्या रथाच्या चाकांच्या निशाण्या आहेत रामाच्या रथाच्या घोड्यांच्या हत्तीच्या पायांच्या निशाण्या तेथे उमटल्या आहेत असे गावकरी श्रध्देने मानतात. परंतु रामायणाचा हवाला देऊनही आमच्या गावाचा रामाचा काहीही संबंध आलेला नाही. तरीही लोकश्रध्दा मात्र अशा अनाकलनिय भौगोलिक ठश्यांतून रामकथा सांगते.
            उदाहरणादाखल आमच्या गावाची वरील घटना उदृत केली असली तरी लोकश्रध्देमुळे संपूर्ण भारतभर अनेक ठिकाणी अशा दंतकथा उदयास आलेल्या आहेत- येत असतात. अनेक गावांमध्ये रामतळे असते, रामशेर असते, रामाच्या रथाच्या घोड्यांच्या टाका उमटलेल्या असतात, रामाने बाण मारून झीळ तयार केलेला असतो, कुठे त्याने गोमुख तयार केलेले असते तर कुठे त्याने विश्रांती घेतलेले स्थान निर्माण झालेले असते. कृष्ण, पांडव इतर दैवंतांवरच्याही अशा अनेक लोककथा सांगता येतील. निसर्गातील अनाकलनिय गोष्टींवर लोकश्रध्दा आपल्या मनातील देव्हारा मंडीत करीत असतात.
            नाशिकला पांडवलेणी नावाच्या काही लेणी डोंगरात कोरल्या आहेत. ह्या लेण्यांचा आणि महाभारतातील पांडवांचा प्रत्यक्षात कोणताही संबध नसताना ह्या लेण्या पांडवांनी कोरल्या असल्याचे लोकश्रध्दा सांगते. लोकश्रध्देला तार्कीकतेशी वा ऐतिहासिक संशोधनाशी काहीही देणेघेणे नसते, हे अशा उदाहरणांतून स्पष्ट होते.
            नांदुरी येथील सप्तश्रृंगी देवीच्या गडासमोर एका डोंगराच्या कड्याला आरपार भगदाड (बोगदा) पडले आहे. ते भगदाड नैसर्गिक असले तरी लोकश्रध्दा त्या भगदाडावर दंतकथा निर्माण करते. सप्तश्रृंगी देवीने महिषासुराचा वध करण्यासाठी त्याचा पाठलाग केला, तेव्हा तो त्या डोंगरावरून पळून जात असताना त्याला लवकर गाठता यावे म्हणून देवीने कड्याला लाथ मारून भगदाड तयार केले त्यातून प्रवेश करून अंतर कमी करत महिषासुराला गाठून मारले, अशी ही दंतकथा आहे.
            याच भगदाडावर थोडीशी वेगळी अशी दुसरी दंतकथा आहे. महिषासूर पळत असताना तो त्या कड्यावर जाऊन आदळला. म्हणून ते भगदाड पडले अशा शक्तिशाली महिषासुराचा देवीने वध केला. अर्थातच या सत्य घटना नाहीत, केवळ लोककथा आहेत. एकाच बाबीवरील लोकश्रध्देतही एकवाक्यता नसते, हे येथे अधोरेखीत होते.
            .. गोडसे यांच्या ऊर्जायन या सौंदर्यशास्त्राच्या ग्रंथात गोदावरीची लोककथा या शीर्षकाखाली एका प्रातिनिधिक लोककथेवरील मीमांसा विस्तृतपणे विशद झालेली आहे. एका लोककथेच्या विश्लेषणातून जगातल्या सर्वच लोककथा या अस्तित्वात असलेल्या वास्तुंवर वा नैसर्गिक घटकांवर कशा आयत्या जाऊन बसतात, याचे साक्षेपी समीक्षण आले आहे. या मीमांसेचा उल्लेख करणे मला इथे अगत्याचे वाटते.
            कलाकृतीत- महाकाव्यात अस्तित्वात असलेल्या स्थळांचे वर्णन अपरिहार्य असते. उदाहरणार्थ, महाभारतात यमुना नदीचा उल्लेख येतो, इंद्रप्रस्थ येते, कुरूक्षेत्र येते. अशा गोष्टी, भौगोलिक परिसर, नावे आज अस्तित्वात आहेत याचा मतितार्थ महाभारताआधीही ते अस्तित्वात होते. फक्त महाभारत या महाकाव्यात ही स्थळं उपयोजित झाली आहेत एवढंच.
            रामायण या महाकाव्यात अयोध्या, पंचवटी, लंका, अशोकवन आदी भौगोलिक परिसर उपयोजित झाले आहेत. म्हणजेच रामायण लिहून होण्याच्या काळाआधीही ही नावे अस्तित्वात होती. ज्याला आपण आज रामसेतू असे संबोधतो, तो खडकांचा विशिष्ट भाग रामायणाआधीही अस्तित्वात होता. तो फक्त रामायणात उपयोजित झाला असे म्हणता येईल. रामायण लिहिण्याकाळी कदाचित हा रामसेतू बराचसा पाण्याबाहेर उघडा असेल विशिष्ट अशा सखल अंतरावरील खडकच तेवढे पाण्याखाली असतील. म्हणून तो रामायणात उपयोजित झाला असावा.
            उदाहरणार्थ, माझ्या कथेत मी विरगाव गावाचा उल्लेख केला, तर विरगाव हे गाव मी वसवलेले गाव नसते तर ते आधीपासूनच अस्तित्वात असते. मी फक्त माझ्या कथेत विरगाव गावाला उपयोजित करीत असतो. इतर वास्तू-वस्तूंभोवती जशा लोकश्रध्दा जाऊन बसल्या तशीच ही लोकश्रध्दा रामसेतूवर जाऊन बसली. इतर बाबी जशा रामनामाशी लोकमानसात रूजल्या- रूढ झाल्या, तशी आजपर्यंत सामान्य माणसात रामसेतूबद्दल आस्था निर्माण झालेली नव्हती. याचे कारण भारत आणि लंका दरम्यान समुद्राखाली असा खडकाळ उंचवटा अस्तित्वात आहे हे लोकश्रध्देला आतापर्यंत माहीत नव्हते.
            विशिष्ट दृष्टीकोनातून चाणाक्ष लोक सर्वसामान्य लोकांच्या मानसिकतेचा कसा फायदा उठवतात हे ह्या आणखी एका उदाहरणातून दिसून येते.

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा