-
डॉ. सुधीर रा. देवरे
दिल्ली: जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या राजधानीचे शहर. दिल्ली: भारताचे
पंतप्रधान ज्या शहरात राहतात. दिल्ली: भारताचे राष्ट्रपती ज्या शहरात राहतात.
दिल्ली: भारताच्या लोकशाहीचे निर्णय जिथून घेतले जातात ती संसद ज्या शहरात आहे.
दिल्ली: ज्या केंद्रशासीत प्रदेशातील मुख्यमंत्री एक महिला आहेत.
अशा
या सुशिक्षित दिल्ली शहरात. दिनांक 16 -12- 2012. रात्री फक्त नऊ वाजून पस्तीस
मिनिटं. एका शाळेच्या धावत्या बसमध्ये. कंडक्टर आणि ड्रायव्हर या कर्मचार्यांसमोर.
नव्हे त्यांच्यासहीत. एकमेकांना ओळखणारे. न ओळखणारे सगळेच प्रवासी. एक होऊन. एका
उच्चशिक्षित विद्यार्थिनीवर सामुहीक बलात्कार. सुमारे दोन तास. एक तास: बलात्कार.
दुसरा तास: चालत्या बस मधून फेकल्यावर नागड्या स्त्री देहाची फक्त गंमत पहात उभा
पन्नास लोकांचा मॉब. म्हणजे शंभर डोळ्यांचा पुन्हा बलात्कार.
दिल्ली.
कलकत्ता. चेन्नई. बँगलोर. मुंबई. पुणे. नागपूर. कोल्हापूर. वसई. डोंबिवली. नाशिक.
जळगाव. खैरलांजी. पाथरवट वस्ती. कोणतेही शहर. कोणतेही गाव. तालुक्याचे गाव.
खेडे-पाडे. घर. शेत. शाळा- आश्रमशाळा. धावती खाजगी वाहने. धावत्या सार्वजनिक
रेल्वे. आणि आता धावत्या सार्वजनिक बसेस. तीच कहाणी. तीच आवृत्ती. रोज.
पासष्ट
वर्षाची महिला. साठ वर्षाची महिला. पन्नास वर्षाची महिला. चाळीस वर्षाची महिला.
तीस वर्षाची तरूणी. वीस वर्षाची तरूणी. पंधरा वर्षाची अल्पवयीन. नऊ वर्षाची
अल्पवयीन. चार वर्षाची चिमुरडी. एक वर्षाची चिमुकली. सहा महिण्याची चिमुकलीही. स्त्री
एक वस्तु. वापरा आणि (चालत्या वाहनातून) फेका. नाहीतर मारून पुरावा नष्ट करा. एका
वर्षात एका शहरात इतके हजार. आकडेवारी प्रसिध्द. अभ्यासपूर्ण.
पशू
बलात्कार करत नाहीत. पशुंमध्ये निसर्गाला अनुसरत- अनुनय करत परस्पर सहमतीने मिलने
होतात. बलात्कारासाठी एक पशू दुसर्या पशूला मदत करत नाही. चार- सहा पशू मिळून एका
मादीवर आळीपाळीने बलात्कार करत नाहीत. बलात्काराला पाशवी म्हणणे हा पशूंचा अपमान
आहे. हे मानवी बलात्कार. शरमेने माझी मान खाली जातेय. मला लाज वाटते. सांगायला.
बोलायला. लिहायला. आणि माझ्या पुरूषत्वाचीही. सुन्न. पण दुर्दैव. हा ही ठरेल फक्त
एक स्वल्पविराम,
-
डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा