शनिवार, २७ एप्रिल, २०१३

फेसबुकवरील मराठी विश्व




 
- डॉ. सुधीर रा. देवरे
         मी दर रविवारी माझ्या ब्लॉगस्पॉटवर मराठी भाषेत ब्लॉग लिहितो. 29 एप्रिल 2012 ला पहिला ब्लॉग लिहिला. म्हणजे आज ब्लॉग सुरू व्हायला एक वर्ष पूर्ण झाले आणि वर्षभर या ब्लॉग लेखनात एकाही रविवारचा खंड पडू दिला नाही. बहुतेक ब्लॉग शनिवारी संध्याकाळीच पोस्ट करतो आणि लागलीच त्याची लिंक व्टीटर, फेसबुक, फेसबुकवरील काही मराठी ग्रुप्स आणि ग्लोबल मराठी वेबसाईट यांच्यावर टाकतो. दुसर्‍या दिवशी संपूर्ण ब्लॉग मराठी ग्रुप्ससहीत इतरत्र देतो.
         फेसबुकवर काही चांगले विचार मांडणारे लोक आणि चांगले वाचक, रसिक मराठी भाषिक ग्रुप्स असल्यामुळे तिथे माझ्या ब्लॉगचे स्वागत होते. चांगल्या टिपण्या सुध्दा वाचायला मिळतात. अनेक मित्रांनी संदेश पाठवले, की आमचा अमूक एक ग्रुप आहे. त्याचे आपण सभासद व्हावे व आपल्या ब्लॉग्समधील विचार आमच्या ग्रुपवरही प्रकाशित करावेत. त्याप्रमाणे मी त्या त्या ग्रुपवर गेलोय आणि माझे ब्लॉग्स तिथेही पोष्ट करतोय.
         एकदा एका ग्रुपवरच्या माझ्या ब्लॉगवर एका मित्राची टिपणी होती: आपले ब्लॉग छान असतात. मी नेहमी वाचतो. पण आमच्या ग्रुपवर आपल्या ब्लॉगची जाहिरात करू नये ही विनंती... ही टिपणी एका दुसर्‍या मित्राने लाइक केलेली होती. हा गमतीचा भाग असेल असे वाटल्यामुळे ही टिपणी मी सुध्दा लाइक केली आणि सवयीने त्यांचे आभार मानले.
         मला ही टिपणी गमतीची वाटण्याचे कारण असे की, माझे ब्लॉग कोणी प्रायोजित करत नसल्यामुळे त्या प्रायोजकाची जाहिरात होत नाही आणि हे ब्लॉग अमूक इतक्या लोकांनी वाचले म्हणजे मला अमूक इतके कोणाकडून तरी मानधन मिळणार आहे, असे काही नसल्यामुळे मी ही टिपणी हसण्यावारी नेली. आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात त्यांच्यावर एक संवेदनाशील माणूस म्हणून आपले विचार व्यक्त करावेत आणि मित्रांसोबत चर्चा व्हावी हा या ब्लॉग्समागचा उद्देश आहे. प्रबोधन करणे वगैरे नाही. झाले तर चांगलीच बाब आहे. माझ्या विचारांवर प्रतिकूल मत देणार्‍यांचेही मी स्वागत केले आहे. मत मतांतरे असू शकतात पण विचारांची जाहिरात कशी होऊ शकेल? विचार म्हणजे काय शॅम्पू आहे, त्याची जाहिरात करता येईल?
         त्याच ग्रुपवर पुढच्याच आठवड्यात माझ्या ब्लॉगवरची ती टिपणी मागच्या आठवड्यात ज्या मित्राने लाइक केली होती, आता त्यांनी टिपणी लिहिली: आपले विचार चांगले आहेत पण आमच्या ग्रुपच्या नियमात आपल्या ब्लॉगची जाहिरात टाकणे बसत नाही तरी कृपया अशी जाहिरात करू नये ही विनंती... ही टिपणी वाचून आता मी अवाक झालो आणि तात्काळ तो ग्रुप सोडला. हा ग्रुप जनरल होता. अमूक एका विषयासाठी वाहिलेल्या ग्रुपची गोष्ट वेगळी असते. एक ग्रुप फक्त निसर्गासाठी आहे. एक पर्यावरणासाठी आहे. एक देहदानासंबंधी आहे. अशा ग्रुप्सवर मी माझे ब्लॉग्स त्या आशयाचे असतील तरच टाकतो. अन्यथा नाही. मात्र आम्ही साहित्यिक, मराठी पुस्तके व मराठी बुक या ग्रुप्सवर मी माझा प्रत्येक ब्लॉग टाकत असतो. कारण जगातील कोणत्याही विषयाचे वावडे साहित्यिकाला असता कामा नये. कोणत्याही सामाजिक प्रश्नांचे विश्लेषण करणे हे तर साहित्यिकाचे आद्य कर्तव्यच ठरते.            फेसबुकवर अनेक मराठी भाषिक ग्रुप्स आहेत. या गटांमुळे इथे एक मराठी विश्व तयार झाले आहे. त्यातून विचारांची आदानप्रदान होते म्हणून आनंद होतो. वेगवेगळे गट तर हवेतच, पण या गटांची गटबाजी होऊ नये असे वाटते. कोणाच्या प्रामाणिक विचारांकडे जाहिरात म्हणून न पाहता सगळ्यांनी आपले गट अधिक खुले केले तर हे विचार अधिक लोकाभिमुख व लोकशाहीवादी होतील अशी अपेक्षा करू या.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा